UPSC Key In Marathi : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) अनुच्छेद १४२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला असलेले अधिकार

चंदीगड महापौर आणि उपमहापौर निवडणूक प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायलयाने अनुच्छेद १४२ अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करीत पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी दिलेला निकाल रद्दबातल ठरविला आहे. सोमवारी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने या संदर्भातील निकाल दिला.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्काचे मुद्दे तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील कार्यकारी आणि न्यायपालिका, मंत्रालये आणि विभागांची रचना, संघटना आणि कार्यप्रणाली, या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा अनुच्छेद १४२ नेमके काय आहे? या अनुच्छेदांतर्गत सर्वोच्च न्यायालयाला कोणते अधिकार असतात? सर्वोच्च न्यायालयाद्वारे या अनुच्छेदाचा वापर कसा केला जातो? आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या या अधिकारांवर अनेकदा टीका का केली जाते? याविषयी याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

अनुच्छेद १४२ हा सर्वोच्च न्यायालयापुढे आलेल्या कोणत्याही प्रकरणात संपूर्ण न्याय करण्यासाठी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याशी संबंधित आहे. या अनुच्छेदांतर्गत सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकाराचा वापर करीत, त्यांच्यासमोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही वादात किंवा प्रकरणात ‘संपूर्ण न्याय’ करण्याकरिता आवश्यक असेल असा हुकूमनामा किंवा आदेश देऊ शकतात. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्या प्रकरणात जर कायद्याद्वारे न्याय करता येत नसेल, तर अशा वेळी त्या खटल्यातील तथ्यांच्या आधारे संपूर्ण न्याय करण्याच्या हेतूने सर्वोच्च न्यायालय एखादा आदेश जारी करू शकते. खरे तर ज्यावेळी भारतीय संविधानात हा अनुच्छेद समाविष्ट करण्याचा विचार मांडला गेला, तेव्हा सर्वच सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला. हा अनुच्छेद देशातील विविध वंचित घटकांचे किंवा पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करील, असा विश्वास संविधान निर्मात्यांकडून व्यक्त करण्यात आला होता.

संविधानातील अनुच्छेद १४२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला असलेले अधिकार हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहेत. काळानुसार सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालांद्वारे या अधिकारांची व्याप्ती परिभाषित केली आहे. प्रेमचंद गर्ग प्रकरणातील निकालाने अनुच्छेद १४२(१) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराच्या वापराचे स्वरूप मर्यादित केले. या निकालानुसार, संपूर्ण न्याय करण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश हे संविधानाद्वारे दिलेल्या मूलभूत अधिकारांशी सुसंगत असावेत, तसेच संसदेद्वारे पारित करण्यात आलेल्या कायद्याशीदेखील असुसंगत असू नयेत, असे सांगण्यात आले.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) गुजरातमध्ये सापडलेले नवे सिंधू संस्कृतीचे शहर

गुजरातमधील जागतिक वारसा स्थळ असलेल्या ढोलावीरा पासून ५१ किमी अंतरावर सिंधू संस्कृतीचे नवे शहर सापडले आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील कला आणि संस्कृती या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे शहर नेमकं कुठे साडपलं आहे? या शहराचं नाव काय ठेवण्यात आलं? आणि महत्त्वाचे म्हणजे, सिंदू संस्कृती नेमकी काय आहे? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहिसाठी :

या नव्याने उघडकीस आलेल्या स्थळाचे नाव ‘मोरोधरो’ असे ठेवण्यात आले. हा गुजराती शब्द असून कमी खारट आणि पिण्यायोग्य पाण्यासाठी हा शब्द वापरला जातो. या ठिकाणाहूनही अनेक सिंधूकालीन मातीची भांडी मिळाली आहेत. त्यांचे स्वरूप ढोलावीरा येथे सापडलेल्या भांड्यांसारखेच आहे. प्रथमदर्शी या स्थळावर सापडलेले अवशेष ही वस्ती प्रगत (मॅच्युअर: २,६००-१,९००) ते ऱ्हास (लेट: १,९००-१,३००) या कालखंडातील असावी असे सुचवितात.

ढोलावीरा आणि मोरोधरो ही दोन्ही स्थळे समुद्राजवळ आहेत. त्यामुळे तत्कालीन व्यापारात या स्थळाने महत्त्वाची भूमिका बजावली असणार. १९६७-७८ या कालखंडात पुरातत्वशास्त्रज्ञ जे.पी.जोशी यांनी या भागात सर्वेक्षण केले होते. त्यांनी या ठिकाणी सिंधू संस्कृतीशी संबंधित पुरावे असल्याचे नमूद केले होते. परंतु त्यानंतर काही ठोस पुरावे सापडले नाही. १९८९-२००५ या दरम्यान धोलावीराचे उत्खनन झाले. तज्ज्ञांनी त्या कालखंडात या स्थळाला भेट दिली होती, परंतु त्यानंतर फारसे काही झाले नाही. परंतु ग्रामस्थांच्या सोन्याच्या शोधाने इतिहासातील गाडला गेलेला खजिना जगासमोर आला आहे.

यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.