UPSC Key In Marathi : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) सीबीएसईकडून प्रायोगिक तत्वावर ‘ओपन बुक परीक्षा’ घेण्याचा निर्णय
नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रमातील शिफारशींनुसार सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई इयत्ता ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक परीक्षा (OBE) आयोजित करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी सीबीएसईने काही शाळांना प्रस्ताव दिला आहे. ही ओपन बुक परीक्षा प्रायोगिक तत्वावर घेतली जाणार
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आरोग्य, शिक्षण आणि मानव संसाधनांशी संबंधित सामाजिक क्षेत्र/सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे आणि समस्या या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ‘ओपन बुक परीक्षा’ ही संकल्पना काय आहे? आणि त्याचा विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होऊ शकतो, याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
सीबीएसईने नोव्हेंबरमध्ये इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांच्या, तर इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र या विषयांच्या परीक्षा ओपन बुक परीक्षा पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव काही शाळांना दिला आहे. ही परीक्षा प्रायोगिक तत्वावर घेण्यात येत असून याद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारा वेळ, तसेच या पद्धतीसंदर्भात शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून अभिप्राय मिळवणे हा सीबीएसईचा मुख्य उद्देश आहे. या परीक्षा पद्धतीत विद्यार्थी पेपर सोडवताना स्वत:जवळ पुस्तक ठेऊ शकतात. यामध्ये नोट्स, पाठयपुस्तके, वह्या यांचा समावेश असू शकतो.
ओपन बुक परीक्षा ही मुख्यत: दोन पद्धतीनुसार घेतली जाऊ शकते. एक म्हणजे प्रतिबंधित पद्धत आणि दुसरी म्हणजे मुक्त पद्धत. प्रतिबंधित पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना केवळ शाळांनी उपबल्ध करून दिलेली सामग्री, म्हणजे पुस्तक, नोट्स वह्या वापरण्याची परवानगी असते, तर मुक्त परीक्षा पद्धतीनुसार विद्यार्थी आपल्याला हवी ती पुस्तके किंवा नोट्स वापरू शकतो. महत्त्वाचे म्हणजे २०१४ मध्ये सीबीएसईने इयत्ता ९ वीची हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान; तर इयत्ता ११ वीची अर्थशास्त्र, जीवशास्त्र आणि भूगोल या विषयांची परीक्षा ओपन बुक परीक्षा पद्धतीनुसार घेतली होती. यासाठी विद्यार्थ्यांना चार महिन्यांपूर्वी अभ्यास साहित्य पुरवण्यात आले होते. मात्र, २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून ही पद्धत बंद करण्यात आली.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
२) भारताने थायलंडला पाठवले बौद्धधातू
भारताने थायलंडला पवित्र बौद्धधातू पाठवले आहेत, ते पहिल्यांदाच प्रदर्शनात ठेवले जाणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या एका खास विमानातून हे बौद्धधातू पाठवण्यात आले; त्यांना मलेशिया सरकारने ‘राज्य अतिथी’चा विशेष दर्जा दिला आहे. यापूर्वी हे बौद्धधातू मंगोलिया आणि श्रीलंकेला पाठवण्यात आले होते.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील भारताचे इतर देशांशी असलेले द्विपक्षीय संबंध या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
तुमच्या माहितीसाठी :
भगवान बुद्ध आणि त्यांचे शिष्य अर्हत सारीपुत्र व अर्हत मौद्गलयान यांचे बौद्धधातू ‘कपिलवस्तू अवशेष’ म्हणूनही ओळखले जातात. हे बौद्धधातू अंदाजे इसनवी सनपूर्व चौथ्या/ पाचव्या शतकातील आहेत. सर्व बौद्धधातू त्या काळात बिहारच्या पिप्रहवा येथे सापडले. पिप्रहवाला कपिलवस्तूचे प्राचीन ठिकाण म्हणूनही संबोधले जाते. येथे सापडलेले बौद्धधातू १९७० च्या दशकात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या (एसएसआय) अधिकाऱ्यांच्या पथकाने शोधले होते. एएसआयने तत्कालीन पुरातत्व संचालक केएम श्रीवास्तव यांच्या देखरेखीखाली पिप्रहवा येथे उत्खनन केले. उत्खनन पथकाला मोठ्या पात्रामध्ये १२ पवित्र बौद्धधातू आणि लहान पात्रात १० पवित्र बौद्धधातू असलेले दगडी पात्र सापडले. ‘
चार बौद्धधातू मलेशियात २६ दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाचा भाग असणार आहेत. मलेशियाला नेताना अर्हत सारीपुत्र आणि अर्हत मौद्गलयान यांचे अवशेष सांचीहून दिल्लीला आणण्यात आले. बँकॉकच्या राष्ट्रीय संग्रहालयात हे बौद्धधातू सुरक्षितपणे ठेवले जाणार आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “थायलंड सरकारने पवित्र बौद्धधातूंना संरक्षित ठेवण्यासाठी बँकॉकमध्ये एक सुंदर पॅगोडा बांधला आहे. याच ठिकाणी हे बौद्धधातू प्रदर्शित केले जातील.” हे प्रदर्शन थायलंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे.
हे पाऊल भारत सरकारच्या ‘लूक ईस्ट’ धोरणाचाच एक भाग आहे. भारत सरकारने यापूर्वी हे बौद्धधातू मोठ्या प्रमाणात बौद्ध लोकसंख्या असलेला मंगोलियाला पाठवले होते. भारताची ‘सॉफ्टपॉवर’ (सांस्कृतिक देवाणघेवाणीतून वाढणारा प्रभाव) विकसित करण्यावर सरकार भर देत आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.