UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) सर्वोच्च न्यायालयात ‘माय लॉर्ड’वरून वाद
सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (३ नोव्हेंबर) न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्यासमोर एका प्रकरणावर सुनावणी सुरू होती. यावेळी वकिलांनी सातत्याने “माय लॉर्ड”, “युअर लॉर्डशिप” या शब्दांचा उच्चार केला. त्यामुळे न्यायमूर्तींनी या वकील महोदयांच्या उल्लेखावर आक्षेप घेतला. “तुम्ही आणखी किती वेळा ‘माय लॉर्ड्स’ म्हणाल? जर तुम्ही हे म्हणणं बंद केलं, तर मी तुम्हाला माझा निम्मा पगार देईन. तुम्ही याऐवजी थेट ‘सर’ का नाही म्हणत?” असा प्रश्न न्यायमूर्ती नरसिम्हा यांनी यावेळी केला.
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील राज्यघटना या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
भारतात न्यायाधीशांना संबोधित करताना माय लॉर्ड हा शब्द सर्रास वापरला जातो. मात्र तो मूळचा भारतीय शब्द नाही. इंग्लंड आणि फ्रान्स या देशांतून हा शब्द भारतात आलेला आहे. ‘लिगल सर्व्हिस इंडिया’ या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार १४३० सालादरम्यान फ्रान्समध्ये सन्माननीय किंवा धनाढ्य व्यक्तींना ‘मिलोर्ट’ (Millourt) असे म्हटले जायचे.
त्या काळात इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात युद्ध सुरू होते. हे युद्ध साधारण १०० वर्षे चालले. याच काळात फ्रान्समधील हा शब्द पुढे इंग्लंडमध्ये आला होता. इंग्लंडमध्ये मिलोर्ट ऐवजी इंग्रजीमध्ये ‘माय लॉर्ड’ असे म्हटले जाऊ लागले. इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यातील युद्ध संपल्यानंतर साधारण शंभर वर्षांनी इंग्लंडमधील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या माध्यमातून हा शब्द संपूर्ण युरोपात पोहोचला. याच काळात इंग्लंडमध्ये न्यायाधीशांना तसेच प्रतिष्ठित व्यक्तींना संबोधित करताना माय लॉर्ड हा शब्द वापरला जाऊ लागला.
भारतात न्यायालय, न्यायाधीशांना माय लॉर्ड असे संबोधित करण्यावरून वेगवेगळी मतमतांतरं आहेत. गेल्या अनेक दशकांपासून या शब्दावरून वाद सुरू आहे. अनेकजण माय लॉर्ड हा शब्द फक्त आदरभावनेने वापरला जातो, असे म्हणतात. तर या माय लॉर्ड हा शब्द वसाहतवादाचे प्रतिक आहे. या शब्दातून वसाहतवादाची आठवण होते. त्यामुळे न्यायाधीशांना संबोधित करताना माय लॉर्ड हा शब्द वापरू नये, असे मत काही जण मांडतात.
२००६ साली बार काऊन्सिल ऑफ इंडियानेदेखील यासंदर्भातला एक ठराव मंजूर केला होता. या ठरावात न्यायाधीशांना ‘माय लॉर्ड’ किंवा ‘माय लॉर्डशीप’ असे संबोधू नये, असे ठरवण्यात आले होते. शिवाय सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एच. एल. दत्तू आणि एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने २०१४मध्ये, वकिलांनी न्यायमूर्तींना काय संबोधावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. न्यायमूर्ती या पदाप्रति आदर व्यक्त होणे आवश्यक आहे, असे म्हटले होते. तुम्ही आम्हाला ‘माय लॉर्ड’ किंवा ‘युवर लॉर्डशिप’ संबोधू नका, पण सर संबोधलेत तरी ते पुरेसे आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले होते.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
- ‘आम्हाला ‘माय लॉर्ड’ म्हणू नका,’ सर्वोच्च न्यायालयाची भूमिका, पण ‘माय लॉर्ड’वरून वाद का होतो? जाणून घ्या…
- UPSC-MPSC : सर्वोच्च न्यायालयाची रचना कशी आहे? सरन्यायाधीश आणि न्यायाधीशांची नेमणूक कोण करते?
२) ‘डाँकी फ्लाइट्स’
अभिनेता शाहरुख खानने ‘डंकी’ या आगामी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला. पंजाबमधील अनेक तरुण परदेशात जाऊन भविष्य घडविण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नांवरच हा सिनेमा आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे डाँकी फ्लाइट्स नेमकं काय? डाँकी फ्लाइट्स पद्धत कुणाकडून अधिक वापरली जाते? अवैध घुसखोरीची पद्धत कशी आहे? जोखीम असूनही डाँकी मार्गाचा अवलंब का केला जातो? यासंदर्भातील माहिती असणे गरजेचं आहे.
तुमच्या माहितीसाठी :
परदेशात अवैध पद्धतीने घुसखोरी करण्यासाठी जागतिक पातळीवर एक संज्ञा वापरली जाते, ज्याला डाँकी फ्लाइट्स (Donkey Flights) म्हणतात. जगभरातील अनेक लोक युनायटेड किंग्डम, कॅनडा आणि युनायटेड स्टेट्समध्ये प्रवेश करण्यासाठी या अवैध मार्गाचा वापर करत असतात. युरोपच्या मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिट्यूटने २०१४ रोजी Donkey Flights यावर एक अहवाल तयार केला. निकोला स्मिथ यांनी या अहवालात पंजाबमधून यूकेमध्ये होणाऱ्या अवैध घुसखोरीबाबत सविस्तर विवेचन केले आहे. यात त्यांनी डाँकी फ्लाइट्स हा शब्द पंजाबमधून आल्याचे नमूद केले. गाढवाच्या पाठीवर ओझे टाकून मजल दरमजल करत केलेल्या प्रवासाला डाँकी फ्लाइट्स हा शब्दप्रयोग प्रचलित झाला. यूकेमध्ये ज्या देशात घुसखोरी करायची आहे, त्याच्या आसपासच्या असलेल्या देशांचा पर्यटन व्हिसा प्राप्त करून त्या देशात पाऊल ठेवायचे आणि नंतर गुप्त मार्गाने हव्या असलेल्या देशात प्रवेश मिळवायचा, अशा पद्धतीने अवैध घुसखोरी केली जाते.
वॉल स्ट्रीट जर्नलने ऑक्टोबर महिन्यात दिलेल्या बातमीनुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये जवळपास ४२ हजार भारतीय नागरिकांनी अवैधरित्या अमेरिकेन सीमा ओलांडून प्रवेश केला. मागच्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्याशी याची तुलना करायची झाल्यास ही संख्या दुपटीने वाढली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक भारतीयांनी अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश केला. तर यूकेच्या गृह खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यूकेमध्ये अवैधरित्या प्रवेश मिळवणाऱ्यांपैकी भारतीय नागरिकांचा गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लिश खाडीमधून अतिशय छोट्या बोटीतून धोकादायक पद्धतीने प्रवास करून स्थलांतरित नागरिक यूकेमध्ये प्रवेश करतात. यावर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात ६७५ भारतीय नागरिकांनी छोट्या बोटींमधून यूकेमध्ये प्रवेश केला. यूकेने वर्क व्हिसावर निर्बंध लादल्यानंतर हे स्थलांतर झाले.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
3) सेबीचा ‘इनफ्लुएन्सर’ला दणका
मोहम्मद नसीरुद्दीन अन्सारी या ‘सोशल मीडिया इनफ्लुएन्सर’ सेबीने १७.२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर ‘बाप ऑफ चार्ट’ची समाजमाध्यमांवरील खाती वापरण्यास बंदी घातली आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे काय़
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील अर्थशास्त्र घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
सेबीच्या आकडेवारीनुसार, मागील वर्षभराच्या कालावधीत नोंदणीकृत नसलेल्या १५ गुंतवणूक सल्लागारांवर कारवाई करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना अनेक पटींनी परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या अशा गुंतवणूक सल्लागारांचे पीक फोफावल्याने सेबीने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सेबीने यातील सर्वात मोठी कारवाई मे महिन्यात केली होती. त्या वेळी पी. आर. सुंदर या इनफ्लुएन्सरवर कारवाई करण्यात आली होती. तो आघाडीचा इनफ्लुएन्सर होता आणि त्याचे यूटय़ूबवर १० लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. भांडवली बाजारात व्यवहार करण्यास त्याला एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तो नोंदणी नसतानाही भांडवली बाजाराबाबत दैनंदिन सल्ला आणि इतर सेवा देत होता. याचबरोबर ‘बोर्स इंडिया इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर’, गुंजन वर्मा, ‘रॉकेट टिप्स’, ‘कुबेर कॅपिटल’, ‘शुअर शॉट फ्यूचर अॅडव्हायजरी सव्र्हिसेस’ आणि ‘क्रूड ऑइल टिप्सवाला’ यांच्यासह अशा अनेक सल्लागारांवर कारवाई करण्यात आली आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
- विश्लेषण: ‘फिनफ्लुएन्सर’वर सेबीचा दंडुका?
- UPSC-MPSC : ‘सेबी’ची स्थापना करण्याची गरज का भासली? तिची उद्दिष्टे आणि कार्ये कोणती?
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.