सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण भारत आणि मालदीव या दोन देशांमधील संबंधाविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांतील संबंधाविषयी जाणून घेऊ या. सौदी अरेबिया हा देश पश्चिम आशियातील सर्वांत मोठा अरब देश आहे. शतकानुशतकांच्या जुन्या आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संबंधामुळे भारत आणि सौदी अरेबियामध्ये सौहार्दपूर्ण व मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. १९४७ साली दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दोन्ही बाजूंच्या नेतृत्वाने एकमेकांच्या देशांना भेटी दिल्या. त्यामुळे वेळोवेळी भारत – सौदी अरेबिया यादरम्यानचे संबंध मजबूत होण्यास मदत झाली.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-मालदीव संबंध; व्यापार आणि लष्करी सहकार्य

किंग सौद यांनी १९५५ मध्ये भारताला भेट दिली होती. तसेच पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही १९५६ मध्ये सौदी अरेबियाला भेट दिली होती. १९८२ मध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सौदी अरेबिया भेटीमुळे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत झाले. २००६ मध्ये किंग अब्दुल्ला यांच्या ऐतिहासिक भारत दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली. यावेळी दोन्ही देशांनी ‘दिल्ली घोषणापत्र’वर स्वाक्षरी केली. २०१० मध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सौदी अरेबियाला दिलेल्या भेटीमुळे धोरणात्मक भागीदारीच्या द्विपक्षीय प्रतिबद्धतेचा स्तर उंचावला. या भेटीदरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या ‘रियाध घोषणा’ने राजकीय, आर्थिक, सुरक्षा व संरक्षण क्षेत्रातील सहकार्य सृदृढ झाले.

आर्थिकदृष्ट्याही सौदी अरेबिया हा देश भारतासाठी फार महत्त्वाचा देश आहे. भारत आपल्या कच्च्या तेलापैकी सुमारे १८% भाग सौदी अरेबियाकडून आयात करतो. सौदी अरेबिया २०१७-१८ मध्ये २७.४८ अब्ज डॉलरच्या द्विपक्षीय व्यापारासह भारताचा चौथा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश होता. सौदी अरेबिया भारतात ऊर्जा, शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स आणि पायाभूत सुविधांपासून ते कृषी, खनिजे व खाणकाम या क्षेत्रांमध्ये सुमारे १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. सौदी अरेबिया भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील एका मोठ्या रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पातही सहभागी आहे. संरक्षण, सुरक्षा, व्यापार, संस्कृती, शिक्षण व लोकांशी संपर्क ही सौदी अरेबियासोबतच्या द्विपक्षीय सहकार्याची महत्त्वाची क्षेत्रे आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-ऑस्ट्रेलिया संबंध; द्विपक्षीय व्यापार अन् सहकार्याची क्षेत्रे

जसा सौदी अरेबिया भारतासाठी महत्त्वाचा ठरतो, तसाच भारतसुद्धा सौदी अरेबियासाठी एक महत्त्वाचा भागीदार देश आहे. सौदी अरेबियाला हौथी मिलिशिया सारख्या गटांच्या धोक्यांचा सामना करण्याचा मर्यादित अनुभव आहे, त्यामुळे अशा क्षेत्रात संयुक्त लष्करी प्रशिक्षण कार्यक्रम वाढवून अशा प्रकारच्या धोक्यांशी लढण्यासाठी सौदी अरेबिया भारताची मदत घेतो. दोन्ही देशांतल्या सशस्त्र दलांमधील सहकार्य सुधारण्यासाठी दोन्ही लष्करांदरम्यान दरवर्षी ‘AL-Mohed -AL’ नावाचा युद्धाभ्यास केला जातो.

आर्थिक संबंध

सौदी अरेबिया हा भारताचा चौथा (अमेरिका, चीन व यूएईनंतर) सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश आहे. दोन्ही देशांदरम्यान आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये द्विपक्षीय व्यापार ४२.८ अब्ज डॉलर इतका होता. या कालावधीत सौदी अरेबियातून भारताची आयात ३४.०१ अब्ज डॉलर आणि सौदी अरेबियाची निर्यात ८.७६ अब्ज डॉलर इतकी होती; जी गेल्या वर्षाच्या तुलनेत ४९.५ % नी वाढली. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सौदी अरेबियासोबतचा एकूण व्यापार भारताच्या एकूण व्यापाराच्या ४.१४ % इतका होता.

भारतातून सौदी अरेबियाला निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तूंमध्ये अभियांत्रिकी वस्तू, तांदूळ, पेट्रोलियम उत्पादने, रसायने, कापड, खाद्यपदार्थ, सिरॅमिक टाइल्स यांचा समावेश होतो. तर, सौदी अरेबियातून भारतासाठी कच्चे तेल, एलपीजी, खते, रसायने, प्लास्टिक आणि त्यांची उत्पादने या प्रमुख वस्तू आयात होणात. मार्च २०२१ च्या अधिकृत आकडेवारीनुसार सौदी अरेबिया हा भारतातील १७ वा सर्वांत मोठा गुंतवणूकदार आहे; ज्याची गुंतवणूक ३.२३ अब्ज डॉलर एवढी होती.

हज यात्रा हा भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. सौदी अरेबियामधील २.६ दशलक्ष भारतीय समुदाय हा त्या देशातील सर्वांत मोठा प्रवासी समुदाय आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया भेटीदरम्यान ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिल’ची स्थापना करण्यात आली होती. सद्य:स्थितीत भारताची सौदी अरेबियासोबत २५.२५ अब्ज डॉलरची व्यापारी तूट (Trade Defecit) आहे. ही तूट भरून काढण्यासाठी भारताने विविध क्षेत्रांतील निर्यातीला चालना देण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc international relation india saudi arabia relationship business and cooperation mpup spb
Show comments