Zombie Deer Disease In Marathi : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) झोंबी डिअर डीसिज
एकीकडे करोनाच्या JN.1 नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना दुसरीकडे ‘झोंबी डीयर डीसिज’ या आजारानेही जगभरात चिंतेचं वातावरण तयार केलं आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत शेकडो प्राण्यांना हा आजार झालेला आहे. प्राण्यांमध्ये पसरणाऱ्या या आजारामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात असून हा आजार भविष्यात माणसांनाही होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन २ मधील आरोग्य, शिक्षण आणि मानव संसाधनांशी संबंधित सामाजिक क्षेत्र/सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या आजाराविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
झोंबी डियर डीसिज या आजाराला ‘कोरोनिक वास्टिंग डीसिज’ (सीडब्ल्यूडी) असेदेखील म्हटले जाते. हा आजार प्रामुख्याने डियर, ऐल्क, कॅरिबू, रेनडियर, मूस अशा हरिणांच्या वेगवेगळ्या जातींना होत आहे. या आजाराची लागण झाल्यास सुरुवातीला प्राण्याचे वजन कमी होते, सुसूत्रता राखणे शक्य होत नाही, सुस्तपणा, तोंडातून लाळ येणे अशी लक्षणे दिसतात. अशा हरिणांना ‘झोंबी डियर’ म्हणतात. शरीरातील ‘प्रिओन’ नावाच्या प्रोटीनची मेंदू तसेच अन्य उतींमध्ये (टिश्यू) वाढ होते, ज्यामुळे अशक्तपणा येतो, प्राण्यांच्या हालचालीत बदल होतो, वागणुकीत बदल होतो. शेवटी अशा प्राण्यांचा मृत्यू होतो. सीडब्ल्यूडीच्या म्हणण्यानुसार हा आजार सर्वांत अगोदर १९६७ साली कोलोरॅडोमध्ये आढळला होता. तेव्हापासून हा आजार अनेक देशांत पसरलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे झोंबी डियर डीसिज झाल्यानंतर त्याची लक्षणं दिसायला बराच वेळ लागतो. एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याला या आजाराची लागण होते. एखादा प्राणी बाधित प्राण्याच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संपर्कात आल्यास हा आजार पसरतो किंवा वातावरणातील कण, माती, झाडे संक्रमित झाल्यामुळे किंवा संक्रमित प्राण्यांच्या मलमूत्राच्या संपर्कात आल्यावर अन्य प्राण्याला हा आजार होण्याची शक्यता असते.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
२) दुर्मिळ खनिजांबाबत चीनचे धोरण
काही दिवसांपूर्वीच चीनने दुर्मिळ खनिजांचे उत्खनन आणि त्यांच्या विलगीकरण तंत्रज्ञान निर्यातीवर बंदी घातली आहे. चीन हा जगातील खाणकाम क्षेत्रातील अव्वल देश असून, दुर्मिळ खनिजांवरील प्रक्रिया तंत्रज्ञानातही अग्रेसर आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा भारताच्या हितसंबंधांवरील परिणाम, या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे चीनचे हे धोरण नेमके काय आहे? आणि त्याचा भारतावर तसेच जगभरातील देशांवर कसा परिणाम होईल? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी :
दुर्मिळ खनिजे म्हणजे काय? तर दुर्मिळ खनिजे १७ मूलद्रव्यांचा समूह आहे. त्यामध्ये लॅन्थॅनम, सेरिअम, प्रासोडीमियम, निओडीमियम, प्रोमेथियम, समेरियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोसियम, हॉलमियम, एर्बियम, थुलियम, यटरबियम, ल्युटेटियम, स्कॅन्डियम, यट्रियम यांचा समावेश होतो. या दुर्मिळ खनिजांचा वापर लेझर उपकरणांपासून लष्करी उपकरणांपर्यंत तसेच विजेवर चालणाऱ्या वाहनांपासून पवनचक्क्या आणि ‘आयफोन’सारख्या ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक उपकरणांत आढळणाऱ्या चुंबकांमध्ये केला जातो.
ऑगस्टमध्ये ‘चिप’निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘गॅलियम’ आणि ‘जर्मेनियम’साठी चीनने निर्यात परवानगी दिली होती. मात्र, गेल्या गुरुवारी चीनने त्यावर निर्यातबंदी घातली. तसेच १ डिसेंबरपासून विविध प्रकारच्या ‘ग्रॅफाइट’साठी समान निर्बंध लागू करण्यात आले. बहुसंख्य दुर्मिळ खनिजे हे चीनमध्येच सापडत असल्याने चीनचे या क्षेत्रातील वर्चस्व आहे. अमेरिकी भूगर्भ क्षेत्र सर्वेक्षणानुसार चीनकडे अंदाजे ४४ दशलक्ष दुर्मिळ ऑक्साईडचा समतुल्य (दुर्मिळ खनिजे-आरओई) खनिजसाठा आहे. हे प्रमाण जगातील एकूण साठ्याच्या ३४ टक्के आहे. त्या खालोखाल व्हिएतनाम, रशिया आणि ब्राझीलमध्ये प्रत्येकी २० दशलक्ष टनांहून अधिक, तर भारतात ६.९ दशलक्ष, ऑस्ट्रेलियाकडे ४.२ दशलक्ष आणि अमेरिकेत २.३ दशलक्ष टन साठा आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.