Heat Wave India : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) रुद्रम-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) बुधवारी (२९ मे) ओडिशाच्या किनाऱ्यावर हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रुद्रम-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
रुद्रम-२ हे क्षेपणास्त्र आणि त्याची वैशिष्ट्ये
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था काय आहे?
तुमच्या माहितीसाठी :
रुद्रम-२ ही स्वदेशी विकसित वायु-प्रक्षेपित क्षेपणास्त्र प्रणाली आहे. रुद्रमचा अर्थ होतो, दु:ख दूर करणारे असा होता. हे हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.
रुद्रम क्षेपणास्त्रे ही भारताची पहिली स्वदेशी अॅंटी रेडिएशन क्षेपणास्त्रे आहेत. भारतीय हवाई दलासाठी (आयएएफ) ही क्षेपणास्त्रे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केली आहेत.
क्षेपणास्त्राची कामगिरी जहाजांसह, इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूरद्वारे तैनात इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टीम, रडार आणि टेलिमेट्री स्टेशन्स यांसारख्या रेंज ट्रॅकिंग उपकरणांद्वारे घेतल्या गेलेल्या उड्डाण डेटावरून प्रमाणित करण्यात आली आहे.
रुद्रम-२ चा वेग २४६९.६ किलोमीटर प्रति तास आहे. तर या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३०० किलोमीटर आहे.
विविध राज्यांतील डीआरडीओ प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या अनेक अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
भारत सध्या आपल्या सुखोई लढाऊ विमानांमध्ये रशियाच्या केएच-३१ क्षेपणास्त्राचा वापर करतो. परंतु, आता रुद्रम-२ क्षेपणास्त्र केएच-३१ ची जागा घेणार आहे, त्यामुळे या स्वदेशी क्षेपणास्त्राचे महत्त्व देशासाठी अधिक आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
२) भारतातील उष्णतेची लाट
राजधानी दिल्लीत तर तापमानाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत. प्रथमच नवी दिल्लीत तापमान जवळपास ५० अंशांवर पोहोचले आहे. हे देशातील सर्वोच्च तापमान आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परिक्षेतील चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन पेपर ३ मधील पर्यावरण, जागतिक तापमान वाढ या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
उष्णतेची लाट म्हणजे काय?
तुमच्या माहितीसाठी :
दिल्ली आणि बहुतेक उत्तर भारतात तापमान वाढत आहे. पुढे जाऊन सामान्य तापमान ४५ अंश सेल्सिअस इतके होण्याची शक्यता आहे आणि ५० अंश सेल्सिअसच्या पुढील तापमानही कायम नोंदविण्यात येईल. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या संकटासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
दिल्लीस्थित सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्न्मेंट (सीएसई) या संस्थेने यंदाच्या उन्हाळ्याविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यात देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवल्याचे म्हटले आहे.
प्रामुख्याने राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश आणि विदर्भाने यंदा उष्णतेच्या लाटांचा सामना केला. एकीकडे पश्चिमी विक्षोपामुळे म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे आणि स्थानिक पातळीवरील तापमानवाढीमुळे दिवसा तापमानात वाढ होत आहे. आणि दुसरीकडे रात्रीही तापमान फारसे कमी होत नाही. रात्रीही असह्य उकाड्याचा नागरिकांनी सामना केला आहे.
शहरांत प्रामुख्याने तापमानवाढ आणि उकाड्याचा त्रास जाणवला. शहरांमधील वाढते काँक्रीटीकरण आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे रात्रीही उकाडा जाणवत असल्याचे दिसून आले. ‘सीएसई’ने पुणे, दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळूरु आणि चेन्नई या शहरांतील जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२४ या काळातील उन्हाळ्यातील हवेचे तापमान, जमिनीचे तापमान आणि आर्द्रतेच्या माहितीचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे.
भारतातील वार्षिक सरासरी तापमान १९०० सालच्या तुलनेत सुमारे ०.७ अंश सेल्सिअसने वाढले आहे. मात्र, संपूर्ण जगाचा विचार केल्यास जगभरातील सरासरी जमिनीच्या तापमानात १.५९ अंश सेल्सिअसपेक्षा अधिकची वाढ झाली आहे.
जर महासागरांचाही समावेश केला, तर सध्याचे जागतिक तापमान १९०० सालच्या सरासरी तापमानापेक्षा किमान १.१ अंश सेल्सिअस जास्त आहे. परंतु, भारतातील उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आहेत.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
- दिल्लीमध्ये उष्णतेचे सर्व रेकॉर्डब्रेक, जगभरातही हीच परिस्थिती; तापमान आणखी किती वाढणार?
- विश्लेषण : शहरांमधील तापमानवाढ किती गंभीर?
यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…