UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) हमास-इस्रायल युद्धात आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन?
इस्रायल आणि हमासदरम्यान युद्ध सुरू होऊन दोन आठवडे उलटून गेले आहेत. या युद्धात हमास आणि इस्रायलच्या सैन्यावर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केल्याचे आरोप होत आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचा का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या घटकांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे.
हमासने इस्रायली शहरे आणि महानगरांवर हजारो रॉकेट डागली. ७ ऑक्टोबर रोजी गाझामधून शेकडो बंदूकधाऱ्यांनी घुसखोरी केली. या घुसखोरांनी सीमेवरील नागरिकांवर हल्ले केले. लहान मुले, वृद्धांसह अनेकांची हत्या केली. शेकडो लोकांचे अपहरण करण्यात आले. मृतांमध्ये बहुतांश सामान्य नागरिक असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, हमासने केलेल्या युद्धगुन्ह्यांचे स्पष्ट पुरावे आहेत. हमासने इस्रायली घरात घुसून नागरिकांची हत्या केली, अपहरण केले, त्यांना ओलीस ठेवले. हे सर्व युद्धगुन्हेच आहेत. नागरिकांना ओलीस ठेवले गेले, तर तो युद्धगुन्हा ठरवावा, असे जीनिव्हा करारात स्पष्ट करण्यात आले आहे.
जगातील सर्व देशांनी संयुक्तपणे युद्धाचे नियम बनवले आहेत. जीनिव्हा करारामध्ये (जीनिव्हा कन्व्हेंशन) आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा तयार करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रत्येक राष्ट्राने त्यावर सहमती नोंदवली आहे. १९४९ मध्ये मान्य करण्यात आलेल्या चार करारांमध्ये युद्धकाळात नागरिक, जखमी आणि कैद्यांना माणुसकीने वागवले जावे, असे ठरवण्यात आले. हत्या, छळ आणि ओलीस ठेवणे यावर या कायद्यानुसार बंदी आहे.
याबरोबरच युद्धकैद्यांना अमानवी, अपमानास्पद वागणूक देण्यावरही बंदी घालण्यात आली. पकडलेल्या शत्रुसैनिकांना अन्न-पाणी व वैद्यकीय उपचार देणे बंधनकारक आहे. हे नियम दोन देशांतील युद्धाप्रमाणेच हमाससारखी दहशतवादी संघटना आणि इस्रायल यांच्यातील संघर्षासाठीही लागू असतात. रोम कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयानुसार कोणताही देश युद्धादरम्यान दुसऱ्या देशाच्या नागरिकांना लक्ष्य करू शकत नाही.
युद्धादरम्यान शत्रुदेशाच्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्यास तो युद्धगुन्हा ठरतो. याशिवाय, युद्धात रासायनिक आणि जैविक शस्त्रांच्या वापरावरही बंदी आहे. लष्करीदृष्ट्या आवश्यक नसलेल्या मालमत्तेचा नाश करणे, नागरिकांवर, नागरी वसाहतींवर हेतुपुरस्सर हल्ले करणे ही युद्धगुन्हेगारी असेल. ही नियमावली मात्र जगातल्या अनेक देशांनी अद्याप स्वीकारलेली नाही.
दरम्यान, इस्रायलचे प्रत्युत्तर कायदेशीर आहे का? कायदा तोडणाऱ्यांवर वचक कसा ठेवणार? आणि युद्धगुन्ह्यांवर नियंत्रणाचे अन्य मार्ग कोणते? याबाबत माहिती असणेही महत्त्वाचे आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
- विश्लेषण: हमास-इस्रायल संघर्षात आंतरराष्ट्रीय युद्धनियमांचे किती उल्लंघन?
- पॅलेस्टिनी नागरिकांच्या विस्थापनाचा इतिहास
- विश्लेषण : हमासची युद्धशैली बदलत आहे का ?
- Israel-Palestine War : इस्रायलमधील योम किप्पूर युद्धाची पुन्हा आठवण का काढली जात आहे?
- इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे वैर कधीपासून आहे? आतापर्यंत कितीवेळा झाला संघर्ष?
- ‘हमास’च्या इस्रायलवरील हल्ल्यामागचे कारण काय? आखातात मोठ्या युद्धाचा भडका उडणार?
- विश्लेषण : इस्रायल-हमास संघर्षाने खनिज तेल आणखी भडकणार का?
- यूपीएससीसाठी महत्त्वाचे : इस्रायल-हमास संघर्षाचे परिणाम, कोणता देश कुणाच्या बाजूने, भारताची भूमिका काय अन् त्यामागची कारणमीमांसा
२) अतिनील किरणांचा निर्देशांकात वाढ, नेमकी कारण काय?
ऑक्टोबर महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये उष्णतेचा तडाखा जाणवला. यामागे अतिनील किरणांचा तीव्र मारा जबाबदार असल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडच्या काळात अतिनील किरण निर्देशांक (यूव्ही इंडेक्स) धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे दिसून आले आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील पर्यावरण या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे अतिनील किरणांचा निर्देशांक म्हणजे नेमकं काय? त्याचे प्रकार कोणते? पृथ्वीपर्यंत अतिनील किरणे पोहोचण्याची कारणे काय?
अतिनील किरणांची तीव्रता कमी करण्यासाठीचे उपाय कोणते? यासंदर्भातील माहिती असणे गरजेचं आहे.
तुमच्या माहितीसाठी :
किरणांची तीव्रता मोजण्यासाठी जो निर्देशांक वापरला जातो त्याला अतिनील निर्देशांक म्हटलं जाते. त्यानुसार ०-२ हा निर्देशांक सर्वात कमी धोका सुचवतो, ३-४ निर्देशांक कमी धोका, ५-६ निर्देशांक मध्यम धोका, ७-१० मोठा व दहापेक्षा जास्त निर्देशांक सर्वाधिक धोका सुचवतो. सकाळी व संध्याकाळी सूर्यकिरण तिरक्या दिशेने येतात तेव्हा ती विस्तृत ओझोन थरातून पृथ्वीवर येतात व त्यामुळे अतिनील किरणांचं प्रमाणही कमी होतं. मात्र सूर्य डोक्यावर येऊ लागला की साधारणपणे दुपारी १२ ते ३ या वेळेत या किरणांचा जास्त प्रादुर्भाव जाणवतो. सूर्यकिरणांचा हा कोन अक्षवृत्तानुसार बदलत असतो. दुपारी विषुववृत्तीय व उष्ण कटिबंधीय प्रदेशात आणि उन्हाळ्यात तो नेहमीच जास्त असतो.
पृथ्वीच्या पर्यावरणावर या किरणांचा फार मोठा परिणाम होतो. तीनदशांश ते चारदशांश मायक्रोमीटर तरंगलांबीच्या ऊर्जेला यूव्ही-ए असं संबोधलं जातं यामुळे त्वचेत ‘ड’ जीवनसत्त्व तयार होतं मात्र त्यामुळे त्वचा होरपळणं , मोतीबिंदू अशा समस्या निर्माण होतात. एकोणतीस शतांश ते बत्तीस शतांश मायक्रोमीटर तरंगलांबीची ऊर्जा वातावरणात पूर्णपणे शोषली जाते व ती पृथ्वीवर पोहोचत नाही.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.