सागर भस्मे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिमालयातील तिहरी जिल्ह्यातील यमुनोत्री येथे ६,३३० उंचीवर हिमनदीपासून यमुना नदी उगम पावते. तिची एकूण लांबी १३७६ कि.मी. आहे. यमुना ही गंगेची सर्वांत लांब पश्चिमेकडील उपनदी आहे. याशिवाय ही नदी हरियाणा व उत्तर प्रदेश यांच्यातील सीमा निश्चित करते. हिमालयातील १५२ किमी लांबीच्या प्रवाहानंतर कालेसार येथे यमुना मैदानी प्रदेशात प्रवेश करते. तेथे तिने १६० किमी. रुंदीचे पंखाकृती किंवा शंखाकृती मैदान तयार केले आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : वाहतूक व्यवस्था

यमुना नदीचा विस्तार क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमानुसार मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा या राज्यांत झाला आहे. उगमापासून अलाहाबादपर्यंत यमुनेचे जलप्रणाली क्षेत्र ३,६६,२३३ चौ.कि.मी. आहे. अलाहाबादजवळ यमुना नदी गंगेला येऊन मिळते. या संगमाला त्रिवेणी संगम, असे म्हणतात. यमुनाकाठी आग्रा येथे प्रसिद्ध ताजमहाल आहे. यमुनेला डाव्या किनाऱ्यावरून हिंदन, रिंध, वरुणा, टोन्स, कारवान, सेंगरट; तर उजव्या किनाऱ्यावरून गिरी, बाणगंगा, चंबळ, सिंध, बेटवा, केन या उपनद्या येऊन मिळतात.

यमुना नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या

सिंध : या नदीची एकूण लांबी ४७० किमी असून, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून ही नदी वाहते. सुरुवातीला ती मध्य प्रदेशात ईशान्य दिशेला वाहत जाऊन जगमानपूरजवळ उत्तर प्रदेशात प्रवेश करते. तेथून १५ कि.मी. प्रवास करत ती उत्तरेस यमुना नदीला मिळते.

बेटवा : या नदीचा उगम मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यात होतो. नदीची एकूण लांबी ५९० कि.मी. आहे. ही नदी मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या दोन राज्यांतून वाहते आणि हिमिरपूरजवळ यमुनेला मिळते.

केन : या नदीचा उगम मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात होतो. नदीची एकूण लांबी ३५७ कि.मी. आहे. ती मध्य प्रदेशातील पेंच या राष्ट्रीय उद्यानातून वाहते. ही नदी मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या दोन राज्यांतून वाहते आणि उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात उजव्या बाजूने यमुना नदीला मिळते.

चंबळ : मध्य प्रदेशातील जानापाव येथे विंध्य पर्वतात या नदीचा उगम होतो. चंबळ नदीची एकूण लांबी ९६० किमी आहे. बागरी, क्षिप्रा, चामला, सिवाना, ब्राह्मणी व कराल या तिच्या उपनद्या आहेत. चंबळ नदी मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांतून वाहते. उत्तर प्रदेशातील साहोन गावाजवळ तिचा यमुनेशी संगम होतो. मध्य प्रदेशातील चंबळचे खोरे हे तेथील घनदाट अरण्य व तेथे आश्रय घेऊन राहणाऱ्या डाकूंसाठी कुप्रसिद्ध आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : गोदावरी नदी प्रणाली

काली : या नदीचा उगम उत्तराखंडमध्ये होतो. ही नदी शारदा नदी म्हणूनही ओळखली जाते. मात्र, या नदीचे पाणी काळे दिसत असल्यामुळे तिला काली नदी असे नाव दिले गेलेय.

बाणगंगा : या नदीचा उगम राजस्थानमध्ये अरवली पर्वतरांगेत झाला आहे. ती अगदी सुरुवातीला दक्षिणेकडे वाहते. त्यानंतर ती पूर्वेकडे वाहते आणि यमुनेला मिळते.

टोन्स : ही यमुना नदीची सर्वांत मोठी उपनदी आहे. हिमालयात उगम पावणारी ही नदी मसुरी पर्वतरांगेजवळ यमुना नदीला मिळते.

हिंडोन : या नदीचा उगम पर्वतरांगांच्या वरती आणि लघु हिमालयाच्या खाली होतो. नदीची एकूण लांबी चार हजार किलोमीटर आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography yamuna river system mpup spb