UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) ‘कॉप २८’ परिषद
संयुक्त अरब अमिरातीमध्ये येत्या ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान ‘कॉप २८’ परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद वादग्रस्त होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘जीवाश्म इंधन’ हे त्यामागील एक प्रमुख कारण असून इतरही अनेक कारणे आहेत.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील पर्यावरण या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कॉप परिषद नेमकी काय आहे? ती का सुरु करण्यात आली? ‘कॉप २८’मध्ये कोणत्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
प्रमुख जीवाश्म इंधन उत्पादक असलेल्या संयुक्त अरब अमिरातींद्वारे ‘कॉप २८’ आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक पर्यावरणीय गटांचे म्हणणे आहे की, हे देश परिषदेचे स्वरूप आणि निष्कर्ष सौम्य ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. तापमानवाढ दोन अंश सेल्सिअसच्या आत ठेवायची असल्यास जीवाश्म इंधनांचा वापर रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे भाग पडणार आहे. सुलतान अल जाबेर हे जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एका कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्यांची कंपनी जीवाश्म इंधनाच्या उत्खननात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. ‘कॉप २८’चे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती भुवया उंचावणारी ठरली होती.
भारत आणि दक्षिण आशियातील इतर देश, तसेच जगभरातील विकसनशील देश ‘कॉप २८’कडे आर्थिक दृष्टिकोनातून पाहतील, अशी शक्यता आहे. जे देश हवामान बदलाच्या सर्वात वाईट परिणामांना सामोरे जातात आणि अनुकूलतेसाठी सर्वात जास्त किंमत मोजतात त्यांना हवामान बदलांसाठी सर्वाधिक जबाबदार असलेल्या देशांकडून आर्थिक साहाय्य मिळते, मात्र या संदर्भातील वाटाघाटींमध्ये जवळपास दोन दशकांपासून व्यत्यय येत आहे. विकसनशील देशांमधील हवामानासंदर्भातील कृतींना समर्थन देण्यासाठी दरवर्षी १०० अब्ज डॉलर्स हवामान वित्तपुरवठय़ाच्या स्वरूपात देण्याचे वचन २००९ मध्ये देण्यात आले होते. मात्र, त्याची पूर्तता करण्यात विकसित देश सातत्याने अपयशी ठरत आहेत.
कॉप परिषद काय?
हवामान बदल आणि पर्यायाने त्यामुळे होणारे दुष्परिणाम थांबवण्यासाठी काय करता येईल यावर विचारविनिमय करण्यासाठी जागतिक स्तरावर ही परिषद आयोजित केली जाते. हवामान बदल रोखण्यासाठी काय पावले उचलली गेली पाहिजेत, यावर सुमारे १७९ देशांचे (सरकारी आणि बिगरसरकारी) प्रतिनिधी चर्चा करतात. १९९२ साली ब्राझीलच्या रिओ शहरात भरलेल्या ‘वसुंधरा परिषदे’त या ‘कॉप’ परिषदांचा उगम आहे. रिओ परिषदेत ‘संयुक्त राष्ट्रांचा हवामान बदलविषयक व्यापक समझोता’ (युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन फॉर क्लायमेट चेंज) मान्य झाला, त्या देशांची दरवर्षी निरनिराळय़ा ठिकाणी भरणारी ‘कॉप’ ही परिषद आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
- UPSC-MPSC : वसुंधरा परिषदेत कोणते महत्त्वाचे करार करण्यात आले? त्यांची उद्दिष्टे कोणती?
- विश्लेषण: ‘कॉप २८’ वादग्रस्त ठरण्याची शक्यता कशामुळे?
- UPSC-MPSC : जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल म्हणजे नेमके काय? त्याचे परिणाम कोणते?
२) आता ओटीटी माध्यमांवर सेन्सॉरशीप?
केंद्र सरकारने १० नोव्हेंबर रोजी प्रसारण सेवा (नियमन) विधेयक २०२३ चा मसुदा सादर केला आहे. या विधेयकाअंतर्गत ओटीटी कन्टेंट, डिजिटल बातम्या तसेच अन्य घटकांना कायद्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबाबत माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) माहिती दिली आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील शासन धोरण या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रसारण सेवा (नियमन) विधेयकातील तरतुदी काय? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
प्रसारण सेवा (नियमन) विधेयक २०२३ या विधेयकात वेगवेगळ्या प्रसारण सेवांसाठी नियामक तरतुदी करण्यात आल्या आहेत. एकाच कायद्यात याबाबतच्या सर्व नियमांचा समावेश करण्याचा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या विधेयकात एकूण ५ प्रकरणं, ४८ कलमे तसेच तीन अनुसूची तसेच तांत्रिक संज्ञांचीही व्याख्या केलेली आहे. विशेष म्हणजे या विधेयकात एका ‘कन्टेंट इव्हॉल्यूशन कमिटी’ तसेच ‘ब्रॉडकास्ट अॅडव्हायजरी काऊन्सील’ची स्थापना करण्याचेही प्रस्तावित आहे. एखाद्या ऑपरेटर किंवा ब्रॉडकास्टरने नियमांचे उल्लंघन केल्यास सूचना देणे, सल्ला देणे, आर्थिक दंड असा शिक्षेचीही तरतूद या विधेयकात आहे. विशेष म्हणजे तुरुंगवास, दंडाचीही तरतूद या कायद्यात आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
- आता ओटीटी माध्यमांवर सेन्सॉरशीप? जाणून घ्या सरकारच्या नव्या विधेयकात नेमके काय?
