यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) इराणमधील चाबहार बंदराचे महत्त्व
भारत आणि इराण यांच्यात नुकताच चाबहार बंदर विकासासंदर्भात दहा वर्षीय करारावर शिक्कामोर्तब झाले.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
- चाबहार बंदर कुठे आहे? ( Map Work)
- भारत इराण संबंध
तुमच्या माहितीसाठी :
इराणच्या सिस्तेन-बलुचिस्तान प्रांताच्या किनाऱ्यावर चाबहार वसले आहे. आग्नेय आशिया आणि पश्चिम आशिया यांना जोडणारा मोक्याचा सागरमार्ग चाबहारवरून जातो.
कांडला आणि जेएनपीटी या दोन प्रमुख भारतीय बंदरांपासून चाबहार अनुक्रमे ५५० आणि ७८० सागरी मैल अंतरावर आहे. या दोन बंदरांमधून भारतीय माल चाबहारमार्गे इराण, तेथून भारताकडून विकसित होत असलेल्या झाहेदान (इराण) ते झारांझ (अफगाणिस्तान) महामार्गाद्वारे काबूल व पुढे मध्य आशियामध्ये पाठवला जाऊ शकतो. मध्य आशियातून पुढे युरेशिया म्हणजेच युरोप व रशियामध्येही तो जाऊ शकेल.
या योजनेमुळे सुएझ कालव्यामार्गे युरोप गाठण्याचा खर्चिक पर्याय टाळता येईल. तसेच अफगाणिस्तानात पाकिस्तानमार्गे माल पाठवण्यासाठी त्या देशाची मिनतवारी करण्याची वेळही येणार नाही.
सन २००२मध्ये इराणचे तत्कालीन अध्यक्ष सइद मोहम्मद खतामी यांच्या भारतभेटीमध्ये या कराराची प्रथमच चर्चा झाली. खतामी आणि तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यात याबाबत करारही झाला.
पुढे २०१६मध्ये भारत, अफगाणिस्तान आणि इराण यांच्यात बंदरवापराविषयी त्रिपक्षीय करार झाला. याअंतर्गत अफगाणिस्तानातून पहिल्यांदा चाबहारमार्गे मालाची भारतात निर्यातही झाली. पण तालिबानने अफगाणिस्तानचा दुसऱ्यांदा कब्जा केल्यानंतर, आणि इराणवर अमेरिकेकडून निर्बंध तीव्र झाल्यानंतर चाबहार प्रकल्प विकास काहीसा थंडावला होता.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
२) झेनोट्रांसप्लांटेशन शस्त्रक्रिया
दोन महिन्यांपूर्वी झेनोट्रांसप्लांटेशनद्वारेच एका व्यक्तीच्या शरीरात जनुकीय सुधारित डुकराची किडनी रोपण करण्यात यश आले. परंतु, शनिवारी (११ मे) संबंधित व्यक्तीचे निधन झाले.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
- झेनोट्रांसप्लांटेशन शस्त्रक्रिया नेमकी काय आहे?
तुमच्या माहितीसाठी :
झेनोट्रांसप्लांटेशन ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये मानवेतर प्राणी स्रोतापासून पेशी, अवयव किंवा उतींचे प्रत्यारोपण केले जाते. या प्रक्रियेमध्ये जनुकीय सुधारित अवयवांचादेखील समावेश आहे.
२०२३ मध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी लँगोनच्या ट्रान्सप्लांट इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. रॉबर्ट मॉन्टगोमेरी यांनी ‘असोसिएटेड प्रेस’ला सांगितले की, शरीरात डुकराची किडनी प्रत्यारोपित करणे हे नियमित प्रत्यारोपणापेक्षा फारसे वेगळे नाही आणि शस्त्रक्रियेनंतर रोगप्रतिकारक शक्तीसाठी घेतली जाणारी औषधेही तीच आहेत. परंतु, यातील सर्वात महत्त्वपूर्ण पायरी म्हणजे निवडलेल्या प्राण्यांच्या अवयवामध्ये अनुवांशिक बदल करणे. अनुवांशिक बदल केल्यानंतरच मानवी शरीर हे अवयव स्वीकारू शकते.
जानेवारी २०२२ मध्ये, जनुकीय सुधारित डुकराच्या हृदयाचे पहिले झेनोट्रांसप्लांटेशन करण्यात आले होते. परंतु, डुकराच्या हृदयातील सुप्त विषाणूमुळे संबंधित व्यक्तीचे स्वास्थ्य बिघडले आणि दोन महिन्यांनंतर त्या रुग्णाचा मृत्यू झाला.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…