charaideo moidams : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) राष्ट्रपती भवनातील हॉलचे नामांतर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी (२५ जुलै) राष्ट्रपती भवनातील ‘दरबार हॉल’ आणि ‘अशोक हॉल’ या दोन हॉलचे अनुक्रमे ‘गणतंत्र मंडप’ आणि ‘अशोक मंडप’ असे नामांतर करण्याची घोषणा केली.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्वी परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील कला व संस्कृती तसेच इतिहास या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
दरबार हॉल आणि अशोक हॉलचे महत्त्व काय?
अशोक हॉलचा इतिहास काय आहे?
तुमच्या माहितीसाठी :
‘अशोक हॉल’ हा मुळात बॉलरूम होता. या हॉलमध्ये परदेशातील प्रमुख व्यक्तींची ओळखपत्रे सादर करणे, राष्ट्रपतींकडून दिलेल्या मेजवानीपूर्वीच्या औपचारिक भेटी, महत्त्वाच्या समारंभांपूर्वी राष्ट्रगीताचे गायन याच हॉलमध्ये होते.
या हॉलमध्ये छताला सहा बेल्जियम झुंबरं आहेत. भिंतीला असलेली पेंटिंग्स या हॉलच्या सौंदर्यात भर घालतात. त्यातील एक चित्र पर्शियाचा शासक फत अली शाह याने दिले होते. त्यात वाघाची शिकार करताना दाखवण्यात आले आहे.
इटालियन कलाकार टोमासो कोलोनेलो आणि २३ भारतीय कलाकारांकडे या हॉलमधील इतर चित्रांचे श्रेय जाते. या हॉलच्या छतावर पर्शियन भाषेतील लेख कोरण्यात आले आहेत. शिवाय शिकारीची काही चित्रेही आहेत. हॉलच्या भिंतीवर शाही मिरवणुकीचे चित्र आहे. येथेही भारतीय आणि पाश्चिमात्य स्थापत्यकलेचे मिश्रण पाहायला मिळते.
या हॉलमधील दोन फायरप्लेस व्हिक्टोरियन डिझाईन्सपासून प्रेरित असल्याचे पुस्तकात म्हटले आहे. परंतु या फायरप्लेसवर पर्शियन लेखही सापडतो. ‘Khudavandi ke arso kursi afrdkt; Twanad Kudratas kasre chinsdkt’….याचा अर्थ देवाने सिंहासन निर्माण केले, त्याचे सामर्थ्य महाल देखील तयार करू शकते. Raunako zebuzinat makdn; Nadlde beruye zamin dsmdn’….म्हणजे अशा सुंदर वास्तू पृथ्वीवर किंवा आकाशात कुठेही दिसू शकत नाहीत.
दरबार हॉलमध्ये देशातील अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाणारे महत्त्वाचे पुरस्कार याच ठिकाणी दिले जातात. तसेच देशाच्या सरन्यायाधीशांच्या शपथविधी समारंभासारखे महत्त्वाचे समारंभही याच हॉलमध्ये आयोजिले जातात.
१९४७ साली भारताच्या पहिल्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचाही दरबार हॉल हा साक्षीदार होता. या हॉलमध्ये प्रवेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. एक मार्ग थेट राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातून जातो. यावर्षीच्या सुरुवातीला एनडीए सरकारच्या शपथविधीचा सोहळा येथे आयोजित करण्यात आलेला होता.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
विश्लेषण: राष्ट्रपती भवनातील हॉल झाले मंडप; नामांतर का? कशासाठी?
२) चराईदेव मोईदामला हेरिटेज दर्जा
आसाममधील चराईदेव मोईदाम या दफनभूमीला संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (यूनेस्को) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील कला व संस्कृती काय घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
चराईदेव मोईदामलाचा इतिहास
जागतिक वारसा स्थळ म्हणजे काय?
जागतिक वारसा स्थळांचा दर्जा कोण देतं?
संबंधित आंतरराष्ट्रीय संस्था
तुमच्या माहितीसाठी
चराईदेव मोईदाम ही अहोम घराण्याची शाही दफनभूमी आहे. अहोम घराण्याने १२२८ ते १८२६ इ.स.पर्यंत आसाम आणि ईशान्य भागावर राज्य केले.
पूर्व आसाममधील शिवसागर शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असणारे चराईदेव मोईदाम आजही अनेक स्थानिकांसाठी एक पवित्र स्थळ आहे.
मोईदाम किंवा मैदाम म्हणजे तुमुलस; ज्याचा अर्थ कबरीवर उभारलेला मातीचा ढिगारा, असा होतो. ही दफनभूमी एक राजेशाही दफनभूमी आहे. चराईदेवमध्ये केवळ अहोम राजघराण्यांचेच मोइदाम आहेत; तर इतर कुलीन आणि प्रमुखांचे मोइदाम पूर्व आसामच्या जोरहाट व दिब्रुगढ या शहरांमधील प्रदेशात विखुरलेले आढळतात.
चराईदेव येथील एका ठरावीक मोईदाममध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक कक्ष आहेत. त्याच्या वर एका गोल आकारात मातीचा ढिगारा आहे; जो जमिनीपासून उंच असून गवताने झाकलेला आहे. या ढिगाऱ्याच्या वर एक मंडप आहे; ज्याला ‘चौ चाली’ म्हणतात. मोईदामला एक दरवाजा आहे आणि त्याभोवती अष्टकोनी आकाराची भिंत आहे.
चराईदेव हा शब्द तीन ताई अहोम शब्दांपासून तयार झाला आहे. चे-राय-दोई अर्थात ‘चे’ म्हणजे शहर किंवा गाव, ‘राई’ म्हणजे चमकणे आणि ‘दोई’ म्हणजे टेकडी. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास चराईदेव म्हणजे ‘डोंगरावर वसलेले एक चमकणारे शहर किंवा गाव’ अहोमांनी त्यांच्या ६०० वर्षांच्या इतिहासात अनेक वेळा आपली राजधानी बदलली. मात्र, चराईदेव ही त्यांची पहिली राजधानी मानली जाते.
अहोम हे भारतातील सर्वांत जास्त काळ राज्य करणाऱ्या राजवंशांपैकी एक होते. त्यांचे राज्य आधुनिक काळातील बांगलादेशापासून बर्माच्या आतपर्यंत पसरले होते. सक्षम प्रशासक आणि शूर योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहोम राजघराण्याला आसाममध्ये आजही तितकेच महत्त्व आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
आसामचे पिरॅमिड म्हटलं जाणाऱ्या चराईदेव मोईदामला हेरिटेज दर्जा; काय आहे या ठिकाणाचं महत्त्व?
यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…