सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने १ डिसेंबर २०२२ रोजी इंडोनेशियाकडून जी-२० अध्यक्षपद स्वीकारले असून हा देशासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताच्या जी-२० अध्यक्षपदाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकशाही आणि बहुपक्षीयतेची बांधीलकी. जी-२० अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळत भारताला जागतिक पातळीवर आपला प्रभाव सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. जी-२० अध्यक्षपदाच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावण्याची क्षमता भारताकडे आहे. “वसुधैव कुटुंबक्कम्” किंवा “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” या अंतर्गत राष्ट्रांमध्ये एकतेची आणि परस्परसंबंधाची भावना वाढवणे हे भारताचे उद्दिष्ट आहे.

जी-२० हे एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे. ज्यामध्ये युरोपीय संघासह १९ आर्थिकदृष्ट्या समृद्ध देशांचा समावेश होतो. जी-२० हा मंच जागतिक GDP च्या ८५%, जागतिक व्यापाराच्या ७५% पेक्षा जास्त आणि सुमारे दोनतृतीयांश जागतिक लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. १९९९ मध्ये स्थापन झालेल्या जी-२० ने सुरुवातीला आर्थिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. मात्र, २००७ च्या जागतिक आर्थिक संकटानंतर यात काही मूलभूत सुधारणा केल्या गेल्या. तेव्हापासून जी-२०आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक सहकार्यासाठीचे प्रमुख मंच बनले आहे.

जी-२० शिखर परिषद ही दरवर्षी आयोजित केली जाते. ही परिषद सदस्य देशांना आर्थिक बाबींवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. या वर्षी भारतात प्रथमच जी-२० राष्ट्रप्रमुखांची परिषद ८ आणि ९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात भारत शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य देत आहे. या प्राधान्य क्षेत्रांमध्ये हरित विकास, हवामान वित्तपुरवठा आणि LIFE (पर्यावरणासाठी जीवनशैली) यांचा समावेश होतो. हवामान बदलावर मात करण्याची गरज ओळखून भारताने स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना देण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय, विकसनशील राष्ट्रांना हवामान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत आवश्यक सहकार्य मिळावे हे सुद्धा भारताचे उद्दिष्ट आहे. या महत्त्वाच्या पैलूंकडे लक्ष देऊन, भारत एक शाश्वत भविष्यासाठी सक्रियपणे काम करीत आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : आंतरराष्ट्रीय संबंध : दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटना (SAARC)

महिला सक्षमीकरण आणि महिला प्रतिनिधित्व हे भारताच्या जी-२० चर्चेच्या केंद्रस्थानी असणारे मुद्दे आहेत. सर्वसमावेशक वाढ आणि विकास घडवण्यात महिलांची महत्त्वाची भूमिका असल्याची जाणीव भारताला आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे महत्त्व अधोरेखित करून, भारताने सामाजिक-आर्थिक प्रगतीला चालना देणे आणि SDGs साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारताचे जी-२० अध्यक्षपद हे जागतिक सहकार्याच्या भावनेला मूर्त रूप देत आहे. आपल्या दूरदर्शी नेतृत्वाद्वारे, भारत “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” या ध्येयाच्या जवळ घेऊन जगासाठी सकारात्मक बदलाचा चिरस्थायी वारसा सोडण्याचा एक प्रयत्न करतो आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc international relation india g20 summit presidency mpup spb
Show comments