वृषाली धोंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Internal Security In Marathi : भारताच्या संदर्भात विचार केल्यास ‘सुरक्षा’ ही संज्ञा संस्कृतमधील अनेक शब्दांचे प्रतिनिधित्व करते. संस्कृतमधील रक्ष:, रक्षणम्, रक्षक: हे शब्द मूळ धातू ‘रक्ष’ पासून निर्माण झाले आहेत व सुरक्षा याचा अर्थ संरक्षण करणे अथवा देखरेख करणे असा होतो. चाणक्याने आपल्या ‘अर्थशास्त्रात’ सुरक्षेचे अंतर्गत सुरक्षा व बाह्य सुरक्षा असे विभाजन केले आहे. पारंपरिकदृष्ट्या विचार करता राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे बाह्य व अंतर्गत आक्रमणापासून राज्याचे प्रत्यक्ष संरक्षण करणे. सुरक्षेची लष्करी बाजू महत्त्वाची असते, परंतु तो राष्ट्रीय सुरक्षेचा एकमेव घटक नसतो. एखाद्या राष्ट्राला खऱ्या अर्थाने सुरक्षित राहावयाचे असेल, तर त्यासाठी सुरक्षेच्या अन्य प्रकारांचाही विचार करावा लागतो.

सुरक्षेच्या लष्करी बाजूव्यतिरिक्त राजनय (Diplomacy) किंवा राजकारण, समाज, पर्यावरण, ऊर्जा तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती, आर्थिक सामर्थ्य आणि मनुष्यबळ या बाजूही तितक्याच महत्त्वाच्या असतात. राष्ट्रीय सुरक्षेचे उद्दिष्ट म्हणजे सामान्य जनतेत शांतता, सलोखा प्रस्थापित करणे, त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि व्यक्तिगत आयुष्यात स्थैर्य आणणे, उत्तम शासनव्यवहार करणे आणि या सर्वांद्वारे राष्ट्रबांधणीस मदत करणे व अप्रत्यक्षपणे राष्ट्राचा विकास वाढवणे. राष्ट्रीय अस्तित्वासाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय ऐक्य असणे. हे ऐक्य एक प्रकारे आपल्या राष्ट्राबद्दल स्वाभिमान निर्माण करणाऱ्या परंपरा, संस्कृती आणि इतिहासाचा परिपाक असतो. असेही म्हणता येईल की पारंपरिक सुरक्षा तर महत्त्वाची आहेच पण त्याचबरोबर सुरक्षेच्या अन्य बाजू आणि प्रकारांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा परिचय

सर्वसमावेशक सुरक्षा ( Inclusive security )

सर्वसमावेशक सुरक्षा या संकल्पनेमध्ये अंतर्भूत असणारे सुरक्षा प्रकार पुढीलप्रमाणे:

  • पर्यावरणीय सुरक्षा : पर्यावरणाच्या क्षेत्राशी संबंधित समस्यांमध्ये प्रदूषण, ऊर्जा समस्या, लोकसंख्येशी संबंधित समस्या, अन्नाशी संबंधित समस्या, वातावरणीय बदल, पाण्याच्या स्रोतांचे व्यवस्थापन यांसारख्या परिसंस्थात्मक समस्यांचा समावेश होतो.
  • आर्थिक सुरक्षा : सुरक्षाविषयक या बाजूचा भर दारिद्र, रोजगाराच्या संधी इत्यादींवर असतो.
  • सामाजिक सुरक्षा : स्थलांतरितांच्या समस्या, धर्म, वंश किंवा जात यांच्यावर आधारित सामाजिक संघर्ष इत्यादींचा समावेश सामाजिक सुरक्षेत होतो.
  • राजकीय सुरक्षा : विचारसरणी अथवा धर्म यांवर आधारित राजकीय संघर्षापासून उद्भवणाऱ्या धोक्यांचा इथे विचार केला जातो.
  • मानवी सुरक्षा : संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास अहवालाने सुरक्षाविषयक प्रश्नांमध्ये हा नवा विचार आणला आहे. १९९४ च्या मानव विकास अहवालाने मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्यात नमूद केलेल्या दोन घटकांवर अधिक भर दिला आहे. ‘भीतीपासून स्वातंत्र्य’ आणि ‘वंचिततेपासून स्वातंत्र्य’ या अहवालाने मानवी सुरक्षेची कल्पना प्रथम मांडली, त्यानुसार भूप्रदेशांपेक्षा मानवी सुरक्षा महत्त्वाची आणि शस्त्रास्त्रांपेक्षा विकास महत्त्वाचा ही संकल्पना पुढे आली. मानवी सुरक्षा या संकल्पनेचा भर प्रामुख्याने लोकांवर आहे. मानवी सुरक्षा ही मानवतावादी मूल्ये, व्यक्तिप्रतिष्ठा, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य आणि समता या संकल्पनांना प्राधान्य देते.

अंतर्गत सुरक्षेची आव्हाने :

सध्या भारताला परकी आक्रमणापेक्षाही अंतर्गत बंडखोरी, दहशतवाद, फुटीरता यांचा मोठा धोका आहे व त्याच्याशी दररोज सामना करावा लागतो. भारताने आजवर परकी शत्रूंनी केलेल्या युद्धात जेवढी प्राणहानी झाली आहे, त्याच्यापेक्षा किती तरी अधिक प्राणहानी अंतर्गत बंडखोरीत झाली आहे. शिवाय अंतर्गत सुरक्षा आव्हाने ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत. ईशान्य भारतातील बंडखोरी, काश्मीरमधील बंडखोरी, नक्षलवादाची समस्या, तेलंगणासारखे आंदोलन आणि परकी राष्ट्रांच्या चिथावणीने बळावत चाललेला अंतर्गत व बाह्य शक्तींचा दहशतवाद, विमान अपहरण, महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा अशी वेगवेगळी सुरक्षा आव्हाने आहेत. तसेच फुटीरतावादी चळवळी , नक्षलवाद, जमातवाद, प्रदेशवाद, इत्यादी अंतर्गत आव्हाने भारतापुढे आहेत. अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेशी निगडित आव्हानांचे व्यवस्थापन करण्यासाठी एक सूत्रबद्ध, सर्वसमावेशक राष्ट्रीय सुरक्षा धोरण आखणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc internal security changing nature and challenges of national security concept mpup spb
Show comments