सागर भस्मे

मागील लेखातून आपण भारत आणि इराण या दोन देशातील संबंध आणि त्याचा जागतिक राजकारणावर होणाऱ्या परिणामांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण भारत आणि मध्य आशियातील देशांमध्ये असलेले संबंध, भारत आणि या देशांमधील सहकार्याची क्षेत्रे व सुरक्षा आव्हानांबाबत जाणून घेऊ या. मध्य आशिया सामरिकदृष्ट्या युरोप आणि आशियाचे प्रवेशबिंदू म्हणून स्थित आहे. हा प्रदेश खनिज तेल, नैसर्गिक वायू, सोने, तांबे, ॲल्युमिनियम व लोह यांसारख्या नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. मध्य आशियाई प्रदेश हा पश्चिम आशिया आणि अफगाणिस्तानच्या संघर्षप्रवण क्षेत्राजवळ स्थित आहे. त्यामुळे मध्य आशियाई प्रदेशात सुरक्षेच्या दृष्टीने कायम अस्थिरता असते. तसेच दहशतवाद, अमली पदार्थांची तस्करी व शस्त्रास्त्रांची तस्करी या आव्हानाला आशियाई देशांना सामोरे जावे लागते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-जर्मनी संबंध; द्विपक्षीय व्यापार अन् सहकार्याची क्षेत्रे

भारत आणि मध्य आशिया यांच्यातील संबंध ऐतिहासिक, सांस्कृतिक व व्यापारी संबंधावर आधारित आहेत. दोन्ही भागांतील संबंध हे सिंधू खोऱ्याच्या संस्कृतीपासूनच जवळचे राहिले आहेत. ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकापासून भारत आणि मध्य आशियादरम्यान असलेल्या रेशीम मार्गाने (Silk Route) कापड, मसाले इत्यादींची वाहतूक होत असे. मेर्व, खलाचायन, तिरमिझ, बोखारा इत्यादी मध्य आशियातील अनेक शहरांमध्ये स्तूप व मठांच्या रूपात बौद्ध धर्माचा प्रवेश आढळला आहे. बाबर १५२६ मध्ये फरगाना (मध्य आशियातील अन्न वाडगा) च्या सुपीक खोऱ्यातून पानिपत या शहरात आला आणि त्याने भारतात मुघलांचे साम्राज्य स्थापन केले. अमीर खुसरो, देहलावी, अल-बिरुनी, अब्दुर रहीम खान यांसारख्या व्यक्तींनी भारतात येऊन साहित्य व कला यांना प्रोत्साहन दिले.

आज जो आपण मध्य आशियाईचा भाग म्हणून ओळखतो, तो शीतयुद्धाच्या पूर्वीपर्यंत म्हणजे १९९१ पर्यंत सोविएत संघाचाच भाग होता. सोविएत संघाच्या विघटनानंतर त्यांच्यापासून जवळपास १५ राज्ये वेगळी झाली आणि नवीन देशांची निर्मिती झाली. त्यातील वेगळे झालेल्या प्रामुख्याने कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान व उझबेकिस्तान या देशांचा मध्य आशियात समावेश होतो. परंतु, १९९१ नंतर आता जवळपास २५ वर्षे झाली. या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणाने मध्य आशियाला तेवढे महत्त्व दिले नाही. त्याची कारणे काही प्रमाणात अशी सांगता येईल की, मध्य आशियातील सर्व देश हे जवळजवळ पूर्वभूवेष्टित (Landlock) देश आहेत; ज्यामुळे त्यांचे आंतरराष्ट्रीय राजकारणात सामरिक महत्त्व नव्हते. तेव्हाच्या परिस्थितीनुसार ते धोरण योग्य असेल; पण आता बदलत्या जागतिक राजकरणात प्रत्येक भागाला महत्त्व आले आहे. त्याची परिणती म्हणजे २०२१ पासून मध्य आशियाशी आपले संबंध एका वेगळ्या वळणावर आले आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-इराण संबंध; द्विपक्षीय व्यापार आणि सहकार्याची क्षेत्रे

भारत हा मध्य आशियाई देशांशी व्यापारी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारताकडून मध्य आशियातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे. अलीकडेच २७ जानेवारी २०२२ रोजी भारताच्या पंतप्रधानांनी आभासी स्वरूपात पहिल्या भारत-मध्य आशिया शिखर परिषदेचे आयोजन केले होते. त्यात कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे राष्ट्रपती उपस्थित होते. ही बैठक भारत आणि मध्य आशियाई देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त होती.

