सागर भस्मे

मागील लेखातून आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बॅंक व जागतिक व्यापार संघटना काय आहेत? त्या का स्थापन करण्यात आल्या आणि त्यांच्या कार्यांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण जागतिक आरोग्य संघटना नेमकी काय आहे? ती केव्हा सुरू झाली आणि त्यामागचा उद्देश काय होता? याबाबत सविस्तर जाणून घेऊ. जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी करण्यात आली. या संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जीनेव्हा येथे आहे. ही संघटना आरोग्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याने कार्य करणारी एक संस्था असून, ती संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेचा आणि पॅरिस येथील ‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालया’चा वारसा पुढे चालवीत आहे. ‘आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रण कार्य करणे’ हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे. सध्या या संस्थेचे प्रमुख डॉ. तेद्रोस अधानोम घेब्रेयेसास हे आहेत.

Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
readers feedback on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : उत्तर निसर्गकेंद्री विकासाचे…

हेही वाचा – UPSC-MPSC : जागतिक बँक ही संस्था काय आहे? ती स्थापन करण्यामागे उद्देश काय होता?

दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीच्या वेळी आंतरराष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात निरनिराळ्या संस्था कार्य करीत होत्या. या संस्थांचा थोडक्यात आढावा घेऊ.

१) संयुक्त राष्ट्रांची साह्य़ व पुनर्वसन संघटना (UNRRA) : ही संघटना तात्पुरत्या स्वरूपाची होती. आरोग्य संरक्षण एवढे एकच उद्दिष्ट तिच्यापुढे नव्हते; तर ती इतर अनेक प्रकारची कार्ये करीत असे.

२) संयुक्त राष्ट्रांची आरोग्य संघटना : त्यावेळी संयुक्त राष्ट्रांची एक आरोग्य संघटना होती; मात्र ती अगदीच वेगळी पडल्यासारखी होती. तिचे कर्मचारी अगदीच जुजबी होते आणि तिची प्रतिष्ठाही कमी झालेली होती.

३) अमेरिकेतील आरोग्यविषयक माहिती पुरविणारी संस्था : या संस्थेचे क्षेत्र अमेरिकेपुरतेच मर्यादित होते.

दरम्यान, अशा परिस्थितीत जागतिक पातळीवर काम करणारी एखादी आरोग्यविषयक संघटना उभी करणे गरजेचे होते. अखेर १९४६ मध्ये जागतिक आरोग्य संघटना नावाची एक तात्पुरती संघटना स्थापन करण्यात आली. तसेच संयुक्त राष्ट्रांतील २६ राष्ट्रांची संमती मिळताच तिला कायम स्वरूप देण्यात आले. १९४८ मध्ये आंतरराष्ट्रीय मंजुरीने ही यंत्रणा कायम झाली. संयुक्त राष्ट्रांनी विविध कार्यांकरिता उभारलेल्या संघटनांपैकी ही एक संघटना असून, तिला तिच्या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांवरून डब्ल्यू.एच.ओ. (WHO), असे म्हटले जाते.

जागतिक आरोग्य संघटनेचे ध्येय :

जगाच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, त्यापैकी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही फार महत्त्वाची घटना होय. या घटनेमध्ये जे विस्तृत व उदार ध्येय ठरविण्यात आले, त्यात आधुनिक आरोग्यविषयक व सामाजिक असे सर्व महत्त्वाचे प्रश्न अंतर्भूत करण्यात आले होते. अशा प्रकारची जागतिक संघटना प्रथमच स्थापन झाली असून, तिच्या घटनेच्या प्रास्ताविकात तिचे ध्येय नमूद करण्यात आली आहे. ते खालीलप्रमाणे :

  • आरोग्य म्हणजे केवळ ‘रोगांचा अभाव’ असे नसून, त्यात जनतेच्या मानसिक व सामाजिक आरोग्याचा अंतर्भाव होतो.
  • आरोग्यविषयक प्रश्नांमध्ये सर्व राष्ट्रे परस्परावलंबी आहेत.
  • बालकांचे पालन, पोषण व विकास या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असून, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे.
  • आरोग्यविषयक कार्यांत जनतेचे सहकार्य मिळविण्यासाठी लोकशिक्षणाची फार गरज आहे.
  • आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्‍क असून, सर्व शासनसंस्थांनी या हक्काचे शक्य त्या प्रयत्नांनी जतन केले पाहिजे.

