Road Self Healing Technology : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) भारतातील वणव्याची समस्या
काही दिवसांपूर्वी आसाम आणि आता उत्तराखंडमध्ये अवघे जंगल वणव्याने कवेत घेतले आहे. जमिनीवरून वणवा विझवण्याचे सर्व उपाय तोकडे पडल्यानंतर आता हवाई दल आणि भारतीय लष्कराची मदत घेतली आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील पर्यावरण, पर्यावरणीय पारिस्थितिकी, जैव-विविधता आणि हवामान बदल तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
भारतीय वनसर्वेक्षण अहवालातील आकडेवारीनुसार भारतातील ३६ टक्के जंगलांमध्ये वारंवार वणवा लागण्याची शक्यता अधिक आहे. मोठ्या प्रमाणावर कोरडे तण असल्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये जंगलात आग लागण्याच्या घटना वाढतात. यातील बहुतांश आगीच्या घटना या शेती किंवा अनियोजित पद्धतीने जमिनींचा वापर केल्यामुळे घडतात. वणवा लागण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. यामध्ये उष्णता, जंगलातील वनस्पती आणि आर्द्रता या कारणांचा त्यात समावेश होऊ शकतो. वणव्यांची तीव्रता आणि त्यांची वारंवारिता ही याच गोष्टींवर अवलंबून असते.
ईशान्य भारतातील राज्ये, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही भारतातील सर्वात जास्त वणवाप्रवण क्षेत्रे आहेत. २००३ ते २०१७ दरम्यान भारतात सर्वाधिक पाच लाख २० हजार ८६१ वणव्याच्या घटना आढळून आल्या. वनसर्वेक्षण अहवालानुसार भारतातील ५४ टक्केपेक्षा अधिक जंगले अधूनमधून आगीच्या संपर्कात येतात. तापमानातील तीव्र वाढ, पर्जन्यमानात घट आणि जमीन वापरण्याच्या पद्धतीत बदल यामुळे बहुतेक आशियाई देशांमध्ये जंगलातील आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०१२ साली भारतातील अर्धी जंगले वणव्याच्या कवेत होती.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
- विश्लेषण : उत्तराखंडमधील वणवा आटोक्यात का येत नाही? वणव्यांची समस्या जगभर उग्र का बनतेय?
- जंगलात आग कशी लागते? त्याला जबाबदार कोण? ‘त्या’ थांबवायच्या कशा?
२) रस्त्यांवरचे खड्डे भरणारे ‘सेल्फ हीलिंग’ तंत्रज्ञान
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देशातील खड्ड्यांच्या सततच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सेल्फ हीलिंग डांबराचा वापर करण्याचा विचाराच आहे. “आम्ही टिकाऊपणा आणि खड्ड्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कल्पक पद्धतींचा विचार करीत आहोत,” असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील विविध क्षेत्रातील विकासासाठी सरकारी धोरणे, त्यांची रचना आणि अंमलबजावणीमुळे उद्भवणारे मुद्दे या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे? याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
सेल्फ हीलिंग तंत्रज्ञानाद्वारे तयार केले जाणारे रस्त्यांमध्ये ‘सेल्फ हिलिंग डांबर’ वापरले जाते. हे डांबर सामान्य डांबरापेक्षा वेगळे असते. त्यात सेल्फ हीलिंग करणारे साहित्य असते. त्याला ‘स्मार्ट डांबर’ असेही संबोधले जाते. सध्या मोठ्या प्रमाणात या डांबराची चर्चा केली जात आहे. सेल्फ हीलिंग रस्ते किंवा स्मार्ट डांबरामध्ये स्टील फायबर आणि इपॉक्सी कॅप्सुल असते; जी रस्त्यावरील छोट्या छोट्या भेगाही (क्रॅक्स) दुरुस्त करू शकते आणि पाणी त्यात जाण्यापासून रोखू शकते. हे तंत्रज्ञान नेदरलँड्समधील डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे सिव्हिल इंजिनियरिंगचे प्राध्यापक एरिक श्लेंजन यांनी विकसित केले असून नेदरलँडमधील संशोधकांनी काही सेल्फ हीलिंग रस्ते तयार केले आहेत; जे बाह्य मदतीशिवाय भेगाही (क्रॅक्स) दुरुस्त करण्यास सक्षम आहेत.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…