UPSC Key In Marathi : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) १६व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी प्रा. अरविंद पानगडिया यांची नियुक्ती
केंद्र सरकारने १६ व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी प्रा. अरविंद पानगडिया यांची नियुक्ती केली आहे. देशात सध्या १५व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ सुरू आहे. हा कार्यकाळ २०२६ मध्ये संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने स्थापन केलेला १६वा वित्त आयोग २०२६-२७ ते २०३०-३१ या पुढील वर्षासाठी शिफारसी देणार आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील विविध घटनात्मक पदांवरील नियुक्ती, अधिकार, कार्ये आणि जबाबदाऱ्या या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे वित्त आयोग म्हणजे नेमकं काय? आणि हा आयोग कशाप्रकारे काम करतो? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
वित्त आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. ही संस्था राज्यघटनेच्या कलम २८० नुसार स्थापन करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्यांची आर्थिक परिस्थिती तपशीलवार समजून घेणे, त्यांच्यामध्ये करांच्या वितरणाची शिफारस करणे आणि राज्यांमध्ये करांच्या वितरणाची चौकट ठरवणे हे या आयोगाचे मुख्य काम असते. परंतु केंद्र सरकार कोणत्याही कामाची जबाबदारी वेळोवेळी वित्त आयोगावर सोपवू शकते, असे राज्यघटनेत नमूद आहे. या आयोगात एक अध्यक्ष आणि ४ सदस्य असतात. या चार सदस्यांपैकी एका सदस्य उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणे बंधनकारक असते. याशिवाय संसदेद्वारे एका सदस्याची निवड केली जाते. वित्त आयोगाचा कार्यकाळ ५ वर्षांचा असला तरी हा कालावधी राष्ट्रपतीद्वारे ठरवला जातो. महत्त्वाचे म्हणजे आयोगाच्या शिफारशी मान्य करण्यास केंद्र सरकार बांधील नसते.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
२) नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी XPoSat चे यशस्वी प्रक्षेपण
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी इस्रोने XPoSat नावाच्या अवकाश दुर्बिणीचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. पृथ्वीपासून सुमारे ६५० किलोमीटर उंचीवर असलेली XPoSat ही ४६९ किलोग्रॅम वजनाची दुर्बिण आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान – ( अलीकडील मोहिमांसह अंतराळ तंत्रज्ञान ) या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे इस्त्रोची ही मोहीम नेमकी काय आहे? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
इस्रोने प्रक्षेपित केलेल्या XPoSat या दुर्बिणीवर Polarimeter Instrument in X-rays (POLIX) आणि X-ray Spectroscopy and Timing (XSPECT) अशी दोन वैज्ञानिक उपकरणे आहेत. या उपकरणांच्या माध्यमातून अवकाशातील एक्स रे – X-rays म्हणजेच क्ष किरणांच्या उगमांच्या स्त्रोतांचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे कृष्ण विवर – black hole तसंच न्यूट्रॉन तारे (neutron star) यांचा सखोल निरिक्षणे केली जाणार आहेत, याबद्दलची नवी माहिती मिळण्यास मदत होणार आहे. यानिमित्ताने भारतासह जगभरातील अवकाश संशोधनाला मोठी माहिती मिळण्यास मदत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही भारताची पहिलीच मोहिम असून जगातली दुसरी मोहिम आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या दुर्बिणीचे प्रक्षेपण अमेरिकेतील नासा या संस्थेने २०२१ मध्ये केले होते. IXPE ( Imaging X-rays Polarimeter Explorer ) असे या मोहिमेचे नाव होते.
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.