Agnibaan Rocket Launch Indian Space Sector : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) ‘अग्निबाण’चे यशस्वी प्रक्षेपण
अग्निकुल कॉसमॉस या खासगी अंतराळ कंपनीने गेल्या आठवड्यात आपल्या स्वदेशी बनावटीच्या रॉकेटचे पहिले यशस्वी प्रक्षेपण केले आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रात इतिहास घडवला. ही घटना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अंतराळ क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होती.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील अणुऊर्जा, अलीकडील मोहिमांसह अंतराळ तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, डार्क मॅटर, हिग्स बोसॉन, जीएम क्रॉप्स, चालू घडामोडी आणि आयटी, अंतराळ, संगणक, रोबोटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रातील जागरूकता या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
अग्निबाण नेमकं काय आहे?
अग्निबाणची वैशिष्ट्ये कोणती?
अग्निबाण रॉकेटची निर्मिती कुणी केली?
भारतीय अंतराळ मोहीम
तुमच्या माहितीसाठी :
भारतीय अंतराळ स्टार्टअप कंपनी अग्निकुलचे अग्निबाण हे जगातील पहिले ३-डी प्रिंटेड इंजिनाद्वारे समर्थित रॉकेट आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात देशातील एकमेव खासगी लॉंचपॅड वापरून हे रॉकेट लॉंच केले गेले. हे रॉकेट ३० ते ३०० किलो वजनाचे उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेपर्यंत वाहून नेण्यास सक्षम आहे.
स्कायरूट कंपनीच्या विक्रम रॉकेटमध्येदेखील समान क्षमता आहे. स्कायरूट व अग्निकुल या दोन्ही कंपन्या आपत्ती व्यवस्थापन, हवामान बदल, पृथ्वी आणि महासागर निरीक्षण करणार्या अब्जावधी डॉलर्सच्या लघु उपग्रह प्रक्षेपण मार्केटवर लक्ष्य केंद्रित करत आहेत. हे उपग्रह सहसा अवकाश संशोधन किंवा वैज्ञानिक प्रयोगांसाठी नसतात.
अग्निबाण रॉकेटचे सेमी-क्रायोजेनिक इंजिन पूर्णपणे ३-डी प्रिंटेड आहे. इंजिनामध्ये कोणतेही घटक किंवा हलणारे भाग नाहीत. या इंजिनामध्ये वेल्डिंग आणि फ्युजिंगही नाहीत. स्पेस हार्डवेअरमध्ये ३-डी प्रिंटिंगचा वापर करणे ही काही नवीन कल्पना नाही. परंतु, ३-डी प्रिंटेड असलेले संपूर्ण इंजिन अद्याप कोणीही वापरलेले नाही. त्यामुळे या कंपनीने रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे.
३-डी प्रिंटिंग कार्यक्षमता वाढवू शकते, खर्च कमी करू शकते आणि त्यामुळे चुकीच्या घटना घडण्याची शक्यता कमी होऊ शकते. या इंजिनामध्ये वायरिंग, वेल्डिंग आदी गोष्टी नसल्यामुळे त्रुटी कमी आढळतात. अग्निबाणमध्ये असणार्या इंजिनाचे नाव अग्निलेट आहे.
भारतीय खासगी कंपनीने भारतीय भूमीवरून रॉकेट उडविण्याची ही पहिलीच वेळ नाही. नोव्हेंबर २०२२ मध्ये स्कायरूट एरोस्पेस या स्टार्ट-अप कंपनीने अग्निकुलप्रमाणेच एक रॉकेट यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले; ज्याला त्यांनी ‘विक्रम’ असे नाव दिले.
भारतात अवकाश संशोधनाचे महत्त्व रुजविणारे विक्रम साराभाई यांच्या नावावरून या रॉकेटला विक्रम हे नाव देण्यात आले.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
२) आरोग्य विम्यांच्या नियमातील बदल
भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (आयआरडीएआय)द्वारे आरोग्य विमा पॉलिसींच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ आरोग्य, शिक्षण, मानवी संसाधने, गरिबी आणि भूक यांच्याशी संबंधित सामाजिक क्षेत्र/सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
आरोग्य विम्यासंदर्भातील नवीन नियम काय?
भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण
तुमच्या माहितीसाठी :
पॉलिसीधारकांची फसवणूक करू नये यासाठी भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने पॉलिसीधारकांच्या सुविधेसाठी विमा नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ही संस्था विमा कंपन्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवते आणि आरोग्य विम्यासंबंधित नवनवीन नियम जारी करते.
भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणानुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यापासून तीन तासांच्या आत विमा कंपन्यांना रुग्णाकडून केला गेलेला दावा निकाली काढावा लागणार आहे.
कोणत्याही परिस्थितीत पॉलिसीधारकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची वाट पाहण्यास भाग पाडले जाणार नाही. तीन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, रुग्णालयाकडून आकारण्यात येणारी अतिरिक्त रक्कम विमा कंपन्यांना भागधारकांच्या निधीतून द्यावी लागेल.
उपचारांदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, विमा कंपनीला लवकरात लवकर रुग्णाच्या कुटुंबीयांकडून केला गेलेला दावा निकाली काढावा लागेल.
सर्व वयोगटांतील व्यक्तींसह सर्व प्रकारच्या वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींना आता आरोग्य विमा देणे शक्य होणार आहे.
विमाकर्त्यांने पॉलिसीधारकाला प्रत्येक पॉलिसी कागदपत्रासह ग्राहक माहिती पत्रक (सीआयएस) प्रदान करणे आवश्यक असणार आहे.
पॉलिसीधारकाला दावा सेटलमेंटसाठी कोणतेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही; त्याऐवजी विमा कंपन्यांना रुग्णालयातून आवश्यक ती कागदपत्रे मिळवावी लागतील.
पॉलिसीधारकांनी विमा लोकपालाकडे एखाद्या विमा कंपनीची तक्रार केल्यास ३० दिवसांच्या आत लोकपालाने दिलेल्या आदेशानुसार विमा कंपन्यांना अंमलबजावणी करावी लागेल. दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास विमा कंपनीला पॉलिसीधारकाला दररोज ५,००० रुपये द्यावे लागतील.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…