UPSC Key In Marathi : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) यंदाचा उन्हाळ्याची वाढती तीव्रता
भारतीय हवामान विभागाने नुकताच यंदाच्या उन्हाळ्याचा म्हणजे मार्च ते मे महिन्यांचा हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार देशात मार्च ते मे दरम्यान कमाल-किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
देशात मार्च ते मे या संपूर्ण उन्हाळय़ात कमाल-किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. मार्चमध्ये उन्हाची तीव्रता जास्त असणार नाही. पण, एप्रिल आणि मे या काळात अपवाद वगळता भारतातील बहुतेक राज्यांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. एप्रिल आणि मे हे दोन महिने अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज आहे.
संपूर्ण भारतात, त्यातही प्रामुख्याने मध्य भारत, उत्तर, पूर्व भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटांचे प्रमाणही या भागात जास्त राहण्याची शक्यता आहे. हिमालयीन राज्यांत म्हणजे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, बिहारसह ईशान्य भारतातील मेघालय, अरुणाचल, मिझोराम, मणिपूरलाही तापमान वाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, कर्नाटकात तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे.
पश्चिमी विक्षोप म्हणजे उत्तरेकडून येणारे थंड वारे फेब्रुवारी महिन्यात खूपच सक्रिय होते. मार्चच्या पहिल्या आठवडय़ातही एक तीव्र थंड वाऱ्याच्या झंझावाताचा विक्षोभ हिमालयात सक्रिय असून तो हिमालयीन रांगांमधून ईशान्य भारताकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे मार्चच्या पहिल्या पंधरवडय़ात उष्णतेच्या झळांची शक्यता कमी आहे. मार्चअखेरीपासून तापमानात वाढ होण्यासह उष्णतेच्या झळांच्या शक्यतेतही वाढ होण्याचा अंदाज आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
२) बंगळुरूतील चालकविरहीत मेट्रो
बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल)ला मेट्रोचे सहा डबे मिळाले आहेत; जे कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) प्रणालीचा भाग आहेत. गेल्या महिन्यात तयार झालेल्या यलो लाईनवर हे डबे धावणार असून त्यासाठी विविध सुरक्षा चाचण्या केल्या जाणार आहेत.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्यपरीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल प्रणाली नेमकी काय आहे? याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
सीबीटीसी तंत्रज्ञान ही एक आधुनिक संवाद प्रणाली आहे; गाडीच्या परिचालनासंदर्भातील वेळेच्या बाबतीतील अचूक माहिती रेडिओ संवादाच्या माध्यमातून देण्यासाठी ही प्रणाली ओळखली जाते. कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) सिग्नलिंग तंत्रज्ञान हे मेट्रोची ये-जा आणि मेट्रोमध्ये तांत्रिक अडचण आल्यास त्याची स्वयंदुरुस्ती करू शकते.
ही एक ट्रेन मॉनिटरिंग सिस्टीम आहे; जी ट्रेनचे बेअरिंग जास्त गरम झाल्याचे सूचित करते. तापमानाचा डेटा आणि डायग्नोस्टिक डेटा हा ऑनबोर्ड अँटेना, वायरलेस उपकरणे आणि स्थानकांवर असलेल्या दूरसंचार नेटवर्कद्वारे ‘ओसीसी’ला पाठवला जातो. त्यामुळे बेअरिंगमध्ये लगेच सुधारणा करता येऊ शकते. तसेच चालकविरहीत मेट्रोमध्ये एलसीडी नकाशा असतो. त्यामध्ये दरवाजे उघडणे किंवा बंद करणे, आगमन किंवा निर्गमनाची माहिती दिली जाते.
याशिवाय मेट्रोच्या पुढे-मागे दोन्ही बाजूंना कॅमेरे असतात; जेणेकरून ट्रेन ऑपरेटर ट्रेन सुटण्यापूर्वी प्रवाशांना चढताना आणि उतरताना पाहू शकतो. मेट्रोच्या पुढील बाजूस असणारा कॅमेरा सुरक्षेसाठी समोरील दृश्य रेकॉर्ड करतो. तसेच आपातकालीन स्थितीत ओसीसी किंवा ऑपरेटरकडे संदेश पोहोचेपर्यंत प्रवासी ट्रेन स्वतः ऑपरेट करू शकतात. ओसीसी किंवा ट्रेन ऑपरेटरकडे आपातकालीन परिस्थितीचा संदेश पोहोचतो तेव्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे परिस्थिती तपासून ट्रेनचे दरवाजे उघडले जातात.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…