UPSC Key In Marathi : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) भारतीयांचं परदेशात स्थायिक होण्याचं वाढणारं प्रमाण
१९९९ ते २००१ दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि २००४ ते २००८ दरम्यान भारताच्या पंतप्रधानांचे सल्लागार राहिलेल्या संजय बारू यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’मध्ये भारतातील स्थलांतरावर लिहिलेला लेख चांगलाच चर्चेत आहे. ते लिहितात : ‘मेहसाणा येथून ३०३ भारतीयांनी एकाच वेळी निकाराग्वाला उड्डाण केले’ या अलीकडच्याच एका वृत्तासंदर्भात प्रतिक्रिया घेणाऱ्या पत्रकाराशी बोलताना एकजण म्हणाला, इथं चांगल्या पगाराच्या खासगी नोकऱ्या नाहीत. त्यामुळे इथे भारतात राहून सतत संघर्ष करत राहण्यापेक्षा कॅनडा किंवा अमेरिकेत जाऊन कोणतीही लहानसहान नोकरी करणं आणि चांगले पैसे मिळवणं चांगलंच.’
संजय बारू यांच्या लेखानंतर स्थलांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे स्थलांतर म्हणजे नेमकं काय? गेल्या काही वर्षांतली स्थलांतराबाबची आकडेवारी काय सांगते? संयुक्त राष्ट्राने केलेली स्थलांतराची व्याख्या काय? पूश आणि पूल फॅक्टर म्हणजे काय? आणि स्थलांतर रोखण्यासाठी कोणत्या आव्हानांचा सामना करावी लागतो. यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भूगोल तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
‘द हिंदू’ या वृत्तपत्राच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या काळात, बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करताना तब्बल ९६,९१७ भारतीयांना अटक करण्यात आली. २०१९-२० मध्ये बेकायदेशीरपणे अमेरिकेत शिरण्याचा प्रयत्न करताना पकडल्या गेलेल्या भारतीयांची संख्या १९,८८२ होती तर २०२१-२२ मध्ये अशा पद्धतीने पकडल्या गेलेल्या भारतीयांची आकडेवारी ६३,९२७ होती. याशिवाय २१ जुलै २०२३ रोजी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं की २०२२ मध्ये एकूण २,२५,२६० भारतीयांनी त्यांच्या ‘भारतीय नागरिकत्वा’चा त्याग केला. २०२० मध्ये हे प्रमाण ८५,२५६, तर २०११-२२ या कालावधीत एकूण १६,६३,४४० भारतीयांनी त्यांचं नागरिकत्व सोडलं होतं. २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांत हा आकडा ८७,०२६ वर होता.
यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख :
- संजय बारू यांचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
- UPSC-MPSC : भारतातील स्थलांतराचे स्वरूप आणि प्रकार कोणते?
- UPSC-MPSC : बुद्धिवंतांचे स्थलांतर म्हणजे काय? त्याचे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिणाम कोणते?
- UPSC-MPSC : महाराष्ट्रातील स्थलांतर भाग १ : हेतू, कारणे अन् स्वरूप
- UPSC-MPSC : महाराष्ट्रातील स्थलांतर भाग-२ : स्थलांतराच्या कारणानुसार स्थलांतरीतांचे स्वरूप
२) आंतरराष्ट्रीय कोर्टात इस्रायलविरूद्ध नरसंहाराचा खटला दाखल
दक्षिण अफ्रिकेने २९ डिसेंबर इस्रायलविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) खटला दाखल असून इस्रायलने १९४८ च्या नरसंहार अधिवेशनातील नियमांचं उल्लंघन केल्याचं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाहीर करावं, अशी मागणी दक्षिण अफ्रिकेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने इस्रायलविरुद्ध खटला का दाखल केला? आणि संयुक्त राष्ट्राचा नरसंहार करार काय आहे? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, एजन्सी आणि मंच, त्यांची रचना, आदेश या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
जगभरात विविध समुदायांवरील हल्ल्यांच्या प्रकरणावर बोलताना ‘नरसंहार’ हा शब्द सहसपणे वापरला जातो. परंतु १९४८ मध्ये नरसंहाराच्या गुन्ह्याचा प्रतिबंध आणि शिक्षेवरील संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नरसंहाराचे निश्चित निकष वापरून त्याची व्याख्या करण्यात आली. त्यानुसार, “नरसंहार म्हणजे राष्ट्रीय, वांशिक किंवा धार्मिक गटाचा संपूर्ण किंवा अंशतः नाश करण्याच्या उद्देशाने केलेली खालीलपैकी कोणतीही कृत्ये, जसे की (अ) विशिष्ट गटाच्या सदस्यांची हत्या (ब) विशिष्ट गटातील सदस्यांना गंभीर शारीरिक किंवा मानसिक नुकसान पोहोचवणे (क) संपूर्ण किंवा अंशतः विध्वंस घडवून आणण्यासाठी समुहावर जाणीवपूर्वक काही परिस्थिती लादणे; (ड) एखाद्या समुहातील जन्म रोखणे; (ई) एखाद्या गटातील मुलांना बळजबरीने दुसऱ्या गटात स्थानांतरित करणे. या करारात असंही म्हटलं आहे की, करार करणारा कोणताही पक्ष संयुक्त राष्ट्रांच्या सनदीनुसार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नरसंहार योग्य वाटतो अशी कारवाई करण्याआधी संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्याही सक्षम विभागाशी संपर्क करू शकतो.”
संयुक्त राष्ट्रांच्या सहा प्रमुख घटकांपैकी आंतरराष्ट्रीय न्यायालय हा एक महत्त्वाचा घटक आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरद्वारे झाली आणि एप्रिल १९४६ मध्ये या न्यायालयाने प्रत्यक्ष काम करण्यास सुरुवात केली. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख न्यायिक अंग असलेल्या या संस्थेचे मुख्यालय नेदरलँड देशातील हेग या शहरात पीस पॅलेस येथे स्थित आहे. त्याच्या अधिकृत भाषा इंग्रजी आणि फ्रेंच आहेत.
यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख :
- आंतरराष्ट्रीय कोर्टात इस्रायलविरूद्ध नरसंहाराचा खटला दाखल, दक्षिण आफ्रिकेचा गाझाला इतका पाठिंबा का?
- UPSC-MPSC : आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणते? त्यांच्यासमोर नेमकी कोणती आव्हाने असतात?
- UPSC-MPSC : आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय यांच्यात नेमका फरक काय?
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.