UPSC Key : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) धनगर समाजाकडून ‘चराऊ कॉरिडॉर’ची मागणी
महाराष्ट्रातील धनगर समुदायाने मेंढ्या आणि शेळ्यांसाठी ‘चराऊ कॉरिडॉर’ तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
‘चराऊ कॉरिडॉर’ म्हणजे काय?
महाराष्ट्रातील धनगर समाज
तुमच्या माहितीसाठी :
धनगर हा मेंढपाळांचा समुदाय असून हा समाज भारतातील अनेक राज्यांमध्ये आढळून येतो. महाराष्ट्राव्यतिरिक्त हा समाज गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात आढळतो. इतरत्र त्यांना गोल्ला आणि कुरुबा या नावांनी ओळखले जाते.
महाराष्ट्रात धनगरांचा समावेश विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या (VJNT) यादीत करण्यात आलेला आहे. परंतु ते अनेक दशकांपासून या समाजाला अनुसूचित जमातीचा (ST) दर्जा मिळावा यासाठी मागणी करत आहेत.
धनगर समाज त्यांच्या जनावरांचे पालनपोषण करताना एका विशिष्ट मार्गावरून प्रवास करतो.परंतु गेल्या काही दशकांमध्ये वनविभागाने वने संरक्षित करण्यास सुरुवात केली आहे, तेंव्हापासून या समाजाच्या हालचालींकडे वनजमिनींवर अतिक्रमण म्हणून पाहिले जात आहेत. वनविभागाने (धनगर ज्या मार्गाने जा-ये करतात) त्या मार्गावर उंच तटबंदी उभारली आहे. तसेच अशाप्रकारे वनविभागाच्या जागेत प्रवेश करणाऱ्यांवर अनेकदा दंड ठोठावला जातो.
हा समाज पावसानुसार निर्णय घेतो. ते काही ठराविक मार्गांचा अवलंब करतात- विदर्भात ते बुलढाणा ते अमरावती ते अकोला, तर काहीजण चंद्रपूरपर्यंत जातात. पश्चिम महाराष्ट्रात कोकणापर्यन्त जातात आणि परत येतात. हे मार्ग या समाजासाठी उदरनिर्वाहाचे साधन आणि सांस्कृतिक वारसा आहेत. चराऊ मार्ग बदलणे हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, त्यामुळे चराऊ कॉरिडॉर’ची मागणी केली जात आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
महाराष्ट्रातील धनगर कोण आहेत? जंगलात ‘चराऊ कॉरिडॉर’ची मागणी का केली जात आहे?
२) ओडिशात २० लाख ताडाच्या वृक्षांची लागवड
विजेच्या झटक्यांमुळे झालेल्या इजा आणि मृत्यूपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने ओडिशात २० लाख ताडाच्या वृक्षांची लागवड सुरू केली आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन पेपर ३ मधील आपत्ती व्यवस्थापन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
ओडिशात मोठ्या प्रमाणात वीज कोसळण्याच्या घटना घडतात. २०१५ मध्ये याला राज्य-विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करण्यात आले होते. सततच्या मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांत वीज कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या ११ वर्षांत एकूण ३,७९० जणांना विजेच्या धक्क्याने आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी मागील तीन आर्थिक वर्षांमध्ये विजेच्या झटक्यांमुळे ७९१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात २ सप्टेंबर २०२३ रोजी दोन तासांच्या अंतराने ६१,००० विजेचे झटके नोंदवले गेले; ज्यात किमान १२ लोकांचा मृत्यू झाला.
२०२१-२२ मध्ये विजेच्या धक्क्याने २८२, २०२२-२३ मध्ये २९७ व २०२३-२४ मध्ये २१२ लोकांचा मृत्यू झाला. मयूरभंज, केओंझार, बालासोर, भद्रक, गंजम, ढेंकनाल, कटक, सुंदरगढ, कोरापुट व नबरंगपूर या जिल्ह्यांमध्ये वीज पडून सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्य सरकारने २०१५ पासून वीज पडून मृत्यूचा घाला पडलेल्यांच्या प्रत्येक कुटुंबासाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिले आहे.
इतर झाडांच्या तुलनेत ताडाची झाडे (पाल्म ट्री) उंच असतात. झाडांच्या या उंचीमुळे जेव्हा वीज कोसळते तेव्हा जमिनीवरील लोकांचे रक्षण होते. कारण- या झाडांमध्ये जास्त आर्द्रता आणि रस असतो, ज्यामुळे ती झाडे विजेला स्वत:कडे खेचून घेऊ शकतात आणि जमिनीवर विजेचा होणारा थेट परिणाम कमी करू शकतात.
विशेष मदत आयुक्त कार्यालयाने प्रस्तावित योजनेसाठी सात कोटी रुपये मंजूर केले आहेत. सध्या अस्तित्वात असलेली ताडाची झाडे तोडण्यावर राज्याने बंदी घातली असून, ताडाची १९ लाख झाडे सुरुवातीला जंगलांच्या सीमेवर लावण्यात येणार आहेत.
तज्ज्ञांनी या प्रस्तावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि अधिक व्यापक व आधारभूत धोरणाची मागणी केली आहे. एका ताडाच्या झाडाला २० फूट उंची गाठण्यासाठी किमान १५ ते २० वर्षे लागतात. वीज पडल्यानंतर काही झाडांना आग लागण्याचीही भीती आहे, असं तज्ज्ञांचे मत आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
ताडाचे झाड वाचवणार लोकांचा जीव? ओडिशा सरकारने २० लाख झाडे लावण्याचा निर्णय का घेतला?
यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…