UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘अपार क्रमांक’
‘वन नेशन वन स्टुडंट आयडी’ योजनेअंतर्गत देशभरातील शालेय विद्यार्थ्यांचा ‘अपार क्रमांक तयार केला जाणार आहे. त्याबाबतचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता शाळा, शिक्षक, पालकांमध्ये ‘अपार क्रमांका’ची चर्चा सुरू झाली आहे.
हा विषयी यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील शासन धोरण या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ‘अपार क्रमांक’ नेमका काय आहे? ‘अपार क्रमांक’ तयार करण्यामागचा उद्देश काय? यासंदर्भातील माहिती असणे गरजेचं आहे.
तुमच्या माहितीसाठी :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आता देशभरातील विद्यार्थ्यांचे ‘अपार क्रमांक’ (ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडेमिक रेजिस्ट्री) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या अपार क्रमांकाद्वारे विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक दिला जाईल. अपार क्रमांकातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल पद्धतीने साठवण्यात येऊन ऑनलाइन उपलब्ध राहील. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर देखरेख करता येईल. नव्या शैक्षणिक धोरणासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे ‘युनिक आयडी’ गरजेची मानून, विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकावरूनच पालकांच्या संमतीने ‘अपार क्रमांक’ तयार केला जाणार आहे. शाळा स्तरावर ‘अपार क्रमांक’ तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पालकांना संमतीपत्र भरून द्यावे लागणार आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचा लेख :
२) ‘चर्च ऑफ सेंट पोर्फेरियस’ची नासधूस
काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या हल्ल्यात गाझा शहरातील सर्वांत जुन्या चर्चचे नुकसान झाले होते. तसेच या हल्ल्यामुळे चर्चमध्ये आश्रय घेतलेल्या एकूण १६ जणांचा मृत्यूही झाला होता.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील कला आणि संस्कृती तसेच इतिहास या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे गाझा शहरातील या सर्वांत जुन्या चर्चचे महत्त्व काय? या हल्ल्यामुळे नेमके काय नुकसान झाले? हे जाणून घेणे गरजेचं आहे.
तुमच्या माहितीसाठी :
जुन्या गाझातील झायतू क्वार्टर परिसरात हे चर्च आहे. साधारण इसवी सन ४२५ मध्ये इमारतीला चर्च म्हणून मान्यता देण्यात आली होती. ख्रिस्ती धर्मगुरू सेंट पोर्फेरियस यांच्या नावावरून या चर्चला ‘चर्च ऑफ सेंट पोर्फेरियस’ असे नाव देण्यात आले. पोर्फेरियस यांची समाधी आजही या चर्चच्या परिसरात पाहायला मिळते. सेंट पोर्फेरियस यांचा जन्म ग्रीसमध्ये इ.स. ३४७ मध्ये थेस्सालोनिकी येथे झाला होता. सेंट पोर्फेरियस हे इसवी सन ३९५ ते इसवी सन ४२० म्हणजेच आपल्या मृत्यूपर्यंत गाझाचे बिशप होते. मार्क द डीकॉन यांनी लिहिलेल्या व्हिटा पोर्फीरी पुस्तकात सेंट पोर्फेरियस यांच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. सेंट पोर्फेरियस यांनी गाझा या भागात ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार केला.
सेंट पोर्फेरियस यांच्या मृत्यूच्या पाच वर्षांनंतर त्यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच ठिकाणी ‘चर्च ऑफ सेंट पोर्फेरियस’ या चर्चच्या उभारणीस सुरुवात करण्यात आली. मात्र, सातव्या शतकाच्या उत्तरार्धात या चर्चचे रुपांतर मशिदीत करण्यात आले. पुढच्या पाचशे वर्षांपर्यंत ही वास्तू मशीदच होती. मात्र, १२ व्या शतकात ख्रिस्ती धर्मीयांनी या वास्तूवर आपला हक्क सांगितला. त्या वास्तूची पुन्हा चर्चमध्ये पुनर्बांधणी करण्यात आली. या चर्चचे शेवटचे नूतनीकरण १८५६ साली करण्यात आले होते.
यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख :
३) केरळमधील बॉम्बस्फोट
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात केरळमधील कलमस्मेरी येथील ख्रिश्चन समाजाच्या ‘झामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडली. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक जखमी झाले. या सेंटरमध्ये ‘यहोवाचे साक्षीदार’ (Jehovah’s Witnesses) या पंथाची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील कला व संस्कृती आणि सामान्य अध्ययन पेपर ३ मधील अंतर्गत सुरक्षा या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
‘यहोवाचे साक्षीदार’ हा ख्रिश्चनांमधीलच एक पंथ आहे, पण ते ख्रिश्चनांच्या पवित्र त्रक्याला (Holy Trinity) (पवित्र त्रक्याच्या सिद्धांतानुसार, पिता, पुत्र (ख्रिस्त) आणि पवित्र आत्मा यामध्ये तीन लोकांमध्ये देव समप्रमाणात वसलेला आहे). हा पंथ फक्त यहोवा या एकाच देवाला मानतो. केवळ यहोवाच एकमात्र खरा, सर्वशक्तिमान देव आणि जगाचा निर्माता असल्याचे त्यांचे मानणे आहे. अब्राहम, मोसेस आणि ख्रिस्त यांचाही तोच देव असल्याचे यहोवा सांगतात.
यहोवा पंथाच्या मते, येशू ख्रिस्त हा स्वर्गातील देवांच्या राज्याचा राजा आहे, पण तो सर्वशक्तिमान देव नाही. बायबलमधील काही मजकुराला यहोवाचे साक्षीदार प्रमाण मानतात आणि त्यालाच देवाचे वचन म्हणून पाळतात. यहोवाचे साक्षीदार नाताळ, इस्टर असे ख्रिस्ती सण साजरे करत नाहीत. त्यांच्या मते हे सण मूर्तिपूजक संस्कृतीतून पुढे आलेले आहेत.
अमेरिकेमध्ये १८७० च्या दशकात पाद्री चार्ल्स टेझ रसेल यांनी सुरू केलेल्या बायबल विद्यार्थी चळवळीतून या पंथाचा उगम झाला असल्याचे सांगितले जाते. यहोवाच्या साक्षीदारांचे नियामक मंडळ वॉर्विक, न्यूयॉर्क येथे आहे. पंथाच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणारी मुख्य संस्था ज्याचे नाव “वॉच टॉवर बायबल अँड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेनसिल्व्हेनिया” असून त्याचेही मुख्यालय वॉर्विकमध्ये आहे.
याशिवाय भारतात ‘यहोवाचे साक्षीदार’ पंथाच्या अनुयायांची संख्या किती? बिजोय इमॅन्युएल प्रकरण नेमकं काय आहे? यासंदर्भातील माहिती असणेही गरजेचं आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख:
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.