UPSC Key In Marathi : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) भारतीय नौदलाकडील ब्राम्होस क्षेपणास्त्र
भारतीय नौदलाची लढाऊ सज्जता आणि प्रशिक्षण विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने ब्राम्होस क्षेपणास्त्र आणि युद्धनौकांवर बसविण्यात येणारी या अस्त्राची प्रणाली खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील भारतातील अंतर्गत सुरक्षा आव्हाने, अतिरेकी, दहशतवाद, या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे क्षेपणास्त्र खरेदीचा करार नेमका काय आहे? याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
ब्राम्होस हे जगातील सर्वात वेगवान, अचूक मारा करणारे क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते. त्याची प्रगत आवृत्ती सागरी सीमांच्या संरक्षणात आता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याचबरोबर स्वदेशीकरणातून परकीय अवलंबित्व कमी करणे दृष्टिपथात आले आहे.
भारतीय नौदलासाठी ब्राम्होस क्षेपणास्त्र आणि युद्धनौका, विनाशिकांवर बसविली जाणाऱ्या ब्राम्होस प्रणाली खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने संरक्षण मंत्रालयाने ब्राम्होस एरोस्पेसशी दोन करार केले. यातील पहिला करार १९ हजार ५१८ कोटींच्या ब्राम्होसचा तर दुसरा ९८८ कोटींचा क्षेपणास्त्र प्रणालीचा आहे. नौदलास जवळपास २०० प्रगत क्षेपणास्त्रे मिळण्याचा अंदाज आहे.
विविध युद्धनौकांमध्ये बसवण्यात येणारी ही प्रणाली लवकरच नौदलाचे प्रमुख शस्त्र ठरणार आहे. स्वनातीत (सुपरसॉनिक) वेगासह जमीन अथवा समुद्रातील लक्ष्याचा अत्यंत अचूक वेध घेण्याची क्षमता या प्रणालीत आहे. यातून नौदलाची प्रहारक क्षमता कमालीची विस्तारणार आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
२) देशातली पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा
देशातील पहिल्या वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नुकताच केंद्रीय मंत्री किरन रिजीजू यांच्या हस्ते करण्यात आले. ही प्रयोगशाळा भोपाळच्या वायव्येस ५० किमी अंतरावर असलेल्या सिहोर जिल्ह्यातील सिलखेडा गावात विकसित करण्यात आली आहे. तसेच या प्रयोगशाळेसाठी जवळपास १२५ कोटी रुपयांचा खर्चही करण्यात आला आहे. या प्रयोगशाळेचे भूमिपूजन २०१८ मध्ये करण्यात आले होते.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील भूगोल -हवामान या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही प्रयोगशाळा नेमकी काय आहे? ती का स्थापन करण्यात आली? ती प्रयोगशाळा इतकी महत्त्वाची का आहे? या प्रयोगशाळेची वैशिष्ट्ये काय आहेत? आणि महत्त्वाचे म्हणजे या प्रयोगशाळेसाठी भोपाळचीच निवड का करण्यात आली? याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
भोपाळजवळ स्थापन करण्यात आलेली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा हे खुल्या मैदानात विकसित करण्यात आलेले एक वातावरण निरीक्षण आणि विश्लेषण केंद्र आहे. हवामानाशी संबंधित घटक जसे की, तापमान, हवेचा वेग, हवेशी दिशा, तसेच जून ते सप्टेंबर महिन्यात निर्माण होणारे नैर्ऋत्य मोसमी वारे आणि बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे पट्टे इत्यादींचा अभ्यास करणे हा या प्रयोगशाळेचा मुख्य उद्देश आहे.
या प्रयोगशाळेद्वारे गोळा करण्यात येणाऱ्या माहितीचा वापर पाऊस आणि हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्याबरोबरच या प्रयोगशाळेचा वापर उपग्रहावर आधारित निरीक्षणे प्रमाणित करण्यासाठीही केला जाण्याची शक्यता आहे. १०० एकरांमध्ये पसरलेली ही प्रयोगशाळा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाद्वारे विकसित करण्यात आली आहे. तसेच या प्रयोगशाळेचे संचालन पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीद्वारे केले जाणार आहे.
या प्रयोगशाळेच्या पहिल्या टप्प्यात हवामानाचा अभ्यास करण्यासाठी रिमोट सेन्सिंग आधारित २५ उपकरणे बसविण्यात आली आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यात रडार विंड प्रोफाइलर, बलून-बाउंड रेडिओसोंड, मातीची आर्द्रता व तापमान मोजणारी उपकरणे बसविण्यात येणार आहेत.
हवामान शास्त्रज्ञांनी अनेकदा मध्य भारतात होणाऱ्या मान्सूनचे महत्त्व अधोरेखित केले आहे. दरवर्षी मान्सूनपूर्व काळात हवामान विभागाद्वारे देशाच्या चारही भागांत (पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण) होणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तविला जातो. त्याचबरोबर मध्य भारतात होणाऱ्या पावसाचा अंदाजही वेगळा वर्तविला जातो. कारण- एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या दृष्टीने मध्य भारताचा भाग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. खरे तर कमी दाबाचे पट्टे, वारे यांचा मान्सूनवाढीवर नेमका किती प्रभाव पडतो, याविषयी माहिती अद्यापही मर्यादित स्वरूपाची आहे. त्यामुळेच भारतीय मान्सूनचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने मध्य भारत भाग हा हवामान शास्त्रज्ञांसाठी महत्त्वाचा आहे.
दरम्यान, आता भोपाळमधील प्रयोगशाळेमुळे आता ढगांमागचे सूक्ष्म विज्ञान, त्याचे गुणधर्म, त्याचे संवहन इत्यादींबाबतची दीर्घकालीन निरीक्षणे नोंदविता येतील. या निरीक्षणाची मदत पावसाचे अचूक अंदाज वर्तविण्यासाठी होईल. पर्यायाने त्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होईल.
यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख :
- विश्लेषण : देशातल्या पहिल्या वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेसाठी भोपाळचीच निवड का? काय आहे तिचे महत्त्व?
यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…