जागतिक आरोग्य संघटनेची रचना

जागतिक आरोग्य संघटनेचे कार्य हे काही विभागांमार्फत चालते. त्यातील महत्त्वाचे विभाग खालीलप्रमाणे :

१) जागतिक आरोग्य सभा (संसदेच्या स्वरूपाची) : ही सभा वर्षातून एकदा भरते. सभेला प्रत्येक सभासद राष्ट्राने तीन प्रतिनिधी पाठवावयाचे असतात. या सभेत संघटनेचे सर्वसाधारण धोरण व अर्थसंकल्प ठरविणे, ही कामे होतात.

२) कार्यकारी मंडळ (मंत्रिमंडळाच्या स्वरूपाचे) : हे मंडळ ठरलेल्या धोरणांची अंमलबजावणी करते आणि अर्थसंकल्प तयार करते. या मंडळात २४ देशांचे प्रतिनिधी असून, त्यातील आठ जण आळीपाळीने दरवर्षी निवृत्त होतात; परंतु ते फेरनिवडणुकीस पात्र असतात.

३) सचिवालय (प्रत्यक्ष कार्य करणारे कर्मचारी) : हे सचिवालय एका प्रमुख संचालकाच्या हाताखाली असून, त्याच्या मदतीकरिता इतर कर्मचारी नेमलेले असतात. हे कर्मचारी व प्रमुख कोणत्याही देशातून घेतले जातात. निवड झाल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा दर्जा प्राप्त होतो.

संघटनेचे कार्य इंग्रजी व फ्रेंच या भाषांतून चालते. त्याशिवाय रशियन, चिनी व स्पॅनिश या तीन भाषांनाही मान्यता देण्यात आली आहे. सर्वसाधारण धोरण व कार्यव्यवस्था जरी जीनेव्हा येथील मुख्य कार्यालयाकडे असली तरी सर्व महत्त्वाचे कार्य प्रादेशिक केंद्रांमार्फत चालते.

जागतिक आरोग्य संघटनेची कार्येजागतिक आरोग्य संघटनेच्या घटनेतील पहिल्या कलमामध्ये ‘जगातील सर्व लोकांना शक्य तेवढे अधिकाधिक आरोग्यविषयक मदत करणे हे जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट आहे’, असे नमूद करण्यात आले आहे. या उद्दिष्टानुसार संघटनेचे सर्व कार्य चालते. संघटनेमार्फत होणारे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे राष्ट्रांना विविध प्रकारे साह्य़ करणे होय. हे साह्य़ खालील स्वरूपाचे असते :

  • राष्ट्रीय आरोग्य सेवेला मजबुती आणण्यासाठी मदत करणे.
  • आरोग्य कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी शिक्षण साह्य़ प्रदान करणे.
  • राष्ट्रातील प्रमुख रोगांच्या निवारणार्थ मदत करणे.
  • माता व बालके यांच्या आरोग्य रक्षणाकरिता साह्य़ करणे.
  • पाणीपुरवठा आणि इतर स्वच्छताविषयक कार्यांसाठी साह्य़ प्रदान करणे.
  • मानसिक आरोग्य प्रवर्तक साह्य़ करणे.

एखाद्या राष्ट्राकडून साह्य़ाकरिता मागणी येताच जागतिक आरोग्य संघटनेमार्फत त्या विषयाचा अभ्यास केला जातो. तेथील शासनाच्या एकट्या प्रयत्नाने तो सुटणार नाही, अशी खात्री झाल्यानंतरच त्या राष्ट्रातील आरोग्याधिकाऱ्यांबरोबर विचारविनिमय करून एक आराखडा तयार करण्यात येतो. हा आराखडा संबंधित प्रादेशिक केंद्रामार्फत मध्यवर्ती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येतो. सभेने मान्यता दिल्यानंतर त्या विषयाकरिता एक तपशीलवार योजना तयार करण्यात येते. त्यानंतर गरजेनुसार मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रादेशिक कार्यालयाला तज्ज्ञ पुरविण्यात येतात आणि मध्यवर्ती कार्यालयाच्या सूचनांनुसार प्रत्यक्ष कार्यास सुरुवात होते. या कार्यात संघटना कर्मचारी आणि स्थानिक आरोग्याधिकारी सहभागी असतात. हाती घेतलेले कार्य चालू ठेवण्याची जबाबदारी त्या राष्ट्राच्या शासनावर असते.

जागतिक आरोग्य संघटनेची प्रकाशने

संघटनेमार्फत खालील प्रकाशने प्रसिद्ध होतात :

१) बुलेटिन ऑफ द ‘WHO’ : संशोधनापासून उपलब्ध झालेल्या नवीन ज्ञानक्षेत्रांचे वर्णन, विविध प्रयोगशाळांतून चालू असलेल्या व प्रत्यक्ष झालेल्या संशोधनकार्याची माहिती यात देण्यात येते.

२) ‘WHO’ क्रॉनिकल : दरमहा प्रसिद्ध होणाऱ्या या प्रकाशनात संघटनेमार्फत चालू असलेल्या कार्याची माहिती, वैद्य व आरोग्य कर्मचारी यांना उपयुक्त अशी आधुनिक प्रगतीसंबंधीची माहिती देण्यात येते. हे प्रकाशन पाचही अधिकृत भाषांत प्रसिद्ध होते.

३) इंटरनॅशनल डायजेस्ट ऑफ हेल्थ लेजिस्लेशन : दर तिमाहीस प्रसिद्ध होणाऱ्या या प्रकाशनात विविध देशांतील आरोग्यविषयक महत्त्वाच्या कायद्यांचे इंग्रजी व फ्रेंच भाषांतून समीक्षण केले जाते.

(४) सांसर्गिक रोग व जन्म-मृत्यूविषयक माहिती देणारा हा वृत्तांत : हा दरमहा इंग्रजी व फ्रेंच भाषांत प्रसिद्ध होतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : जागतिक व्यापार संघटना कधी स्थापन झाली? ती स्थापन करण्यामागे नेमका उद्देश काय होता?

जागतिक आरोग्य संघटनेचे इतर आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंध :

जागतिक आरोग्य संघटना आपले कार्य हे इतर आंतराष्ट्रीय संघटनांच्या सहकार्याने पार पडत असते. त्यामधील काही प्रमुख संस्था खालीलप्रमाणे :

१) संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी : या निधीमार्फत होणाऱ्या कार्याला संघटनेची तांत्रिक संमती मिळविण्यात येते. हे कार्य गर्भवती स्त्रिया व बालकांचे आरोग्य, क्षयप्रतिबंधक लस, हिवताप प्रतिबंधक विरोधी मोहीम आणि पोषण यांवर केंद्रित केलेले असते.

२) आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेशी सहकार्य : कारखान्यांतील कामगारांचे आरोग्य, खलाशांचे आरोग्य व जहाजांतील आरोग्य व्यवस्था, आरोग्य विमा योजना व इतर सामाजिक विमा योजना यांविषयी कार्य केले जाते. जागतिक अन्न व शेती संघटनेच्या सहकार्याने इतर पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांपासून मानवाला होणाऱ्या सांसर्गिक रोगांबद्दल, तसेच पोषण व खेड्यांतील जनतेचे आरोग्यरक्षण ही कार्येही संघटना करते. यांशिवाय अनेक बिनसरकारी आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर संघटना सहकार्य करते आणि त्यांना अधिकृत मान्यता देते. त्यांपैकी काही म्हणजे आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग संस्था, आंतरराष्ट्रीय कर्करोगविरोधी संघ, जागतिक वैद्यकीय संघटना, जागतिक पशुवैद्यक संघटना वगैरे.

Story img Loader