सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण महाराष्ट्राची निर्मिती, स्थान-विस्तार यांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्राची लांबी-रुंदी, तसेच महाराष्ट्राच्या सीमेबाबत जाणून घेऊ. भारताला एकूण ५,७१७ किमीचा समुद्रकिनारा लाभाला आहे. हा किनारा एकून नऊ राज्यांमध्ये विभागला गेला असून, त्यात महाराष्ट्राचासुद्धा समावेश होतो. महाराष्ट्राची समुद्रकिनाऱ्याची (उत्तर-दक्षिण) एकूण लांबी ७२० कि.मी. आहे. या समुद्रकिनाऱ्यावर कोकणातील सह्याद्री पर्वतावरून येणाऱ्या नद्या समुद्राशी येऊन मिळतात, तेव्हा त्या मुखाशी खाड्या, बेटे इत्यादींची निर्मिती करतात. अशीच निर्मिती महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही बघायला मिळते. महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या सात जिल्ह्यांच्या किनारपट्टीची लांबी (उत्तर ते दक्षिण), तसेच खाड्या व बेटे खालीलप्रमाणे आहेत :

१) पालघर जिल्हा : पालघर जिल्ह्याला १०२ किमीचा समुद्रकिनारा लाभला असून, येथे डहाणू व दातिवऱ्याची खाडी वैतरणा नदीच्या मुखाशी आहे.

२) ठाणे जिल्हा : ठाणे जिल्ह्यात २५ किमीचा सर्वांत कमी लांबीचा किनारा लाभलेला आहे. ठाणे जिल्ह्यात वसईची खाडी आहे.

३) बृहन्मुंबई जिल्हा (मुंबई व मुंबई उपनगर) : ११४ किमी बृहन्मुंबई जिल्ह्याला एकूण ११४ किमी लांबीचा किनारा लाभला आहे.

४) रायगड जिल्हा : रायगड जिल्ह्यात १२२ किमीची किनारपट्टी असून, खांदेरी, उंदेरी ही बेटे आहेत. तसेच राजापूर व बँकोटची खाडी आहे.

५) रत्नागिरी जिल्हा : रत्नागिरीत जिल्ह्याला २३७ किमीचा सर्वांत लांब समुद्रकिनारा लाभलेला असून, येथे जयगड व भाटे या महत्त्वाच्या खाड्या रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.

६) सिंधुदुर्ग जिल्हा : सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२० किमी किनारा असून, येथे कुरटे हे बेट आढळते. तसेच इथे देवगड, कळवली, आचरा, तेरेखोल या खाड्या आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : समुद्री प्रवाळ म्हणजे काय? त्याच्या वाढीसाठी मुख्य अटी कोणत्या?

महाराष्ट्राच्या राजकीय सीमा

महाराष्ट्र राज्य भारताच्या मध्यभागी वसलेले असल्याने त्याला एकूण सहा राज्यांच्या (गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक व गोवा) आणि एका केंद्रशासित प्रदेशाची (दादरा नगर हवेली) सीमा लागते. उपरोक्त राज्यांपैकी महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य आणि दादरा व नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र आहे. उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, तर आग्नेयेस तेलंगणा या राज्यांच्या सीमारेषा आहेत. दक्षिण व नैर्ऋत्य दिशेला कर्नाटक व गोवा ही राज्ये आहेत.

सीमारेषेवर स्थित असलेल्या जिल्ह्यांना लागून असलेली राज्ये खालीलप्रमाणे आहेत.

एकंदरीत महाराष्ट्रातील २० सीमावर्ती जिल्ह्यांच्या सीमेला इतर राज्यांच्या सीमा लागून आहेत. वायव्येस गुजरात राज्याला पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या चार जिल्ह्यांच्या सीमा भिडतात. केंद्रशासित प्रदेश दादरा व नगर हवेलीनजीक पालघर जिल्ह्याची उत्तर सीमा आहे. उत्तरेकडे मध्य प्रदेशबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया या आठ जिल्ह्यांच्या सीमा आहेत. पूर्वेस छत्तीसगड राज्याशी गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या सीमा; तर आग्नेयेस तेलंगणाला लागून गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या चार जिल्ह्यांच्या सीमा आहेत. दक्षिणेस कर्नाटकला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच उस्मानाबाद, लातूर, नांदेड या सात जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत. (नैर्ऋत्येस गोवा राज्याबरोबर फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : महासागरातील भरती व ओहोटीची प्रक्रिया कशी असते? त्याची नेमकी कारणे कोणती?

महाराष्ट्राच्या काही भागांना भौगोलिक विविधतेमुळे वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक नावे लाभलेली आहेत. त्यानुसार राज्याचे सात पारंपरिक/प्रादेशिक भाग पडतात :

१) कोकण : सह्याद्री पर्वत व अरबी समुद्रादरम्यान असलेल्या अरुंद किनारपट्टीचा भाग म्हणजे कोकण आहे. कोकणात एकूण सात जिल्हे आहेत.

२) घाटमाथा : सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग घाटमाथा म्हणून ओळखला जातो.

३) मावळ : सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग मावळ प्रांत या नावाने ओळखला जातो.

४) देश : सह्याद्रीच्या पूर्व बाजूला महाराष्ट्राचा ‘देश’ हा प्रादेशिक विभाग असून, महाराष्ट्राच्या विकासात देशाचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. त्यामध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर हे पाच जिल्हे आणि नाशिक विभागातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश होतो.

५) खानदेश : उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव या तीन जिल्ह्यांना ‘खानदेश’ असे म्हणतात.

६) मराठवाडा : मध्य महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्यास मराठवाडा हे प्रादेशिक नाव आहे. गोदावरी तीरावर नेवासे व पैठणसारखी पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा समावेश होतो. मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे आहेत.

७) विदर्भ : नागपूर विभागास विदर्भ किंवा वऱ्हाड या नावांनी व्यवहारात संबोधले जाते. त्यामध्ये अमरावती विभाग (पाच जिल्हे) व नागपूर प्रशासकीय विभागाचा (सहा जिल्हे) समावेश होतो. विदर्भात एकूण ११ जिल्हे आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc maharashtra geography how many islands and bays on coastline of maharashtra mpup spb
First published on: 09-10-2023 at 15:35 IST