UPSC Key : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) भारतातील हत्ती गणना होणारा विलंब
भारतात वाघांप्रमाणेच हत्तींचीदेखील गणना होत आहे. मात्र, यावेळी गणनेची अंतिम आकडेवारी मिळण्यास विलंब होणार आहे. यावर्षी व्याघ्रगणनेला आणि आकडेवारीलादेखील उशीर झाला होता.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएसी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
हत्ती गणनेची आकडेवारी मिळण्यास उशीर का?
हत्तींची गणना कधी केली जाते?
सर्वाधिक हत्ती कोणत्या राज्यात?
मागील पाच वर्षांत किती हत्ती गमावले?
‘प्रोजेक्ट एलिफंट’
तुमच्या माहितीसाठी :
उत्तरेकडील हिमालयाच्या पायथ्याशी, ईशान्य राज्ये, पूर्व-मध्य भारत आणि देशाच्या दक्षिणेकडील भागांमध्ये जंगली हत्ती आढळतात. ईशान्येकडील भागात मुसळधार पाऊस, पूर आणि वनकर्मचाऱ्यांची मर्यादित क्षमता यामुळे तपशील संकलन आणि विश्लेषण अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे भारतातील जंगली हत्तींची संख्या जाणून घेण्यासाठी पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ही आकडेवारी जून २०२५ पर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.
हत्तींची गणना दर पाच वर्षांतून एकदा केली जाते. ती प्रामुख्याने हत्तींची संख्या मोजणाऱ्या राज्यांवर अवलंबून असते. अलिकडच्या वर्षांत विष्ठेच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासारखे तंत्रदेखील हत्तींमधील जन्मदर आणि लोकसंख्येच्या ट्रेंडचा अंदाज लावण्यासाठी वापरण्यात आले आहे.
२०१७ मधील शेवटच्या गणनेनुसार, भारतात २९ हजार ९६४ हत्ती होते, जे जागतिक आशियाई हत्तींच्या संख्येच्या ६० टक्के आहे. सध्या देशातील १४ राज्यांमध्ये सुमारे ३१ वनक्षेत्रे हत्तींसाठी संरक्षित आहेत. गेल्या तीन वर्षांत दांडेली हत्ती राखीव कर्नाटक राज्याने अधिसूचित केले आहे, नागालँडने सिंगफन एलिफंट रिझर्व्ह आणि छत्तीसगढमधील लेमरू हत्ती रिझर्व्ह यांचा नवीन जंगलांमध्ये समावेश आहे.
कर्नाटक राज्यात सर्वाधिक हत्ती आहेत. जगभरात असणाऱ्या एकूण हत्तींपैकी ६० टक्क्यांहून अधिक जंगली आशियाई हत्ती भारतात आहेत. २०१७ मध्ये झालेल्या गणनेनुसार, भारतात एक लाख दहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळात २९ हजार ९६४ हत्तींचे वास्तव्य आहे. ईशान्य प्रदेशात १० हजार १३९ हत्ती आहेत. पूर्व-मध्य प्रदेशात ३ हजार १२८, वायव्य भागात २ हजार ८५ आणि दक्षिण भागात ११ हजार ९६० हत्ती आहेत. कर्नाटक राज्यात सर्वाधिक ६ हजार ४९ हत्ती आहेत.
जंगल कटाईमुळे हत्तींचा घटता अधिवास, हस्तिदंतांच्या मागणीमुळे होणारी कत्तल या कारणांमुळे हत्तींची संख्या कमी झाली आहे. IUCN च्या यादीनुसार आशियाई हत्ती संकटग्रस्त प्रजाती आहे आणि वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार अनुसूची १ मध्ये त्याचा समावेश होतो. त्यासाठी त्यांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली. भारतामध्ये हत्तींच्या संवर्धनासाठी १९९२ मध्ये ‘प्रोजेक्ट एलिफंट’ सुरू करण्यात आला. तसेच १२ ऑगस्ट हा ‘हत्ती दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
UPSC-MPSC : १९९२ साली भारतात ‘प्रोजेक्ट एलिफंट’ का सुरू करण्यात आला? त्याची वैशिष्ट्ये कोणती?
