Sheikh Hasina Visit to India : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) शेख हसीना यांचा भारत दौरा

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शुक्रवारी (२१ जून) भारतात आल्या आहेत. शेख हसीना दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. गेल्या दोन आठवड्यांत शेख हसीना यांचा दुसरा भारत दौरा आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील भारताचे शेजारी देशांशी असलेले संबंध या घटकांचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

भारत बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक संबंध

तुमच्या माहितीसाठी :

नद्यांच्या पाणीवाटपाबाबत भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये अनेक दशकांपासून वाद सुरू आहे. दोन्ही राष्ट्रांमधील पाणीवाटपाच्या समस्यांवरील तोडग्यासाठी भारतासह बांगलादेशकडून प्रयत्न केले जात आहेत.

बांगलादेशला तीस्ता नदीचा आपला भाग विकसित करायचा आहे. त्यासाठीदेखील ही भेट महत्त्वाची आहे. तसेच बांगलादेशला भारताकडून कांदा, आले, तांदूळ व गहू यांचा स्थिर पुरवठा हवा आहे. अशा विविध विषयांवर महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

एकीकडे भारत आणि बांगलादेशदरम्यान वाहणाऱ्या गंगा व तीस्ता या दोन्ही नद्यांच्या पाणीवाटपावरून वाद आहे; तर दुसऱ्या बाजूला चीनने बांगलादेशला तीस्ता नदीच्या विकास प्रकल्पासाठी एक अब्ज डॉलर्सचा प्रकल्प हाती घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे चीन व बांगलादेशमध्ये होऊ घातलेल्या अशा प्रकारच्या प्रकल्पाबाबत भारताने सावधगिरी बाळगणे पसंत केले आहे.

मोंगला बंदराच्या वापराबाबतही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. हे बांगलादेशातील दुसरे सर्वांत मोठे बंदर आहे. भारत इराणच्या चाबहार बंदर किंवा म्यानमारच्या सित्तवे बंदराचा विकास करण्याचा विचार करीत आहे. या बंदराचा विकास करण्याच्या मोबदल्यात भारताला इराणमार्गे मध्य आशिया आणि युरेशियातील बाजारपेठ व्यापारासाठी लाभेल, असे सांगितले जाते.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

UPSC-MPSC : बांगलादेशची निर्मिती कशी झाली? यात भारताची भूमिका काय होती?

UPSC-MPSC : भारत-बांगलादेश यांच्यातील सहकार्याची क्षेत्रे कोणती?

२) केनिया सरकारकडून भारतीय कावळ्यांचा संहार

केनिया सरकारने २०२४ च्या अखेरपर्यंत मूळ भारतीय वंशांचे (कॉर्वस स्प्लेंडेंस) तब्बल एक दशलक्ष कावळे मारण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील पर्यावरण आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधतेचे प्रकार, पर्यावरण, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

या निर्णयामागे दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे स्थानिक परिसंस्थेवर होणारा लक्षणीय नकारात्मक प्रभाव आणि दुसरे कारण म्हणजे जनतेला होणारा उपद्रव.
या भारतीय वंशांच्या कावळ्यांच्या उपद्रवामुळे पर्यटन, शेती, हॉटेल व्यवसाय यावर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सरकारने सांगितले आहे.

हे कावळे परदेशी (भारतीय) आहेत, केनियाच्या परिसंस्थेला त्यांची गरज नाही किंवा ते तिथे असणे आवश्यक नाही. त्यांची वाढती संख्या मात्र स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

शेतीचे नुकसान, हॉटेल्समधील खाद्यपदार्थांवर हल्ला यांमुळे स्थानिक शेतकरी आणि व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. हे कावळे भारत तसेच इतर काही आशियायी देशांमधून शिपिंगद्वारे केनियात पोहोचले आहेत.

केनिया हा पूर्व आफ्रिकेतील हिंदी महासागराच्या किनारपट्टीवर असलेला देश आहे. वन्यजीवसृष्टीसाठी पर्यटक या देशाला मोठ्या संख्येने भेट देतात. एकूणच या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटनावर आधारित आहे.

भारतीय वंशाच्या वाढत्या कावळ्यांमुळे पर्यटन व्यवसायालाही चांगलाच फटका बसत आहेत. त्यामुळे केनियाच्या सरकारने यावर्षाखेरीस १० लाख कावळे मारण्याचा निर्णय घेतला आहे.

केनियामध्ये २० वर्षांपूर्वीच्या कावळ्यांची संख्या कमी करण्यासाठी असाच एक प्रयत्न करण्यात आला होता. या प्रयत्नामुळे त्यांची संख्या तात्पुरती कमी झाली होती. १९९९ आणि २००५ दरम्यान, ए रोचा केनिया, या संरक्षण आणि संशोधन संस्थेने केनियाच्या किनारपट्टीवरील मालिंदी या शहरातील कावळे नष्ट करण्यासाठी स्टरीलिसाइज्ड नावाचा एव्हीयन विषप्रयोग केला होता. त्यावेळी ५० टक्के कावळे नष्ट झाल्याचे नोंदविण्यात आले होते. पण केनिया सरकारने नंतर स्टरीलाइज्डच्या आयातीवर बंदी घातली आणि आज हजारोंच्या संख्येने कावळे मालिंदीमध्ये परतले आहेत.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

केनिया सरकार करणार १० लाख भारतीय कावळ्यांचा संहार; काय आहे नेमकं प्रकरण?

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा..