सागर भस्मे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील लेखातून आपण भारत आणि बांगलादेश संबंधांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारत आणि नेपाळ या दोन शेजारील देशांमधील संबंधांबाबत जाणून घेऊ या. दक्षिण आशियातील चहुबाजूंनी वेढलेला (Land lock ) देश म्हणून नेपाळची ओळख आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व सिक्कीम या पाच राज्यांसह भारताची एकूण १७५१ किमीची भूसीमा नेपाळला लागून आहे. भारताचे नेपाळसोबतचे संबंध केवळ भौगोलिक स्थानामुळे नसून, ते मैत्री व सहकार्याचे अनोखे नाते आहे. दोन्ही देशांची सीमा ही खुली आहे. भारतीय लोकांना नेपाळमध्ये जाण्यासाठी आणि नेपाळी नागरिकांना भारतात येण्यासाठी ‘व्हिसा’ (Visa)ची आवश्यकता नाही. नेपाळमध्ये अंदाजे सहा लाख भारतीय नागरिक निवासी म्हणून राहतात. त्यात प्रामुख्याने व्यापारी, व्यावसायिक व मजूर यांचा समावेश आहे. सोप्या शब्दांत भारत-नेपाळचे संबंध स्पष्ट करायचे म्हटल्यास ते एका प्रचलित म्हणीने सांगता येतील : भारत-नेपाळ संबंध म्हणजे ‘रोटी-बेटी का रिश्ता’.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-बांगलादेश संबंध; सहकार्याची क्षेत्रे

ब्रिटिशकालीन भारत-नेपाळ संबंध :

अठराव्या शतकाच्या मध्यास नेपाळमध्ये गोरखांचे राज्य होते. त्यादरम्यान नेपाळ शक्तिशाली आणि संपन्न राज्य होते. तसेच ते आपले राज्य वाढवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना उत्तरेत चीनच्या दिशेने विस्तार करणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनी दक्षिणेकडे विस्ताराचे धोरण स्वीकारले. गोरखांनी आपली सीमा वाढवली आणि सध्याचे सिक्कीम, तराई प्रदेश (अवध क्षेत्र, कुमाऊं) व गढवाल क्षेत्र (उत्तराखंड) काबीज केले. नेपाळच्या या विस्तारवादी धोरणांमुळे १८१४ मध्ये ब्रिटिश भारत आणि नेपाळ यांच्यात युद्ध सुरू झाले. त्यावेळी लॉर्ड हेस्टिंग्ज भारताचे गव्हर्नर जनरल होते. हेस्टिंग्जने नेपाळला तीनही (पूर्व, पश्चिम व दक्षिण) बाजूंनी वेढा घालण्याची योजना आखली.

कर्नल ऑक्टस्लोनीला सतलज नदीच्या बाजूने, मेजर जनरल मार्लेला पाटण्याकडून व जॉन वूडला गोरखपूरहून नेपाळच्या राजधानीकडे पाठवण्यात आले. हेस्टिंग्जने मेजर गिलेस्पीला मेरठहून कर्नल ऑक्टरलोनीला मदत करण्याचे निर्देश दिले. सुरुवातीला गोरखा सैनिकांनी ब्रिटिश सैन्याचा धैर्याने सामना केला. परंतु, एप्रिल १८१५ मध्ये गोरखा सैन्याची ताकद कमकुवत होऊ लागली. यावेळी ब्रिटिश अधिकारी कर्नल निकोलस व गार्नर यांनी अल्मोडा व कुमाऊं या प्रदेशांचा ताबा घेतला.

हेही वाचा – UPSC-MPSC : आंतरराष्ट्रीय संबंध : भारत-श्रीलंका संबंध; सहकार्याची क्षेत्रे

ऑक्टरलोनी याने मे १८१५ मध्ये गोरखा सेनापती अमरसिंह थापा यांच्याकडून मालोनचा किल्ला हिसकावून घेतला. युद्धादरम्यान इंग्रजांनी काही डोंगरी जमातींना त्यांच्या सैन्यात भरती केले; ज्यामुळे त्यांना युद्धात खूप मदत झाली. २८ फेब्रुवारी १८१६ पर्यंत कर्नल डेव्हिड ऑक्टरलोनीने मकबनपूर येथे गोरखा सैन्याचा पराभव केला. मकबनपूर येथील निर्णायक लढाईनंतर दोन्ही बाजूंमध्ये तहाच्या वाटाघाटी झाल्या आणि नेपाळ दरबारने मार्च १८१६ मध्ये सगौलीच्या तहाचा प्रस्ताव स्वीकारला. सगौलीच्या तहाने संघर्ष संपला. या तहातील पुढील अटी होत्या :

  • नेपाळने गढवाल व कुमाऊं हे जिल्हे, तसेच हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश इंग्रजांच्या स्वाधीन केला.
  • बहुतेक क्षेत्र इंग्रजांना देण्याचे मान्य केले. ब्रिटिश भारत आणि नेपाळ राज्यांची सीमा निश्चित करण्यात आली होती.
  • नेपाळने सिक्कीममधून आपले सर्व अधिकार काढून घेतले.
  • नेपाळची राजधानी काठमांडू येथे ब्रिटिश रहिवासी ठेवण्यास मंजूरी दिली.

सगौलीच्या तहाचा ब्रिटिशांना बराच फायदा झाला. नेपाळ हे ब्रिटिशांचे अनुकूल राज्य बनले. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात गोरखा लोक ब्रिटिश सैन्यात सामील होऊ लागले. त्याचा फायदा ब्रिटिशांना सैन्य अधिक बलशाली बनविण्यास मदत झाली. या तहानंतर शिमला, मसुरी आणि नैनितालही इंग्रजांना मिळाले.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc international relation india nepal relationship part 1 mpup spb