सागर भस्मे
India Sri Lanka Relations : मागील लेखातून आपण भारत-भूतान संबंधांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारत व श्रीलंका यांच्यातील संबंधांचा इतिहास आणि पार्श्वभूमीबाबत जाणून घेऊ या. श्रीलंका हे भारताच्या दक्षिणेस असलेले पाल्कच्या सामुद्रधुनीने विभागलेले हिंदी महासागरातील एक बेट आहे. दोन्ही देशाचे संबंध केवळ भौगोलिक कारणाने जुळलेले आहेत, असे नाही; तर त्यात पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, संस्कृती व संरक्षण क्षेत्रात असलेले सहकार्य महत्त्वाचे ठरते.
हेही वाचा – UPSC-MPSC : आंतरराष्ट्रीय संबंध : परराष्ट्र धोरण आणि त्याचे निर्धारक
भारताचे श्रीलंकेसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध हे जवळपास २,५०० वर्षांपासूनचे आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे सम्राट अशोकाचा मुलगा ‘महेंद्र’ व मुलगी ‘संघमित्रा’ यांना बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत पाठवण्यात आले होते. याच काळात भारतातून श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रसार झाला. त्याहीपूर्वी भारत-श्रीलंका संबंधांचा उल्लेख रामायणात आढळतो. एकेकाळी श्रीलंकेवर अनेक राजांनी आणि राजेशाही घराण्यांनी सत्ता गाजवली. त्यानंतर युरोपियनचा प्रभाव होता. शेवटी १९४८ मध्ये ब्रिटिशांच्या वसाहतवादातून स्वतंत्र होऊन श्रीलंकेची स्थापना झाली.
भौगोलिक स्थानामुळे भारताच्या दक्षिण भागात विशेषतः तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या उत्तरेकडील जाफना या भागात तमिळी लोक राहत असत. ब्रिटिश काळातच ब्रिटिशांच्या धोरणांना वैतागून या तमीळ लोकांनी मोठ्या प्रमाणात
श्रीलंकेच्या उत्तरेकडील भागात स्थलांतर केले. श्रीलंकेमध्ये सिंहली व तमीळ हे दोन प्रमुख वांशिक गट आहेत. तत्कालीन सिंहली वर्चस्व असलेल्या श्रीलंका सरकारकडून तमिळी लोकांचा सतत भेदभाव, हिंसक छळ होत होता. त्यातूनच १९७६ मध्ये वेल्लुपिल्लई प्रभाकरन यांनी श्रीलंकेत स्वतंत्र तमीळ भाषिक राष्ट्रासाठी लढणारी एल.टी.टी.ई. नावाची संघटना सुरू केली. एल.टी.टी.ई. बेटाच्या ईशान्येला तमीळ इलम नावाचे स्वतंत्र तमीळ राज्य निर्माण करण्यासाठी लढले.
हेही वाचा – UPSC-MPSC : आंतरराष्ट्रीय संबंध : भारत-भूतान संबंध
श्रीलंकेतील या तमीळ अतिरेकी फुटीरतावादामुळे भारत-श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संबंध बिघडले. १९८७ च्या भारत-श्रीलंका कराराने राजकीय तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी संविधानात १३ वी घटनादुरुस्ती केली गेली. त्याद्वारे ‘ऑपरेशन पवन’अंतर्गत भारताने श्रीलंकेत भारतीय शांतता रक्षक दल तैनात केले. राजीव गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधानांच्या काळात या फुटीरवादी गटाविरुद्ध घेतलेल्या अशा काही धोरणांमुळे एलटीटीई संघटनेच्या लोकांनी १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या केली. श्रीलंकेच्या स्थापनेपासून १९९१-९२ च्या काळापर्यंत भारत-श्रीलंकेदरम्यान संघर्ष राहिला. नंतर हळूहळू संबंध सुधारत गेले. श्रीलंकन सरकारने भारताकडून मदत घेत शेवटी २००९ पर्यंत एलटीटीई या फुटीरवादी गटाला समूळ नष्ट केले.