UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) अयोध्या विमानतळाला महर्षी वाल्मिकींचे नाव

३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथे नव्याने बांधलेल्या महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन केले. या विमानतळाला भारतीय संस्कृतीतील महान ऋषी वाल्मिकी यांचे नाव देण्यात आले. हे नामकरण आणि उद्घाटन आयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील इतिहास, कला व संस्कृती या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे वाल्मिकी ऋषी कोण होते? याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांच्या ‘अर्ली इंडिया’ या पुस्तकानुसार, वाल्मिकी ऋषींना आदी कवी किंवा पहिले कवी म्हणून संबोधले जाते. संस्कृत साहित्य परंपरेतील पहिले महाकाव्य मानले जाणारे रामायण रचण्याचे श्रेय त्यांना आहे. रामायणाचे वर्णन नेहमीच ‘पहिली साहित्यिक रचना’ असे केले असले तरी इतर महाकाव्यांना हे लागू होत नाही, परंतु साहित्यिक विश्लेषणानुसार व्यासांनी रचलेले महाभारत हे रामायणाच्या आधी रचले गेले असावे, असे रोमिला थापर नमूद करतात. रामायणाची भाषा अधिक प्रगल्भ तसेच कथा समाजाशी जवळचा संबंध प्रस्थापित करणारी आहे. असे असले तरी रामायण आणि महाभारत या दोघांपैकी पारंपरिकरित्या रामायण हे आधीचे मानले जाते. रामायण हे इसवी सनपूर्व पहिल्या शतकात रचले गेले असा तर्क त्या मांडतात, तर रॉबर्ट गोल्डमन या सारख्या विद्वानांनी रामायण हे इसवी सनपूर्व आठव्या शतकापूर्वी रचले गेल्याचे नमूद केले आहे.

वाल्मिकी ऋषींच्या जातीविषयी अनेक वाद आहेत. त्यात दोन मुख्य प्रवाह म्हणजे, देशभरातील अनेक अनुसूचित जाती वाल्मिकी ऋषींचा संबंध आपल्याशी जोडतात, तर काही ते ब्राह्मण असल्याचे सांगतात. २०१६ मध्ये, कर्नाटक सरकारने ‘वाल्मिकी यारू?’ नावाच्या पुस्तकानंतर वाल्मिकींची जात निश्चित करण्यासाठी १४ सदस्यीय समितीची स्थापना केली होती. कन्नड लेखक के एस नारायणाचार्य यांनी लिहिलेल्या (वाल्मिकी कोण आहेत?) या पुस्तकात, नारायणाचार्य यांनी वाल्मिकी ब्राह्मण असल्याचा दावा केला. त्यामुळे वाल्मिकी त्यांच्यापैकीच एक होते असे मानणाऱ्या नाविक (नौकावाले) समुदायाकडून यावर जोरदार टीका करण्यात आली होती.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) काकोरी ट्रेन घटनेचे १०० वे वर्ष

काकोरी येथील रेल्वे लूट घटनेला आता ९९ वे वर्ष पूर्व झाले असून पुढील वर्ष हे या घटनेचे १०० वे वर्ष असणार आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील इतिहास या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही घटना नेमकी काय? याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

ऑगस्ट १९२५ मध्ये काकोरी येथे ट्रेनवर घातलेला दरोडा ही HRA ची पहिली मोठी कारवाई होती. शहाजहानपूर आणि लखनौ दरम्यान ८ क्रमांकाची डाउन ट्रेन धावली, या गाडीत ब्रिटिश खजिन्यात जमा होणारा माल होता. क्रांतिकारकांनी हा पैसा लुटण्याची योजना आखली, त्यांच्या मते ही संपत्ती भारतीयांचीच आहे आणि ती घेणे कायदेशीर आहे. त्यांचे उद्दिष्ट HRA ला निधी देणे आणि त्यांच्या कामासाठी आणि ध्येयासाठी लोकांचे लक्ष वेधणे हे होते.

९ ऑगस्ट १९२५ रोजी लखनौपासून १५ किमी अंतरावर असलेल्या काकोरी स्टेशनवरून ट्रेन जात असताना आत बसलेले HRA चे सदस्य राजेंद्रनाथ लाहिरी यांनी चेन ओढून ट्रेन थांबवली. त्यानंतर, राम प्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान यांच्यासह सुमारे दहा क्रांतिकारकांनी ट्रेनमध्ये प्रवेश केला आणि गार्डला वेठीस धरले. त्यांनी तिजोरीतील पिशव्या (अंदाजे ४,६०० रुपये) लुटल्या आणि लखनौला पळून गेले.

या घटनेत माऊसर बंदुकीने धरलेल्या चुकीच्या निशाण्यामुळे, एक प्रवासी (अहमद अली नावाचा वकील) दरोड्याच्या वेळी ठार झाला, यामुळे सकारात्मक सार्वजनिक प्रतिक्रिया मिळविण्याच्या क्रांतिकारकांच्या हेतूंना हानी पोहोचवली. या घटनेमुळे ब्रिटिश अधिकारी संतप्त झाले, त्यांनी हिंसक कारवाई केली आणि लवकरच HRA च्या अनेक सदस्यांना अटक केली.

एचआरएच्या दोन सदस्यांनी विश्वासघात केल्यामुळे बिस्मिल यांना ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आली होती. अशफाकुल्ला नेपाळ आणि नंतर डाल्टनगंज (सध्याच्या झारखंडमध्ये) पळून गेले. परंतु वर्षभरानंतर त्यांना अटक झाली. ब्रिटिशांनी अटक केलेल्या ४० जणांपैकी चार जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर इतरांना दीर्घकाळ तुरुंगवासाची शिक्षा झाली. यावेळी HRA चे एकमेव प्रमुख नेते चंद्रशेखर आझाद मात्र ब्रिटिशांच्या तावडीत सापडले नाहीत.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc key current affairs kakori train robbery and ayodhya valmiki airport lsca spb