Cancer Medicines Prices Drop : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) पॅरिस ऑलिम्पिकचे पर्यावरणपूरक आयोजन
ऑलिम्पिक २०२४ ची सुरुवात झाली आहे. या खेळांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ हे आजवरचे सर्वांत पर्यावरणपूरक खेळाचे आयोजन असेल, असा दावा करण्यात आला आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेताली सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
परिस ऑलिम्पिकची वैशिष्टे काय?
ऑलिम्पिकचा इतिहास काय?
तुमच्या माहितीसाठी :
ऑलिम्पिकच्या आयोजनामधून सामान्यत: कार्बनचे जितके उत्सर्जन होते, ते निम्म्यावर आणण्याचा आयोजन समितीचा निर्धार आहे. टोकियो २०२०, रिओ २०१६ व लंडन २०१२ या सर्व ऑलिम्पिक आयोजनाच्या प्रत्येक वेळी साधारणत: ३.५ दशलक्ष टन इतक्या कार्बनचे उत्सर्जन झाले होते. हे उत्सर्जन आता निम्म्यावर म्हणजेच साधारण १.७५ टन्सवर आणण्याचे आयोजन समितीचे ध्येय आहे.
सध्या हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळे हे जग आपत्कालीन परिस्थितीत आहे. हरितगृह वायूंच्या (GHG) मानवी उत्सर्जनामुळे हवामान बदलाची समस्या उदभवताना दिसत आहे. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांच्या आयोजनामुळे हरितगृह वायूचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे अशा प्रकारच्या आयोजनांमध्ये पर्यावरणाची काळजी घेतली जाणार नसेल, तर ते व्यर्थ आहे. हाच विचार करून ऑलिम्पिकमध्ये कमीत कमी कार्बनचे उत्सर्जन होऊन पर्यावरणपूरक आयोजनासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक अक्षय ऊर्जास्रोतांचा वापर करण्यात येत आहे. त्यामध्ये भूऔष्णिक व सौरऊर्जेचाही समावेश आहे. त्याबरोबरच हवामानास अनुकूल अशा अनेक कृती राबविण्यात येत आहेत.
यासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या
पॅरिस ऑलिम्पिक हे आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पर्यावरणपूरक आयोजन का असणार आहे?
२) कॅन्सरच्या औषधांच्या किमतीत घट
२०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय भाषणात कर्करोगाच्या (कॅन्सर) रुग्णांना दिलासा देणारी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली होती. त्यांनी कर्करोगाच्या तीन औषधांवरील सीमाशुल्कात (कस्टम ड्युटी) सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन, ओसिमरटिनिब आणि दुर्वालूमॅब, अशी या तीन औषधांची नावे आहेत.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन पेपर २ मधील आरोग्य, शिक्षण आणि मानव संसाधनांशी संबंधित सामाजिक क्षेत्र/सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
कॅन्सरच्या औषधांच्या किमती घटल्याने त्याचा रुणांना कसा फायदा होईल?
तुमच्या माहितीसाठी :
दिवसागणिक भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. २०२२ मध्ये कर्करोगाची अंदाजे १४.६ लाख नवीन प्रकरणे आढळून आली; तर २०२१ मध्ये १४.२ लाख व २०२० मध्ये १३.९ लाख प्रकरणे आढळून आली होती, असे नॅशनल कॅन्सर नोंदणी डेटामध्ये नमूद करण्यात आले आहे.
कर्करोगामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २०२२ मध्ये अंदाजे ८.०८ लाख झाली होती. २०२१ मध्ये ही संख्या ७.९ लाख आणि २०२० मध्ये ७.७ लाख इतकी होती. महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. २०२० मध्ये प्रति एक लाख लोकसंख्येमागे १०३.६ टक्के महिला कर्करोगग्रस्त होत्या; तर ९४.१ टक्के पुरुष कर्करोगग्रस्त होते. पुरुषांमध्ये फप्फुस, तोंड, जीभ व पोट यांच्या कर्करोगाचे प्रमाण सामान्य आहे; तर स्त्रियांमध्ये स्तन, गर्भाशय, अंडाशय, फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे.
अर्थसंकल्पाच्या घोषणेपूर्वी या औषधांवर सुमारे १० टक्के सीमाशुल्क आकारण्यात येत होते. नव्या निर्णयामुळे ही औषधे भारतीय रुग्णांसाठी अधिक स्वस्त दरात उपलब्ध होतील आणि कर्करोगाच्या उपचारांचा एकूण खर्च कमी होईल. या औषधांवरील सीमाशुल्क सवलतींमुळे कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
पॅरिस ऑलिम्पिक हे आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पर्यावरणपूरक आयोजन का असणार आहे?
यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…