१) निपाह विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात निपा विषाणूची लागण झालेल्या १४ वर्षीय मुलाचा कोझिकोड येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला आहे. यानंतर केरळमधील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आरोग्य, शिक्षण, मानवी संसाधने, गरिबी आणि भूक यांच्याशी संबंधित सामाजिक क्षेत्र/सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या, या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
निपाह विषाणू काय आहे?
निपाह विषाणूची लक्षणे काय?
निपाह विषाणू इतका घातक का?
तुमच्या माहितीसाठी :
निपाह हा एक झुनोटिक आजार आहे. म्हणजेच या विषाणूचा संसर्ग मानवाला संसर्गजन्य प्राणी किंवा अन्न यांच्या माध्यमातून होतो. संसर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्यास म्हणजेच एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीलादेखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC)नुसार या विषाणूच्या संसर्गामुळे ताप, डोकेदुखी, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास अडचण, उलट्या, अशी लक्षणे जाणवू लागतात. त्यासह गरगरणे, झोप येणे, मेंदूला सूज येणे अशी लक्षणेदेखील दिसू शकतात. मेंदूला सूज आल्यामुळे रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो. तसेच त्याचा मृत्यूही होऊ शकतो.
वटवाघळाच्या माध्यमातून डुक्कर, श्वान, मांजर, शेळी, घोडा, मेंढी अशा प्राण्यांना निपाह विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. या प्राण्यांच्या थेट संपर्कात आल्यानंतर माणसाला निपाह विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. एका माणसापासून दुसऱ्या माणसालाही या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच संक्रमित अन्नाचे सेवन केल्यानंतर, निपाह विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.
सीडीसीने सांगितल्यानुसार बांगलादेश आणि भारतात एका व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीलाही या विषाणूचा संसर्ग झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
केरळमध्ये निपाह विषाणूच्या संसर्गाने दोघांचा मृत्यू; संसर्ग कसा होतो? काय काळजी घ्यावी?
२ ) बांगलादेशमधील हिंसाचार
बांगलादेशात ‘स्वातंत्र्यसैनिक’ आणि त्यांच्या वंशजांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे या देशात विद्यार्थी आणि त्यांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनेही झाली.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील जगाचा इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध
बांगलादेशच्या निर्मितीमागे भारताची भूमिका
तुमच्या माहितीसाठी :
१९७१ मध्ये पाकिस्तानातून स्वतंत्र होताना त्यावेळी लढणाऱ्या सैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१८ मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र त्या वेळी विद्यार्थ्यांनी या निर्णयाला विरोध करत निदर्शने केली. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन शेख हसीना यांनी हा निर्णय मागे घेतला होता. मात्र आता स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय लागू करावा, असे निर्देश बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले.
बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांना अत्यंत महत्त्व आहे. उत्पन्नाचा स्थिर आणि फायदेशीर स्राोत म्हणून सरकारी नोकरीकडे पाहिले जाते. या देशात सरकारी नोकरीला प्रतिष्ठाही आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे चार लाख पदवीधर तीन हजार सरकारी नोकऱ्यांसाठी स्पर्धा करतात. मात्र बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये विविध घटकांसाठी काही जागा राखीव असतात. महिला, वांशिक अल्पसंख्याक आणि अपंगांसाठी काही जागा राखीव आहेत. महिला व अविकसित जिल्ह्यातील रहिवाशांना प्रत्येकी १० टक्के आरक्षण आहे. आदिवासी समाजातील सदस्यांना पाच टक्के, तर अपंगांना एक टक्के आरक्षण मिळते. स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांना ३० टक्के आरक्षण दिले, तर सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाची टक्केवारी ५६ होईल. त्यामुळे खुल्या वर्गातील नागरिकांसाठी केवळ ४४ टक्के जागा शिल्लक राहतील. याला खुल्या वर्गातील बहुसंख्य नागरिकांचा विरोध आहे.
बांगलादेश मुक्ती संग्रामाचे नेतृत्व करणाऱ्या ‘अवामी लीग’ या हसीनांच्या पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांना आरक्षण अनुकूल वाटत असल्याने हा निर्णय वादग्रस्त ठरत आहे. कोट्यातील उमेदवारांसाठी घेतलेल्या विशेष परीक्षा, प्रत्येक श्रेणीसाठी वेगवेगळी वयोमर्यादा आणि गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवार बेरोजगार असतानाही कोट्यातील जागा रिक्त राहिल्या हे तथ्य लोकांच्या निराशेत भर घालणारे आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
विश्लेषण: बांगलादेशात विद्यार्थी आंदोलन का करत आहेत?
UPSC-MPSC : बांगलादेशची निर्मिती कशी झाली? यात भारताची भूमिका काय होती?
UPSC-MPSC : भारत-बांगलादेश यांच्यातील सहकार्याची क्षेत्रे कोणती?
यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा..