UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) टीपीएनडब्ल्यूची बैठक

‘अण्वस्त्र प्रतिबंध करारा’वर स्वाक्षरी केलेल्या देशांची दुसरी बैठक २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होत आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गट आणि भारताचा समावेश असलेले आणि/किंवा भारताच्या हितांवर परिणाम करणारे करार या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा करार काय आहे? या बैठकीची उद्दिष्टे कोणती? आणि त्याचा इतिहास या बाबी जाणून घेणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

‘टीपीएनडब्ल्यू’ म्हणजे ‘ट्रीटी ऑन द प्रोहिबिशन ऑफ न्यूक्लियर वेपन्स’ म्हणजेच ‘अण्वस्त्र प्रतिबंधक करार’. हा करार राजकीय कारणांपेक्षाही मानवतावादी कारणे लक्षात घेऊन करण्यात आलेला आहे. आण्विक निःशस्त्रीकरण हे या करारामागील मूलभूत उद्दिष्ट आहे. त्यासाठी बिगर-अण्वस्त्रधारक देशांनी पुढाकार घेतला. अणुयुद्धाचे मानवजातीवर होणारे गंभीर परिणाम केंद्रस्थानी ठेवून या कराराची आखणी करण्यात आली आहे.

या करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांवर अण्वस्त्रे किंवा अणुविस्फोटक उपकरणे विकसित करणे, त्यांची चाचणी करणे, निर्मिती, उत्पादन, दुसरीकडून मिळवणे, ताब्यात ठेवणे, साठा करणे तसेच अण्वस्त्रे किंवा अणुविस्फोटक उपकरणांची देवाणघेवाण करण्यावर, त्यावर नियंत्रण ठेवण्यावर किंवा निर्बंध असलेल्या कोणत्याही कृतीस साहाय्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याव्यतिरिक्त महत्त्वाची तरतूद म्हणजे अण्वस्त्रे किंवा अण्वस्त्र चाचण्यांशी संबंधित पीडितांना साहाय्य करणे आणि पर्यावरणीय उपाययोजना करणे ही जबाबदारीदेखील संबंधित देशांवर आहे.

यासंदर्भतील महत्त्वाचे लेख :

२) कर्नाटकमधील ‘कंबाला’ खेळ

नोव्हेंबर महिन्याच्या २५ आणि २६ तारखेला बंगळुरूतील सिटी प्रॅलेस मैदानावर ‘कंबाला’ खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळादरम्यान म्हशीच्या एकूण १६० जोड्यांनी सहभाग घेतला होता.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील कला व संस्कृती, इतिहास, भारतीय समाज आणि सामान्य अध्ययन पेपर २ मधील शासन धोरण या घटकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा खेळ नेमका काय आहे? आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी का घातली होती. यासंदर्भातील माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

कंबाला हा कर्नाटकमधील एक पारंपरिक खेळ आहे. कर्नाटकच्या सीमाभागात तुलू भाषिक प्रदेशात विशेष रुपाने हा खेळ आयोजित केला जातो. याआधी भाताची कापणी झाल्यानंतर अनेक कुटुंबांकडून या खेळाचे आयोजन केले जायचे. मात्र आता कंबाला समितीकडून नोव्हेंबरपासून ते एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत दक्षिण कर्नाटक आणि उडुपी जिल्ह्यांत हा खेळ आयोजित केला जातो. कंबाला हा खेळ अनेकांसाठी प्रतिष्ठेची बाब मानली जातो. विशेष म्हणजे किनारी प्रदेशातील बुंट समुदायासासाठी हा खेळ विशेष महत्त्वाचा आहे. या खेळात सहभाी होण्यासाठी वर्षभर म्हशींना सांभाळले जाते, म्हशींना पौष्टिक आहार दिला जातो.

दरम्यान, या खेळात प्राण्यांसोबत क्रुरता केली जाते, असा दावा करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २००१ साली कंबाला, जलिकट्टू, बैलगाडा शर्यत यासारख्या पारंपरिक खेळांवर बंदी घातली होती. मात्र, पर्यावरण मंत्रालयाने जानेवारी २०१६ मध्ये एक अधिसूचना जारी केली होती. तामिळनाडूमध्ये जलिकट्टू, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, केरळ, गुजरात या राज्यांत बैलगडा शर्यतीसाठी पारपंरिक खेळ म्हणून बैलांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते. असे या अधिसुचनेत म्हटले होते.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

३) सतलज नदीच्या वाळूत ‘टॅंटलम’ शोध

आयआयटी रोपरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. रश्मी सेबॅस्टियन यांच्या चमूने पंजाबमधील सतलज नदीच्या वाळूचा अभ्यास केला होता. या वाळूत टॅंटलम असल्याचे त्यांना समजले. रश्मी यांच्या चमूने लावलेला हा शोध फक्त पंजाबच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी एक वरदान ठरू शकणारा आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे टॅंटलम म्हणजे नेमके काय? या टॅंटलमचा उपयोग नेमका कशासाठी होऊ शकतो? शास्त्रज्ञांना हा शोध नेमका कसा लागला? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

टॅंटलम हा एक धातू असून त्याचा अणुक्रमांक ६३ आहे. हा धातू राखाडी रंगाचा आहे. तो जड आणि अत्यंत कठीण असतो. हा धातू सर्वाधिक गंजरोधक धातूंपैकी एक आहे. हवेच्या संपर्कात आल्यास तो ऑक्साईडचा एक थर तयार करतो. हा थर काढून टाकणे फार कठीण असते. याच कारणामुळे हा धातू अतिशय गरम आणि आम्लयुक्त वातावरणात आला तरी त्यावर सहजासहजी गंज चढत नाही. परिणामी त्याला सर्वाधिक गंजरोधक धातूंपैकी एक मानले जाते. महत्त्वाचे म्हणजे १५० अंश सेल्सिअस तापमानाखाली त्याच्यावर जवळजवळ कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही. फक्त हायड्रोफ्लोरिक अॅसिड, फ्लोराईड आयन असलेले आल्मयुक्त सोल्यूशन्स आणि फ्री सल्फर डायऑक्साईडच्या संपर्कात आल्यावरच त्याच्यावर रासायनिक क्रिया होऊ शकते. टॅंटलमचा शोध अँडर्स गुस्ताफ एकेनबर्ग या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञांनी सन १८०२ मध्ये स्वीडनमधील यट्टेरबाय या भागात लावला होता.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc key current affairs treaty on prohibition of nuclear weapons kambala sport and tantalum in sutlej river lsca spb