What is Apple ReALM : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) ॲपलचे ReALM
ॲपलने नवीन ‘एआय’ तंत्रज्ञान विकसित केले असून ते चॅटजीपीटीपेक्षाही अधिक सक्षम आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
ॲपलने स्वत:चे असे नवीन ‘एआय’ मॉडेल तयार केले असून त्यासंबंधीची संशोधन पत्रिका कंपनीच्या संकेतस्थळावरून नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. ‘रेफरन्स रिझोल्युशन ॲज लँग्वेज मॉडेलिंग’ (री-एएलएम) असे या तंत्रज्ञानाचे प्राथमिक नाव आहे. ‘री-एएलएम’ तंत्रज्ञान फोनच्या किंवा संगणकाच्या स्क्रीनचे छोटेछोटे कप्पे करून त्यातील चित्रे, चिन्हे किंवा मजकूर यांचे वर्गीकरण करून त्यांचे एका शाब्दिक स्वरूपात पृथःकरण करते. त्यामुळे जेव्हा वापरकर्ता ‘हे काय आहे’ किंवा ‘याचा अर्थ काय’ अशा स्वरूपाच्या दर्शक विचारणा करतो, तेव्हा हे तंत्रज्ञान गोळा केलेल्या माहितीतून अचूक तपशील ‘सिरी’ला पुरवते. त्यामुळे वापरकर्त्याला नेमके काय हवे आहे, हे ‘सिरी’ला त्वरित जाणता येते.
‘री-एएलएम’ हे तंत्रज्ञान ॲपलच्या ‘सिरी’ एआय असिस्टंटचा वापरकर्त्याशी असलेला संवाद स्पष्ट करण्यात मदत करते. आयफोन किंवा मॅकच्या स्क्रीनवर दर्शवण्यात येत असलेला मजकूर आणि त्याक्षणी त्या उपकरणावर कार्यरत असलेले इतर ॲप किंवा टास्क यांना विचारात घेऊन वापरकर्त्याला काय अपेक्षित आहे, याबाबत हे तंत्रज्ञाना ‘सिरी’ला सूचना देते. त्यामुळे आयफोनच्या स्क्रीनवर सुरू असलेल्या एखाद्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कलाकाराचे नाव काय आहे किंवा एखाद्या चित्रातील ठिकाण कोणते आहे, याबाबत केवळ सूचक प्रश्न विचारूनही वापरकर्ता त्याबद्दलची माहिती ‘सिरी’कडून मिळवू शकतो. त्यासाठी त्याला त्या चित्राचे वर्णन करण्याची गरज भासत नाही. याशिवाय स्क्रीनवर दिसत असलेल्या वेबसाइटवर दिसणाऱ्या मोबाइल क्रमांक डायल करण्यासाठी केवळ ‘कॉल हिम/हर’ असे सांगताच ‘सिरी’ त्या क्रमांकाशी संपर्क साधून देऊ शकते.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
२) न्यूझीलंडच्या व्हिसा नियमांमधील बदल
न्यूझीलंड सरकार स्थलांतरितांसाठी व्हिसा नियम कडक करीत आहे. देशातील परदेशी कामगारांची वाढती संख्या बघता, न्यूझीलंडने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा भारतीयांवरही मोठा परिणाम होणार आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामन्य अध्ययन पेपर २ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे न्यूझीलंडच्या व्हिसा नियमांमध्ये नेमका काय बदल झाला आहे? याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
कोविड-१९ साथीच्या आजारानंतर कामगारांची कमतरता भरून काढण्यासाठी २०२२ च्या मध्यात अॅक्रेडिटेड एम्प्लॉयर वर्क व्हिसा (AEWV) सुरू करण्यात आला होता. इमिग्रेशन मिनिस्टर एरिका स्टॅनफोर्ड यांनी या व्हिसा नियमांमध्ये बदल जाहीर केले. त्यानुसार, अर्धकुशल नोकर्यांसाठी इंग्रजी भाषेची आवश्यकता, वर्क व्हिसासाठी किमान कौशल्ये आणि कामाचा अनुभव असणे आवश्यक, अर्धकुशल नोकर्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य, व्हिसाचा कालावधी पाच वर्षांवरून तीन वर्षांपर्यंत कमी, फ्रँचायझी मान्यता श्रेणी रद्द, कामगारांना कामावर ठेवण्यासाठी कंपन्यांनी योग्य निकषांचे पालन करणे आवश्यक, असे काही बदल न्यूझीलंड सरकारकडून करण्यात आले आहे.
एका अहवालानुसार, २०२३ मध्ये एक लाख ७३ हजार स्थलांतरित नागरिक न्यूझीलंडमध्ये आले आणि त्यात ३५ टक्के नागरिक भारतीय होते. नोकरी आणि शिक्षणासाठी अनेक भारतीय न्यूझीलंडला जाणे पसंत करतात. शिक्षणासाठी न्यूझीलंडला गेलेले भारतीय अर्धवेळ नोकरीही करतात. त्यामुळे या नियमांचा परिणाम भारतीयांवरही होणार आहे. न्यूझीलंडने आपल्या व्हिसा नियमात केलेल्या बदलांमागचा मुख्य उद्देश स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…