सागर भस्मे
मागील लेखातून आपण बांगलादेशची निर्मिती, भारताची भूमिका आणि १०० व्या घटना दुरुस्तीबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारत आणि बांगलादेश यांच्यातील सहकार्याच्या क्षेत्रांसह विविध पैलूंचा आढावा घेऊया.
भौगोलिक-राजकीयदृष्ट्या महत्त्व (Geopolitical Significance):
बांगलादेश हा भारताचा सर्वात विश्वासू शेजारी देशांपैकी एक आहे. बांगलादेश हा भारताच्या ‘Neighbourhood first policy’ चा महत्त्वाचा भाग आहेच, त्यासोबतच भारताच्या ‘Act East Policy’ चा आधारस्तंभ आहे. Act East Policy हे एक भारताचे धोरण आहे. या धोरणाद्वारे एक प्रादेशिक शक्ती म्हणून आपले स्थान मजबूत करण्याचा आणि चीनच्या धोरणात्मक प्रभावाचा प्रतिकार करण्याचा तसेच दक्षिण-पूर्व आशियातील राष्ट्रांशी आर्थिक आणि धोरणात्मक संबंध जोपासण्याचा प्रयत्न भारत सरकारकडून केला जातो. बांगलादेशची तटस्थ भूमिका चीनच्या महत्त्वाकांशी ‘String of Pearl’ धोरणाला नियंत्रित करण्यास मदत करते. याबरोबरच कट्टरवादी विचारसरणी आणि दहशतवादी कारवायांना रोखण्यास मदत करते.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-बांगलादेश संबंध; बांगलादेशची निर्मिती, भारताची भूमिका आणि १००वी घटना दुरुस्ती
धोरणात्मक सहकार्य (Stratergic Cooperation) :
बांगलादेश हा दक्षिण-पूर्व आणि आशियामध्ये सामरिकदृष्ट्या भारतासाठी महत्त्वाचा देश आहे. बांगलादेशचे भौगोलिक स्थान बघता ईशान्य भारत आणि सिलिगुडी कॉरिडोरच्या सुरक्षेसाठी बांगलादेशबरोबरचे संबंध हे नेहमी सुदृढ असणे आवश्यक आहे. बांगलादेश हा भारताच्या पूर्व किनाऱ्यालगत असल्याने दळणवळणाचे सागरी मार्ग सुरक्षित ठेवणे व हिंदी महासागरातील चाचेगिरी रोखण्यासही मदत होते.
आर्थिक आणि व्यापारी सहकार्य (Economic & Trade Cooperation) :
बांगलादेश हा भारताचा दक्षिण आशिया खंडातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांदरम्यानची एकूण व्यापार उलाढाल (Turnover) १८.२ अब्ज डॉलर एवढी होती. दोन्ही देश आशिया-प्रशांत व्यापार करार (SAPTA), सार्क अंतर्गत व्यापार करार (SAPTA) आणि दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र (SAFTA) या तिन्ही कराराचे सदस्य आहेत. दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागांत राहणाऱ्या समुदायांच्या फायद्यासाठी त्रिपुरा आणि मेघालयमध्ये प्रत्येकी दोन अशी चार (‘Border Haat’) व्यापारी केंद्र स्थापन केली आहेत.
संरक्षण सहकार्य (Defence Cooperation) :
दोन्ही देशांमध्ये लष्करी युद्ध अभ्यासासाठी ‘बोंगोसागर’ आणि ‘संप्रती’ नावाचे लष्करी सराव आयोजित करण्यात येते. राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०२१ मध्ये भारताच्या प्रजासत्ताकदिनी झालेल्या परेडमध्ये बांगलादेशी सैनिकांनी सहभाग घेतला होता. एप्रिल २०१८ मध्ये भारताने १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या स्मरणार्थ एक Mi-4 हेलिकॉप्टर आणि PT-76 असे दोन रणगाडे भेट म्हणून बांगलादेश लष्कराला सुपूर्द केले होते. सप्टेंबर २०२२ मध्ये भारत-बांगलादेश यांच्यात ५०० दशलक्ष डॉलरच्या (‘क्रेडिट लाईन’अंतर्गत ) पहिल्या संरक्षण करारावर स्वाक्षरी केली होती.
कुशीया नदी – पाणी करार :
हा करार १९९६ मध्ये दोन्ही देशांदरम्यान झाला होता. आसाममधून वाहणाऱ्या बराक नदीच्या कुशीया नदीचे पाणी वाटप करण्याबाबत हा करार होता. या करारामुळे दोन्ही देशांमधील पूर व्यवस्थापन आणि सिंचनाशी संबंधित प्रश्न सोडविले गेले.
हेही वाचा – UPSC-MPSC : आंतरराष्ट्रीय संबंध : भारत-श्रीलंका संबंध; सहकार्याची क्षेत्रे
कोरोना महामारीदरम्यान सहकार्य :
महामारीदरम्यान बांगलादेशातील आरोग्य व्यावसायिकांना कोविड रुग्णांवर उपचार आणि काळजी घेण्यासाठी भारत सरकारने विविध ऑनलाईन मॉड्युल आयोजित करून प्रशिक्षण दिले. आतापर्यंत भारताने ‘Vaccine Maitri’ अंतर्गत ३.३ दशलक्ष कोवीशिल्ड लसी भेट दिल्या. सप्टेंबर २०२१ मध्ये INS सावित्रीच्या मदतीने बांगलादेशला दोन ‘मोबाईल ऑक्सिजन प्लांट्स’ भेट देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्च २०२१ बांगलादेश भेटीदरम्यान भारताने १०९ ‘लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका’ सुपूर्द केल्या. मैत्रीपूर्ण भाव म्हणून महामारी काळात ऑक्सिजन फेस मास्क, मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर, इन्फ्रारेड थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटरसह २० टन वैद्यकीय पुरवठा ऑगस्ट २०२१ मध्ये बांगलादेशला भेट म्हणून देण्यात आला.
BBIN करार :
जून २०१५ मध्ये बांगलादेश, भूतान, भारत आणि नेपाळ या चार देशांनी कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या हेतूने प्रवासी कर्मचारी आणि मालवाहू वाहनाच्या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी उप-प्रादेशिक मोटार वाहन करारावर (MVA) स्वाक्षरी केली.
भारत-बांगलादेशदरम्यान वादाचे मुद्दे :
तीस्ता नदीच्या पाणी वाटपाचा मुद्दा, बराक नदीवरील टिपायमुख जलविद्युत प्रकल्प, गंगा नदी वाद बेकायदेशीर स्थलांतर, रोहिंग्या संकट, बांगलादेशमध्ये आर्थिक आणि व्यापारीदृष्ट्या चीनचा वाढता हस्तक्षेप असे अनेक घटक वादाचे मुद्दे आहेत. परंतु, दोन्ही देशांच्या प्रगतीसाठी हे मुद्दे डिप्लोमॅटिक पद्धतीने सोडवण्यात दोन्ही देश सहमत आहेत. त्याचे उदाहरण बघायचं झाल्यास नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या शेख हसीना यांनी ‘मैत्री पाईपलाईनचे’ उद्घाटन केले. यामध्ये भारतातून पाईपलाईनद्वारे रिफाइंड डिझेलचा पुरवठा होईल. हा प्रकल्प भारत सरकारच्या अनुदान साह्याने बांधण्यात आला आहे.