- OTT म्हणजे काय? जाणून घ्या शब्दाचा फूल फॉर्म ते सर्व्हिसचे प्रकार
- विश्लेषण : OTT प्लॅटफॉर्म्स नेमका पैसा कमवतात तरी कसा? जाणून घ्या या माध्यमांच्या अर्थकारणाचं गणित
३) इटलीतील भूकंप
इटलीतील नॅपल्स आणि त्याच्या शेजारी असलेले पोझुओली शहर या ज्वालामुखीच्या टप्प्यात असल्याचे मानले जाते. या परिसरात मागच्या काही महिन्यात हजारांहून अधिक छोटे छोटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळेच ५०० वर्षांनंतर या ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक होतो की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील भूगोल या विषयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे इटलीत भूंकप का होतोय? आणि भूंकप म्हणजे नेमकं काय? याबाबतची माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
इटलीमध्ये इस ७९ मध्ये माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काळाच्या पडद्याआढ गेलेल्या पॉम्पे शहरापासून केवळ २८ मैलांवर (४५ किमी) कॅम्पी फ्लेग्रेई ज्वालामुखी आहे. पॉम्पे शहराच्या ठिकाणी उत्खनन झाल्यानंतर या शहराच्या खाणाखुणा सापडल्या आहेत. कॅम्पी फ्लेग्रेईचा शेवटचा ज्वालामुखी उद्रेक ५०० वर्षांपूर्वी १५३८ मध्ये झाला होता. ज्यामुळे जवळच असलेल्या नॅपल्सच्या खाडीमध्ये एक नवा पर्वत निर्माण झाल्याचे २०११ साली प्रकाशित झालेल्या क्वॅटर्नरी सायन्स रिव्ह्यूजमध्ये म्हटले गेले होते. या प्रदेशाच्या आसपास पाण्याखाली ३९ हजार वर्षांपासून अनेक ज्वालामुखी सक्रिय आहेत.
जगातील २० मोठ्या ज्वालामुखींमध्ये कॅम्पी फ्लेग्रेईचा समावेश होतो. कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हार्यमेंट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार कॅम्पी फ्लेग्रेई ज्वालामुखीमुळे तयार झालेले विवर किंवा ज्याला ज्वालामुखीचे मुख म्हटले जाते, हे युरोपमधील सर्वात मोठे विवर (caldera) असल्याचे मानले जाते. याचे क्षेत्रफळ १२ ते १५ किमीपर्यंत पसरलेले आहे. जगातील सर्वात मोठे ज्वालामुखीचे विवर फिलिपिन्स समुद्रात असलेल्या फिलीपिन राईज या ठिकाणी आहे. ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या अपोलाकी या विवराचे क्षेत्रफळ १५० किलोमीटर इतके मोठे आहे.
इटलीच्या द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ जिओफिजिक्स अँड व्हॉल्कॅनोलॉजीच्या (INGV) अहवालानुसार डिसेंबर २०२२ पासून या प्रदेशात भूकंपाचे धक्के बसण्याची संख्या वाढली आहे. यामुळेच अनेक वर्षांपासून सुप्त अवस्थेत असलेला ज्वालामुखी पुन्हा सक्रिय होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०२३ मध्ये कॅम्पी फ्लेग्रेई येथे ३,४५० भूकंपाची नोंद झाली आहे. यापैकी १,११८ भूकंपाचे झटके एकट्या ऑगस्ट महिन्यात बसले.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
- इटलीतील शहरात महिनाभरात एक हजारांहून अधिक भूकंप; ५०० वर्षांपूर्वी उद्रेक झालेला ज्वालामुखी पुन्हा सक्रिय?
- UPSC-MPSC : भूकंप म्हणजे नेमके काय? भारतातील कोणत्या भागाला भूकंपाचा सर्वाधिक धोका असतो?
- विश्लेषण : भूकंप दरवर्षी का होतात? त्यामागचं वैज्ञानिक कारण काय?
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.