Tiger Death In India : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) गुंतवणूक निर्णयासाठी असलेले ‘ग्रे मार्केट’
मागील काही दिवसांत ‘आयपीओ’साठी गुंतवणूकदारांची झुंबड उडणे आणि विक्रीसाठी उपलब्ध समभागांच्या तुलनेत कैकपटींनी अर्ज भरणा होणे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषत: अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये ‘ग्रे मार्केट प्रीमियम’वर (जीएमपी) चर्चा होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘ग्रे मार्केट’ म्हणजे काय, ते कसे चालते आणि गुंतवणूक निर्णयासाठी ते खरेच विश्वसनीय आहे काय? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील भारतातील मॅक्रोइकॉनॉमिक्स आणि आर्थिक विकास आणि बँकिंग, आंतरराष्ट्रीय संस्था , मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
‘ग्रे मार्केट’ हा एक अनधिकृत आणि अनियंत्रित तसेच मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) या नियमनाधीन राष्ट्रीय बाजारमंचांना समांतर असा बाजारमंच आहे. परंतु प्राथमिक बाजारात दाखल होणाऱ्या कोणत्याही नवीन कंपनीचा शेअर अधिकृत बाजारात सूचिबद्ध होण्याआधीच त्याची खरेदी-विक्री ‘ग्रे मार्केट’मध्ये होत असते. हे व्यवहार भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या कक्षेबाहेर अनधिकृतरित्या पार पडतात. नियमित शेअर बाजाराप्रमाणे, ग्रे मार्केटमध्येही खरेदी-विक्री व्यवहार हे ग्रे मार्केट ब्रोकर अर्थात दलालामार्फतच होतात. येथील गुंतवणूकदारालाही अशा ब्रोकरला गाठावे लागते. तो ग्रे मार्केट ब्रोकर ‘आयपीओ’साठी अर्ज केलेल्या संभाव्य विक्रेत्याचा शोध घेतो. हा असा गुंतवणूकदार असतो ज्याने आयपीओसाठी अर्ज केला आहे, पण तो शेअर बाजारात चांगल्या किमतीवर सूचीबद्ध होण्याबाबत जर तो साशंक असल्यास आणि ती जोखीम त्याला घ्यायची नसल्यास तो गुंतवणूकदार ग्रे मार्केटमध्ये शेअरची विक्री करतो. मात्र ग्रे मार्केटमध्ये शेअर खरेदी करणाऱ्याला ते अधिकृत बाजारात सूचिबद्धतेआधी मिळत नाहीत.
‘आयपीओ’च्या माध्यमातून पात्र अर्जदारांना कंपनीकडून शेअरचे वितरणानंतर (अलॉटमेंट) ग्रे मार्केट ब्रोकरच्या माध्यमातून ते शेअर खरेदी करणाऱ्याकडे हस्तांतरित केले जातात. हा संपूर्ण व्यवहार रोखीने, प्रत्यक्ष रूपात आणि व्यक्तिश: पार पडतो. समभाग ज्या किंमतीवर सूचिबद्ध होतो आणि ग्रे मार्केटमध्ये लावलेली बोली यातील जो फरक शिल्लक राहतो त्याची सूचिबद्धतेच्या दिवशी हिशेबपूर्ती (सेटलमेंट) केली जाते. हे सर्व व्यवहार सेबीच्या कक्षेबाहेर होत असल्याने आणि स्वाभाविकच जोखीमयुक्त आहेत.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
२) २०२३ मध्ये वाघांच्या मृत्यूंमध्ये वाढ
२०२३च्या अखेरीस देशभरातील वाघांच्या मृत्यूची आकडेवारी समोर आली असून २०२३ या वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत देशात १५०हून अधिक वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अलीकडच्या काही वर्षातील हे सर्वाधिक मृत्यू आहेत. त्यामुळे वाघाच्या मृत्यूंची संख्या का वाढते आहेत? त्याची नेमकी कारणे काय? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील जैवविविधता आणि त्याचे प्रकार, पर्यावरण संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
वनखात्याचे प्रादेशिक, वन्यजीव विभाग, वनविकास महामंडळ, संरक्षित क्षेत्र, राखीव क्षेत्र असे सर्वच विभाग आणि क्षेत्रे एकमेकांशी संलग्न आहेत. मात्र, या सर्व विभाग आणि क्षेत्रांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. वाघांची संख्या वाढली आहे, पण हे नवीन वाघ जातात कुठे, याकडे कुणाचेही लक्ष नाही. कुणाचे नियंत्रण नाही. दरवर्षी सुमारे ८० टक्के नवे वाघ वेगवेगळ्या क्षेत्रात आपला अधिवास शोधत बाहेर पडतात. हे वाघ नेमके जातात कुठे यावर देखरेख करणारी यंत्रणा नाही. नेमके हेच वाघ संघटित शिकारी हेरतात किंवा अपघातात ते वाघ मृत्युमुखी पडतात.
रस्ते अपघात आणि वीजप्रवाहामुळेही वाघांचे मृत्यू होत आहेत. भारतात अनेक व्याघ्रप्रकल्पालगत आणि वाघ व वन्यजीवांचा अधिवास असणाऱ्या जंगलालगत राष्ट्रीय महामार्ग आहेत. काही महामार्ग हे जंगलातून गेले आहेत आणि तेच वाघांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. वाघ पाहायचा असतो, पण विकासाच्या नावावर धोरण निश्चिती ठरवणाऱ्यांना त्या वाघाच्या अधिवासाशी आणि परिणामी त्याच्या मृत्यूशी काहीही देणेघेणे नसते. देशभर महामार्गांचे जाळे विणले जात असताना त्यांचाही अधिवास खंडित होतो. तेदेखील भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाखाली येऊ शकतात, याकडे साफ दुर्लक्ष केले जाते.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
- विश्लेषण: व्याघ्रमृत्यूंचे प्रमाण २०२३मध्ये का वाढले? कोणते घटक कारणीभूत?
- UPSC-MPSC : भारतात ‘प्रोजेक्ट टायगर’ उपक्रम कधी सुरू करण्यात आला? त्याचा नेमका उद्देश काय होता?
- यूपीएससी सूत्र : सह्याद्री व्याघ्रप्रकल्प, पेंच व्याघ्रप्रकल्पात हत्ती कॅम्प अन् चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ला उतरती कळा, वाचा सविस्तर…
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.