पहिली भारत-मध्य आशिया शिखर परिषद ही भारताच्या ‘Extended Neighbourhood’ चा भाग असलेल्या मध्य आशियाई देशांसोबत भारताच्या वाढत्या संलग्नतेचे प्रतिबिंब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये सर्व मध्य आशियाई देशांना ऐतिहासिक भेट दिली होती.

सहकार्याची क्षेत्रे :

ऊर्जा : मध्य आशियाई देशांकडे भरपूर ऊर्जा संसाधने आहेत. भारताने नागरी आण्विक सहकार्य सुरू केलेल्या पहिल्या देशांपैकी कझाकिस्तान एक आहे. हा देश २०१० पासून भारतीय अणुप्रकल्पांना अणुइंधनाचा पुरवठा करतो आहे. Turkmenistan – Afghanistan – Pakistan – India (TAPI) gas pipeline या प्रकल्पाच्या अंतर्गत कॅस्पियन समुद्र, तुर्कमेनिस्तान ते भारतातून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानपर्यंत जाणारी ट्रान्स-कंट्री नैसर्गिक वायू पाइपलाइन मध्य आशियाला दक्षिण आशियाशी जोडण्यासाठी महत्त्वाची आहे. कॅस्पियन समुद्राच्या किनार्‍यावर हायड्रोकार्बन क्षेत्रे आहेत; ज्यात जगातील नैसर्गिक वायुसाठ्यांपैकी सुमारे चार टक्के आणि तेलाच्या साठ्यापैकी सुमारे तीन टक्के आहे.

सुरक्षा आणि संरक्षण : भारताच्या आर्थिक विकासासाठी मध्य आशियाची सुरक्षा, स्थिरता व समृद्धी आवश्यक आहे. भारत आणि मध्य आशियाई देशांचे अफगाणिस्तानातील स्थैर्य आणि दहशतवादविरोधी उपक्रमांमध्ये सामायिक हितसंबंध आहेत. सशस्त्र दलांमधील सहकार्य सुधारण्यासाठी भारत काही मध्य आशियाई देशांसोबत वार्षिक लष्करी सराव करतो. उदा. भारत किर्गिस्तानसोबत ‘खंजर’ आणि कझाकिस्तानसोबत ‘काझिंद’ हा वार्षिक संयुक्त लष्करी युद्ध अभ्यास करतो. तसेच भारत नुकताच शांघाय सहकार्य करार (SCO) मध्ये सामील झाला आहे. या माध्यमातून अफगाणिस्तानातील परिस्थिती स्थिर करण्यासाठी भारताला योग्य भूमिका बजावण्याची संधी मिळेल.

आर्थिक संबंध : अलिकडच्या वर्षांत, आर्थिक सहयोग हा भारत-मध्य आशिया संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास आला आहे. सद्यस्थितीत भारताचा मध्य आशियाई देशांसोबतचा व्यापार जवळपास २ अब्ज डॉलर एवढा आहे. भविष्यात कच्चे तेल, वायू आणि युरेनियमसह समृद्ध ऊर्जा संसाधनांच्या भारताच्या वाढत्या मागणीमुळे व्यापार अनेक पटींनी वाढू शकतो. २०१२ मध्ये सुरू करण्यात आलेल्या भारताच्या ‘कनेक्ट सेंट्रल एशिया’ धोरणाचा उद्देश मध्य आशियाई देशांशी संपर्क आणि व्यापार संबंध वाढवणे हा होता. इराण आणि रशिया मार्गे भारताला मध्य आशियाशी जोडणारा आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) हे या प्रयत्नाचे उदाहरण आहे.

Story img Loader