UPSC Key : What Is SSLV D3 : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) कर्करोगावरील औषधं भारतात आणण्याबाबतचे नियम

अल्झायमर्स, वजन कमी करणे अथवा कर्करोगावरील परदेशात मंजुरी असलेल्या औषधांचा आता भारतात थेट वापर शक्य होणार आहे. जगातील आघाडीच्या देशांमध्ये वैद्यकीय चाचण्या होऊन मंजुरी मिळालेल्या औषधांच्या भारतात वैद्यकीय चाचण्या करणे आतापर्यंत बंधनकारक होते. आता ही औषधे भारतात मंजुरीच्या प्रतीक्षेत असली तरी त्यांना परदेशातील मंजुरीच्या आधारावर भारतात विक्रीस परवानगी मिळेल.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आरोग्य, शिक्षण आणि मानव संसाधनांशी संबंधित सामाजिक क्षेत्र/सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या या घटकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

औषध विक्रीसंदर्भातील भारत सरकारचे धोरण

तुमच्या माहितीसाठी :

भारतात मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या औषधांना आता परदेशातील मंजुरीच्या आधारावर भारतात विक्रीस परवानगी मिळेल. यासाठी औषध कंपन्यांना आपली नवीन औषधे ही एखाद्या आजारावर सध्याच्या औषधांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे पुरावे सादर करावे लागतील.

सध्या काही मोजक्या देशांत मंजुरी असलेल्या औषधांसाठी सध्या हा निर्णय लागू असेल त्यात अमेरिका, जपान, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युरोपीय समुदायातील देशांचा समावेश आहे. या सर्वच देशांमध्ये औषधांना परवानगी देण्याची प्रक्रिया अत्यंत काटेकोर आणि कठोर आहे. याबाबतचा आदेशही भारतीय औषध महानियंत्रकांनी काढला आहे. या देशांत मंजुरी असलेल्या औषधांचा वापर आता भारतात वैद्यकीय चाचण्या पूर्ण न करता होऊ शकेल.

नवीन औषधे आणि वैद्यकीय चाचण्या नियम २०१९ मध्ये परदेशातील औषधांचा देशात थेट वापर करण्याची मुभा आहे. मात्र नेमक्या कोणत्या देशांतील औषधांना ही मुभा असेल, याबाबत नियमामध्ये स्पष्टता नव्हती. आता औषध नियामकांनी देशांचा उल्लेख करीत आदेश काढला आहे. असे असले तरी या मार्गाने भारतात थेट औषध विक्रीला परवानगी मिळाली तरी या त्यांची विक्रीपश्चात चौथ्या टप्प्यातील चाचणी सर्वेक्षण करावे लागेल. या औषधांचे नंतर प्रतिकूल परिणाम होतात का, हे तपासण्यासाठी सर्वेक्षण असेल.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

विश्लेषण : अल्झायमर्स, वजनघट, कर्करोगावरील औषधे भारतात येण्याचा मार्ग सुरळीत… काय आहे नियमातील नवा बदल?

2) ISRO च्या SSLV-D3 मोहीमेचे महत्त्व

उपग्रह वाहून नेणाऱ्या इस्रोच्या सर्वात लहान प्रक्षेपकाचे SSLV-D3 चे तिसरे आणि अंतिम प्रायोगिक उड्डाण शुक्रवारी सकाळी यशस्वीपणे पार पडले.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच सामान्य अध्ययन पेपर ३ मधील अलीकडील मोहिमांसह अंतराळ तंत्रज्ञान, या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

इस्रोची SSLV-D3 मोहिम नेमकी काय?

SSLV-D3 मोहिमेचं महत्त्व काय?

तुमच्या माहिसाठी :

इस्रोकडे PSLV, GSLV MK2, GSLV MK3 असे तीन विविध रॉकेट – उपग्रह प्रक्षेपक आहेत. यांचे वजन अनुक्रमे सुमारे ३०० टन, ४२० टन आणि ६४० टन एवढं आहे. या तिन्ही प्रक्षेपकांमध्ये दोन टन ते सहा टन वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. हे प्रक्षेपक उड्डाणासाठी सज्ज करण्यासाठी किमान ४५ दिवसांचा अवधी आणि तंत्रज्ञान-अभियंता यांची फौज लागते. या तुलनेच SSLV चा आकार आणि वजन एकदम लहान आहे.

SSLV हा प्रक्षेपक ३४ मीटर उंच, २ मीटर व्यासाचा आणि अवघ्या १२० टन वजनाचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रक्षेपक फक्त ७ ते १० कर्मचारी-तंत्रज्ञ-अभियंता उड्डाणासाठी सज्ज करु शकतात तेही अवघ्या सात दिवसात. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत मोहीम पार पाडणे शक्य होणार आहे.

SSLV-D3 च्या यशामुळे SSLV चा व्यावसायिक वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. SSLV मधील सर्व उपकरणांच्या कामागिरीवर या मोहीमेमुळे शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे ही मोहीम महत्त्वाची आहे. आता हे तंत्रज्ञान भविष्यात खासगी अवकाश संस्थांकडे दिले जाईल आणि उपग्रह प्रक्षेपण मोहिमा जोमाने पुढे सुरु रहातील अशी अपेक्षा आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

विश्लेषण : कमी वजनाचे उपग्रह पाठवण्याची क्षमता असलेल्या ISRO च्या आजच्या SSLV-D3 मोहीमेचे महत्व काय?

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…