UPSC Key : Monkeypox Risk in India : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) ‘सुपर ब्लू मून’ ही खगोलशास्त्रीय घटना काय?

नारळी पौर्णिमेच्या दिवशी (१९ ऑगस्ट) ‘सुपर ब्लू मून’ दिसणार आहे. ही एक अद्भुत खगोलशास्त्रीय घटना आहे. पौर्णिमेच्या दिवशी ब्लू मून आणि सुपर मून दिसणार असल्याने एक वेगळाच योग जुळून आला आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील भूगोल या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

सुपर मून म्हणजे काय?
ब्लू मून म्हणजे काय?

तुमच्या माहितीसाठी :

पृथ्वीभोवती चंद्राची कक्षा वर्तुळाकार नाही; ती लंबवर्तुळाकार आहे. चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी २७.३ दिवस लागतात. परंतु, अमावस्येच्या कालखंडात २९ .५ दिवस लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असताना, पृथ्वी आणि चंद्र हे दोघेही सूर्याभोवती फिरत असतात. त्यामुळे पृथ्वी प्रदक्षिणेच्या सुरुवातीस दरवर्षी चंद्र उजळण्यास नेहमीच अधिक कालावधी लागतो. अमावस्या हा चंद्र न दिसण्याचा मोठा कालावधी असतो त्यावेळेस चंद्राचा उजळलेल्या भाग आपल्या पलीकडच्या बाजूस असतो.

चंद्राच्या लंबवर्तुळाकार कक्षेत पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या बिंदूला पेरीजी म्हणतात आणि सर्वात दूर असलेल्या बिंदूला अपोजी म्हणतात. जेव्हा चंद्र त्याच्या पेरीजीमधून जात असतो किंवा त्याच्या जवळ असतो तेव्हा पौर्णिमेला सुपरमून अनुभवता येतो. (अमावस्येच्या बाबतीतही असेच घडते, फक्त ते दिसत नाही).

जेव्हा चंद्र सूर्याच्या थेट विरुद्ध असतो तेव्हा पौर्णिमेच्या वेळेस तो संपूर्ण दिवस उजळून निघतो. पौर्णिमेच्या दिवशी आकाशात एक तेजस्वी वर्तुळ दिसते. सूर्यास्ताबरोबर चंद्राचा उदय होतो आणि अस्त सूर्योदयाच्या आसपास होतो. सुपर मूनच्या वेळेस चंद्र फक्त पौर्णिमेलाच नाही तर पौर्णिमेच्या आदल्या रात्री आणि नंतरच्या रात्रीही ‘पूर्ण उजळलेला’ दिसतो.

जेव्हा पौर्णिमा एका महिन्यात दोनदा येते, तेव्हा त्यास ब्लू मून म्हणतात. अमावस्या ते अमावस्या हे चक्र पूर्ण होण्याकरिता २९.५ दिवस लागतात. एक वेळ अशी येते जेव्हा पौर्णिमा एका महिन्याच्या सुरुवातीला येते आणि आणखी एक पूर्ण चक्र पूर्ण होण्यासाठी अजून काही दिवस बाकी असतात त्यावेळेस त्याच महिन्यात दुसऱ्यांदा येते त्यास ब्लू मून म्हणतात. म्हणेज असा महिना, ज्यामध्ये १ किंवा २ तारखेला पौर्णिमा असते आणि त्यानंतर ३० किंवा ३१ तारखेला पुन्हा पुढच्या महिन्याची पौर्णिमा येते. नासाच्या म्हणण्यानुसार असे दर दोन किंवा तीन वर्षांनी होते. त्यावेळी ब्लू मून अनुभवता येतो.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

सुपर ब्लू मून म्हणजे काय? किती वर्षांनी घडते ही खगोलीय घटना?

२) ‘मंकीपॉक्स’ची साथ

आफ्रिकन देशांत एमपॉक्स म्हणजेच मंकीपॉक्सची साथ वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले आहे. गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा ही वेळ आली आहे. आफ्रिकेतील बाराहून अधिक देशांत पसरत असलेल्या या साथीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आरोग्य तसेच पेपर ३ मधील आपत्ती व्यवस्थापन या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

एमपॉक्स/मंकीपॉक्स म्हणजे काय?
या साथीच्या आजाराची लक्षणे कोणती?
भारत आणि मंकीपॉक्स आजार
महामारी संदर्भात भारत सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना

तुमच्या माहितीसाठी :

एमपॉक्स हा प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळणारा साथीचा आजार आहे. हा आजार देवीच्या रोगासारखा असतो, पण कमी संसर्गजन्य आहे. एमपॉक्स झालेल्या व्यक्तीचा वा प्राण्याचा अगदी नजीकचा संपर्क आला, तर किंवा या विषाणूने दूषित झालेले मांस खाल्ले, तर त्यातून हा रोग पसरतो. लैंगिक संबंधांद्वारेही या रोगाची लागण होऊ शकते. यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो.

या रोगाचा शोध १९५८ मध्ये लागला. संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या माकडांमध्ये याचा प्रादुर्भाव आढळला. या आजाराच्या मानवाला झालेल्या संसर्गाचे प्रथम निदान १९७० मध्ये काँगोमध्ये झाले. जागतिक आरोग्य संघटनेने जुलै २०२२ मध्ये एमपॉक्स साथीबाबत प्रथमच जागतिक स्वास्थ्य आणीबाणी जाहीर केली होती. त्या वेळी आधी कधीही न आढळलेल्या ७० देशांत हा आजार आढळून आला होता.

आतापर्यंत ११६ देशांतील एक लाख लोकांना याचा संसर्ग झाला आहे. युरोप, आशिया आणि अमेरिकेत त्या मानाने या रोगाची साथ कमी आहे. आफ्रिकेत मात्र काही भागांत अतिशय नाजूक स्थिती आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीपासून २८ जुलैपर्यंतची आकडेवारी पाहिली, तर आफ्रिकेत गेल्या वर्षीच्या तुलनेत याचा प्रादुर्भाव १६० टक्क्यांनी अधिक आहे.

भारतात २०२२ मध्ये केरळमध्ये मंकीपॉक्सचे पहिले प्रकरण नोंदवण्यात आले होते. तेव्हा अबुधाबीमधील एका प्रवाशाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर लगेचच हा विषाणू देशभरात पसरला आणि आंतरराष्ट्रीय प्रवास न केलेल्या दिल्लीमधील व्यक्तींमध्येही याची चाचणी पॉझिटिव्ह आली.

मंकीपॉक्सचे (एमपॉक्स) क्लेड I आणि क्लेड II असे दोन स्ट्रेन आहेत. क्लेड I गंभीर आहे आणि क्लेड II कमी प्राणघातक आहे. २०२२ मध्ये जगभरात क्लेड II चा उद्रेक पाहायला मिळाला होता. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, त्या वर्षी भारतात २७ प्रकरणे नोंदविण्यात आली होती आणि एका मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मागील वर्षी २४ जुलैपर्यंत, केरळमध्ये १२ आणि दिल्लीत १५ अशा एकूण प्रकरणांची संख्या ३१ वर पोहोचली होती.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

भारतात मंकीपॉक्सची साथ कधी आली होती? यंदा या विषाणूचा सामना करण्यासाठी भारत तयार आहे का?

मंकीपॉक्सची साथ किती गंभीर? या संसर्गाला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी म्हणून का घोषित करण्यात आले?

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…