सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण भारत व कॅनडा या दोन देशांमधील संबंधांविषयीची माहिती घेतली. या लेखातून आपण भारत व कतार यांच्यातील संबंधांबाबत जाणून घेऊ या. दोन्ही देशांतील संबंध हे ऐतिहासिकदृष्ट्या जपलेले शतकानुशतके जुने संबंध आहेत. मोत्याचा व्यापार, पारंपरिक संबंध, मसाले, कापड व जनसंपर्क याद्वारे दोन्ही देश एकत्र आले. या शतकानुशतके जुन्या दुव्याने दोघांमधील सहकार्य आणि समन्वयावर आधारित संबंधांचा पाया म्हणून काम केले आहे. कतार हा केवळ एक प्रमुख ऊर्जा सुरक्षा आणि व्यापार भागीदार नसून, भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारा देश आहे.

भारत-कतार संबंधांचा इतिहास :

अरब द्वीपकल्पाबरोबर भारताचे घनिष्ठ आर्थिक संबंध होते; परंतु ब्रिटिश राजवटीत ते अधिक मजबूत झाले. ब्रिटिशांना केवळ आर्थिकदृष्ट्या भरभराट करायची नव्हती; तर सामरिक स्थितीही प्रस्थापित करायची होती. १८२० मध्ये अबुधाबीमध्ये एक संरक्षक राज्य स्थापन करण्यात आले. पुढील काही वर्षांमध्ये ओमान, कतार, कुवेत, बहरीन, दुबई आणि इतर देशांमध्ये संरक्षक राज्यांची स्थापना करण्यात आली; जी आज संयुक्त अरब अमिराती (UAE) म्हणून ओळखली जाते. ब्रिटिशांनी भारतातील ब्रिटिश अधिकार्‍यांच्या माध्यमातून आखाती अरब राज्यांचा कारभार चालवला आणि ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिकांनी त्या प्रदेशांना सुरक्षित केले. भारत आणि कतार यांच्यातील संबंध स्वातंत्र्यानंतर बदलले आहेत आणि ते अधिक मजबूत होत आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’ ही संघटना काय आहे? ती भारतासाठी महत्त्वाची का?

भारत-कतार राजकीय संबंध :

कतार आणि भारत यांनी १९७३ मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून दोन्ही देश राजकीय, आर्थिक, संरक्षण व सांस्कृतिक संबंधांसह अनेक प्रकारे गुंतले आहेत. अनेक उच्च-स्तरीय भेटींपासून ते लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असण्यापर्यंत, कतार-भारत द्विपक्षीय संबंध गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढले आहेत.

भारत-कतार व्यापार आणि गुंतवणूक :

कतारकडून भारताला मोठ्या प्रमाणात एलएनजीचा पुरवठा होतो; जो भारताच्या जागतिक आयातीपैकी ६५% आणि कतारच्या एलएनजीच्या निर्यातीपैकी १५% आहे. कतारच्या भारतातील प्रमुख निर्यातींमध्ये एलएनजी, एलपीजी, रसायने, पेट्रोकेमिकल्स, प्लास्टिक व अॅल्युमिनियम या वस्तूंचा समावेश आहे. भारताकडून कतारला होणाऱ्या प्रमुख निर्यातीत तृणधान्ये, तांबे, लोखंड व पोलादी वस्तू, भाज्या, फळे, मसाले व प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने, इलेक्ट्रिकल व इतर यंत्रसामग्री, प्लास्टिक उत्पादने, बांधकाम साहित्य, कापड व वस्त्रे, रसायने, मौल्यवान दगड व रबर यांचा समावेश आहे.

भारत-कतार सांस्कृतिक संबंध :

भारत आणि कतार यांच्यातील सांस्कृतिक संबंध खोलवर रुजलेले आहेत आणि दोन्ही बाजूंनी सक्रियपणे जोपासले गेलेले आहेत. कतारवासीय हे भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे कौतुक करतात. एप्रिल २०१२ मध्ये माजी अमीराच्या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी सांस्कृतिक सहकार्यावर एक करार केला होता. २०१९ हे वर्ष भारत-कतार सांस्कृतिक वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते.

कतारमधील भारतीय समुदाय :

कतारमध्ये सात लाखांहून अधिक भारतीय नागरिक राहतात. ते कतारमधील सर्वांत मोठा प्रवासी समुदाय आहेत आणि विविध व्यवसायांमध्ये गुंतलेले आहेत; जसे की अभियांत्रिकी, शिक्षण, वित्त, बँकिंग, व्यवसाय आणि मोठ्या संख्येने ब्ल्यू कॉलर कामगार. कतारमधील भारतीय प्रवासी समुदायाद्वारे भारतात पाठवणारे रेमिटन्स हे दरवर्षी सुमारे ७५० दशलक्ष डॉलर्स असण्याचा अंदाज आहे.

भारतासाठी कतारचे महत्त्व :

कतारमध्ये भारतीय हा सर्वांत मोठा प्रवासी समुदाय आहे. कतारमधून भारतीयांद्वारे पाठवले जाणारे पैसे आणि देशातील भारतीयांची सदभावना, सुरक्षितता यांमुळे कतार भारताच्या हितासाठी महत्त्वाचा आहे. कतार हा भारतासाठी एलएनजीचा सर्वांत मोठा पुरवठादार आहे. त्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी ते अत्यावश्यक आहे. आखाती सहकार्य परिषद (GCC )चे सदस्य असल्याने, कतार भारतासाठी विशेषत: काश्मीर मुद्द्यावर आपले हित जपण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. UNSC मध्ये कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या भूमिकेला कतारचा पाठिंबा आवश्यक आहे. आखाती प्रदेशातील स्थैर्य हे भारताच्या ऊर्जा आणि सागरी सुरक्षेच्या धोरणात्मक हिताचे आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-कॅनडा संबंध; व्यापार अन् आव्हाने

निष्कर्ष :

कतार आणि सर्व अरब देश हे भारताचे विस्तारित शेजारी आहेत; ज्यांच्याशी सौहार्दपूर्ण आणि अर्थपूर्ण प्रतिबद्धता केवळ देशांतर्गत मागणी आणि परदेशी भारतीयांच्या दृष्टिकोनातूनच नाही, तर जागतिक स्तरावर मजबूत उभे राहण्यासाठी, तसेच कायदेशीरपणा प्राप्त करण्यासाठीही आवश्यक आहे. जागतिक शांततेसाठी, तसेच या प्रदेशात आणि कतार, बहारीन इत्यादी राजेशाहीला रचनात्मकपणे सहभागी करून घेण्यास भारताने पुढाकार घ्यायला हवा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc international relation india qatar relation business history and political relation mpup spb
Show comments