UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) फ्रान्समध्ये आढळलेला ‘व्हाइट हायड्रोजन’
फ्रान्सच्या दोन शास्त्रज्ञांनी भूगर्भात व्हाइट हायड्रोजन असल्याचा शोध लावला आहे. ते ईशान्य फ्रान्समध्ये जीवाश्म इंधनाच्या शोधात खोदकाम करीत होते. मात्र, खोदकाम करताना त्या भागात त्यांना व्हाइट हायड्रोजनचा साठा असल्याचे आढळले.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील भूगोल या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हाइट हायड्रोजन म्हणजे नेमके काय आहे? त्यामुळे मानवाला नेमका काय फायदा होणार? व्हाइट हायड्रोजनचा शोध नेमका कसा लागला? यासंदर्भातील माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
व्हाइट हायड्रोन हा हरित ऊर्जास्रोत आहे. म्हणजेच कोणत्याही हरित वायूचे उत्सर्जन न करता तो ऊर्जानिर्मिती करू शकतो. ग्रीन हायड्रोजनच्या तुलनेत व्हाइट हायड्रोजन अधिक किफायतशीर आहे. ग्रीन हायड्रोजनची किंमत प्रतिकिलो सहा डॉलर आहे; तर व्हाइट हायड्रोजनची किंमत प्रतिकिलो साधारण एक डॉलर पडते. व्हाइट हायड्रोजनचा मानवाला खूप उपयोग होऊ शकतो.
सध्या हायड्रोजनच्या मदतीने ऊर्जानिर्मिती केली जाते. त्यासाठी काही ठिकाणी हरित ऊर्जा प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी हायड्रोजनचा शोध घेण्यासाठी भूगर्भात खोदकाम केले जात आहे. अमेरिकेतील कोलोममा व ऑस्ट्रेलियातील गोल्ड हायड्रोजन यांसारख्या संस्था हे काम करीत आहेत. दक्षिण ऑस्ट्रेलियातील यॉर्क द्वीपकल्पात हायड्रोजनचा साठा आढळला होता. त्यानंतर या भागात इतर ठिकाणी हायड्रोजनचा शोध घेण्याची मोहीम राबवली जात आहे.
फ्रान्समध्ये आढळळेल्या या व्हाइट हायड्रोजनचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी करता येऊ शकतो. तसे झाल्यास फ्रान्ससह अनेक देशांना ऊर्जा पुरवली जाऊ शकते. सध्या जगभरात ऊर्जेचे संकट निर्माण झालेले आहे. असे असताना फ्रान्समध्ये आढळलेला हा व्हाइट हायड्रोजनरूपी खजिना जगासाठी वरदान ठरू शकतो.
यासंर्भातील महत्त्वाचे लेख :
- फ्रान्समध्ये आढळलेला ‘व्हाइट हायड्रोजन’ काय आहे? जगासाठी ठरू शकतो अमूल्य खजिना; जाणून घ्या…
- विश्लेषण: राज्याचे हरित हायड्रोजन धोरण काय आहे?
- विश्लेषण : ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’ योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी, नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या
२) त्रिपुरा-बांगलादेश रेल्वे प्रकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी नुकताच ईशान्य भारत आणि बांगलादेशला जोडणाऱ्या रेल्वे लिंकचे व्हर्च्युअली उदघाटन केले. आगरतळा-अखौरा प्रकल्पामुळे आगरतळा आणि कोलकातामधील प्रवासाचा वेळ ३१ तासांवरून १० तासांनी कमी होणार आहे. त्यामुळे वेळेत मोठी बचत होईल.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील शासन धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा प्रकल्प काय आहे? या प्रकल्पाला निधी कोण देणार? त्रिपुरासाठी हा प्रकल्प का महत्त्वाचा आहे? आणि भारत आणि बांगलादेशदरम्यान कोणकोणत्या ट्रेन चालतात? यासंदर्भातील माहिती असणे गरजेचं आहे.
तुमच्या माहितीसाठी :
१२.२४ किमीच्या आगरतळा-अखौरा रेल्वे प्रकल्पामधील ५.३६ किमी अंतर भारताच्या त्रिपुरा राज्यात आहे, तर ६.७८ किमी अंतर बांगलादेशच्या ब्राह्मणबरिया जिल्ह्यातील अखौरा भागातील आहे. आगरतळा (त्रिपुराची राजधानी) येथून निघालेली ट्रेन बांगलादेशच्या मार्गे पश्चिम बंगालच्या निश्चिंतपूर येथे पोहोचेल. दरम्यान, भारत-बांगलादेश सीमेवर रेल्वेतील प्रवाशांचे इमिग्रेशन तपासले जाणार आहे.
२०१३ साली या प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला. प्रकल्पाच्या कामासाठी २०१६ साली ९७२.५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापैकी ५८० कोटी रुपये भारताच्या बाजूच्या भूमीत काम करण्यासाठी आणि ३९२.५२ कोटी रुपये बांगलादेशच्या बाजूचे काम करण्यासाठी मंजूर करण्यात आले. प्रकल्पाच्या खर्चात वाढ आणि इतर सहायक खर्च वाढल्यामुळे या निधीत वाढ करण्यात आली. सुधारित अंदाजानुसार प्रकल्पाची किंमत १२५५.१० कोटींवर पोहोचली. यापैकी भारताकडील भूभागावर काम करण्यासाठी ८६२.५८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. प्रकल्पाची सर्व जबाबदारी भारताने आपल्या खांद्यावर घेतली आहे. ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्रालयाने (DoNER) भारतातील कामासाठी निधी पुरविला आहे. बांगलादेशच्या भूमीतील कामासाठी परराष्ट्र मंत्रालयाने निधी देऊ केला आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
- त्रिपुरा-बांगलादेश रेल्वे प्रकल्पामुळे कोणते लाभ होणार? बांगलादेशमधून जाणाऱ्या प्रकल्पासाठी भारताने निधी का दिला?
- UPSC-MPSC : भारत-बांगलादेश संबंध; बांगलादेशची निर्मिती, भारताची भूमिका आणि १००वी घटना दुरुस्ती
- UPSC-MPSC : भारत-बांगलादेश संबंध; सहकार्याची क्षेत्रे
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.