UPSC Key : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) परम रुद्र सुपर कॉम्प्युटर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (२६ सप्टेंबर) तीन स्वदेशी विकसित परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्सचे अनावरण केले. भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीसाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील समान्य अध्ययन पेपर ३ मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्स काय आहे?
या कॉम्प्युटर्सचे वैशिष्ट्य काय?
भारतासाठी या कॉम्प्युटर्सचे महत्त्व काय?

तुमच्या माहितीसाठी :

परम रुद्र ही एक उच्च-कार्यक्षमता संगणकीय प्रणाली आहे. हे सुपर कॉम्प्युटर्स नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन (एनएसएम) अंतर्गत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) द्वारे स्वदेशी पद्धतीने विकसित केले गेले आहेत.

भारताला स्वावलंबी करण्याकरिता केंद्राच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून याकडे बघितलं जातं. १३० रुपये खर्चून तयार करण्यात आलेले हे तीन सुपर कॉम्प्युटर पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे वैज्ञानिक संशोधनासाठी सोपविण्यात आले आहेत.

परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्स विविध क्षेत्रांमधील संशोधनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. पुण्यातील जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी), फास्ट रेडिओ बर्स्ट (एफआरबी) आणि इतर खगोलशास्त्रीय अन्वेषण करण्यासाठी सुपर कॉम्प्युटर्सचा वापर करण्यात येणार आहे.

या सुपर कॉम्प्युटर्समध्ये अनेक हजार इंटेल सीपीयू, ९० अत्याधुनिक ‘निव्हिडिया ए १००’ जीपीयू, ३५ टेराबाइट्स मेमरी आणि दोन पेटाबाइट्स स्टोरेज प्रणाली आहे. ही प्रगत प्रणाली खगोलशास्त्रातील वैज्ञानिक अभ्यासाला नवीन उंचीवर नेईल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. दिल्लीतील इंटर युनिव्हर्सिटी एक्सीलरेटर सेंटर (आययूएसी) मधील सुपर कॉम्प्युटर अणु भौतिकशास्त्र आणि भौतिक विज्ञान यांसारख्या संशोधनाला चालना देईल.

देशांतर्गत हे सुपर कॉम्प्युटर्स तयार करून भारत तांत्रिक स्वावलंबनाकडे मोठी प्रगती करत आहे. हे सुपर कॉम्प्युटर्स तांत्रिक नवकल्पना आणि विज्ञानाचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्याच्या राष्ट्राच्या व्यापक उद्दिष्टांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आहेत.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्स काय आहेत? भारताने विकसित केलेले हे संगणक का आहेत खास?

२) अरुणाचल प्रदेशातील शिखराला दलाई लामांचे नाव

भारतीय गिर्यारोहक पथकाने अरुणाचल प्रदेशातील एका अज्ञात शिखराला सहाव्या दलाई लामांचे नाव दिल्याबद्दल बिजिंगने आक्षेप घेतला आहे. चीनने अरुणाचल प्रदेशावर पुन्हा आपला दावा सांगितला आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडमोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील भारत आणि त्याचे शेजारी देशांशी असलेले संबंध काय घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

तुमच्या माहितीसाठी :

गेल्या आठवड्यात, संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय गिर्यारोहण आणि साहस क्रीडा संस्थेच्या (National Institute of Mountaineering and Adventure Sports -NIMAS) १५ सदस्यीय पथकाने अरुणाचल प्रदेशातील एका अज्ञात शिखरावर चढाई केली. NIMAS चे संचालक कर्नल रणवीर सिंग जामवाल यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने १५ दिवसांत गोरिचेन श्रेणीतील २०,९४२ फूट उंच शिखर पार केले. त्यांनी या शिखराला त्संगयांग ग्यात्सो शिखर असे नाव दिले.

हे नाव १६८२ साली तवांग येथे जन्मलेल्या सहाव्या दलाई लामांच्या नावावरून देण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सहाव्या दलाई लामांच्या कालातीत ज्ञानाचा आणि मोंपा समाजासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून या शिखराला हे नाव देण्यात आले आहे.

२६ सप्टेंबर रोजी, चीनने अरुणाचल प्रदेशातील शिखराला दिलेल्या नावाला आपला विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी त्यांना याबद्दल माहीत नसल्याचे सांगितले. मात्र, अरुणाचल प्रदेश, ज्याला बीजिंग ‘झांगनान’ म्हणून संबोधते, तो “चिनी प्रदेश” आहे असेही ते म्हणाले. बीजिंगमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “भारताने तथाकथित “अरुणाचल प्रदेश” ची स्थापना चिनी प्रदेशात करणे बेकायदेशीर आहे. चीन आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

बीजिंगने अरुणाचल प्रदेश या संपूर्ण राज्यावर दावा केला आहे. ते या प्रदेशाला ‘झांगनान’, तिबेटचा दक्षिणेकडील भाग म्हणून संबोधतात आणि तो चीनचा अविभाज्य भाग आहे असे सांगतात. चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग म्हणून दर्शवला जातो.

२०१७ पासून बीजिंगने अरुणाचल प्रदेशातील स्थळांना नवीन नावे देण्यास सुरुवात केली आहे. भारताने नेहमीच अरुणाचल प्रदेशावरचे चिनी दावे फेटाळले आहेत. गेल्या वर्षी चीनने अरुणाचल प्रदेशातील ११ स्थानांची नावे बदलल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) ‘अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील, नवीन नावे देण्याचे प्रयत्न हे वास्तव बदलू शकणार नाहीत असे सडेतोड उत्तर दिले होते.

चीन प्रत्येक वेळी अरुणाचल प्रदेशाला कोणत्याही भारतीय नेत्यांनी भेट दिल्यास नाराजी व्यक्त करतो. या वर्षाच्या सुरुवातीला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अरुणाचल प्रदेश भेटीवर बीजिंगच्या आक्षेपांना नवी दिल्लीनं फेटाळून लावलं होतं. मोदी यांच्या भेटीनंतर, अमेरिकेने अरुणाचल प्रदेशाला भारतीय प्रदेश म्हणून मान्यता दिली, त्यामुळे चीनने संताप व्यक्त केला आणि त्ंयाच्या भौगोलिक हितसंबंधांसाठी इतर देशांच्या विवादांचा फायदा घेतल्याचा आरोप अमेरिकेवर केला.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

Sino-Indian tensions:अरुणाचल प्रदेशातील शिखराला दलाई लामांचे नाव दिल्यामुळे चीनचा संताप; काय आहे नेमकं प्रकरण?

UPSC-MPSC : भारत-चीन संबंध; १९६२ चे युद्ध, सीमावाद व व्यापार

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा..

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc key current affairs param rudra supercomputer tsangyang gyatso peak naming lsca spb