भारतात जवळपास ३० हजार हत्ती… व्याघ्रगणनेइतकीच हत्ती गणना का आवश्यक?
२) नामिबियामध्ये ७०० प्राण्यांच्या कत्तलीचे आदेश
आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून, त्याचा सर्वाधिक परिणाम नामिबिया देशावर झाला आहे. देशात अन्नधान्याचा भीषण तुटवडा निर्माण झाला आणि भूकबळीने लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे सातशेहून अधिक प्राण्यांना ठार मारून, त्यांचे मास लोकांना खाऊ घालण्यास देण्याचे आदेश नामिबिया सरकारने दिले आहेत.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएसी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
नामिबियामध्ये भीषण दुष्काळयुक्त स्थिती निर्माण होण्याचे कारण काय?
वन्य प्राण्यांची हत्या करणे सामान्य आहे का?
तुमच्या माहितीसाठी :
नामिबिया हा दुष्काळग्रस्त प्रदेश दक्षिण आफ्रिकेत स्थित आहे. या प्रदेशात भीषण दुष्काळयुक्त स्थिती वारंवार निर्माण झाली आहे. २०१३, २०१६ व २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणातील दुष्काळामुळे या देशाने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती. परंतु, सध्याचा दुष्काळ मोठा आणि विनाशकारी आहे, असे नामिबियातील जागतिक वन्यजीव निधीचे संचालक ज्युलियन झेडलर यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले.
ऑक्टोबर २०२३ मध्ये बोत्सवानामध्ये दुष्काळाची सुरुवात झाली. पुढे हा दुष्काळ अंगोला, झांबिया, झिम्बाब्वे व नामिबियामध्ये पसरला आणि भीषण रूप धारण केले. आज दक्षिण आफ्रिकेच्या बहुतेक भागांवर दुष्काळाचा परिणाम झाला, असे युरोपियन कमिशनच्या अहवालात म्हटले आहे.
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत नामिबियामध्ये अन्नाची उपलब्धता कमी असते आणि दुष्काळामुळे ही परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. मक्यासारखी मुख्य पिके सुकली आहेत, मोठ्या संख्येने पशुधन नष्ट झाले आहे आणि देशातील जवळपास ८४ टक्के अन्नसाठा संपला आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्याने २३ ऑगस्ट रोजी सांगितले.
अन्नसाठा कमी झाल्यामुळे किमती गगनाला भिडल्या आहेत; ज्यामुळे अन्नधान्याची उपलब्धता कमी झाली आहे. “एप्रिल ते जून २०२४ दरम्यान अंदाजे १.२ दशलक्ष लोकांना नामिबियामध्ये तीव्र अन्नटंचाईचा सामना करावा लागला आहे आणि उपजीविकेच्या संरक्षणासाठी तातडीची कारवाई करण्याची आवश्यकता आहे,” असे इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी फेज क्लासिफिकेशन (आयपीसी)ने जुलैमध्ये एका अहवालात म्हटले आहे.
जगभरात विविध प्रजातींच्या वन्य प्राण्यांची शिकार केली जाते. नामिबियाच्या यादीत असलेले झेब्रा, ब्ल्यू वाइल्ड बीस्ट (जंगली बैल) व नीलगाय यांसारखे प्राणी सामान्यतः दक्षिण आफ्रिकन प्रदेशातील लोक खातात, असे ‘एनवायटी’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्रामचे आफ्रिका कार्यालयाचे संचालक रोझ म्वेबाझा यांनी ‘एनवायटी’ला सांगितले की, या प्राण्यांची कत्तल वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध, शाश्वत पद्धतींचा वापर करून केली जाते. त्यात प्राणी कल्याणाचा विचार केला जातो आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय वचनबद्धता आणि कायद्याचे पालन केले जाते. त्यामुळे काळजीचे कारण नाही.
यासंदर्बातील महत्त्वाचे लेख :
‘हा’ देश प्राण्यांच्या जीवावर उठला; ७०० हून अधिक प्राणी मारण्याचे सरकारने दिले आदेश, कारण काय?
यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…