सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील वने आणि त्यांचे प्रकार याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील मृदेबाबत जाणून घेऊ या. महाराष्ट्रात प्रामुख्याने चार प्रकारची मृदा आढळते. १) काळी मृदा, २) जांभी मृदा, ३) गाळाची मृदा, ४) तांबडी मृदा किंवा पिवळसर मृदा.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : महाराष्ट्रातील वने व त्यांचे प्रकार

१) काळी मृदा

काळ्या मृदेलाच ‘रेगूर मृदा’, असेही म्हणतात. ही मृदा प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर आढळते. या मृदेची निर्मिती बेसाल्ट खडकाच्या विदारणातून झालेली असून काळ्या मृदेत पाणी किंवा ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. कारण- या मृदेमध्ये चुनखडीचे प्रमाण अधिक असते. ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याने काही दिवस पाणी न पडल्यास या मृदेतून कापसाचे पीक उत्तमरीत्या घेता येते. त्यामुळेच या मृदेला ‘कापसाची काळी मृदा’ असे म्हणतात.

महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ७५ टक्के भागात ‘रेगूर मृदा’ पसरलेली असून, दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा ८६ टक्के भाग व्यापला आहे. या पठारावर सर्वत्र ‘रेगूर मृदा’ आढळते. या मृदेतील काळा रंग हा टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे आला आहे. उन्हाळ्यात कोरड्या हवेमुळे ही मृदा भुसभुशीत होते; तर कडक उन्हामुळे या मृदेमध्ये भेगा पडतात. या मृदेतील एक महत्त्वाचा दोष म्हणजे अतिरिक्त पावसामुळे या मृदेमध्ये पाणी साचून राहिल्यास ही मृदा दलदलयुक्त होते.

काळ्या मृदेत खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांतील पिकांची लागवड केली जाते. तसेच कापूस, गहू, ज्वारी, जवस आणि कडधान्य यांचे उत्पादनदेखील घेतले जाते. विदर्भात या मृदेमध्ये प्रामुख्याने कापूस पीक घेतले जाते; तर त्याबरोबरच संत्र्च्या बागादेखील आढळतात. खानदेशामध्ये या मृदेमध्ये केळीच्या बागा आढळतात, तर पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचनाच्या उत्तम सोय असल्याने या मुद्देमध्ये उसाचे उत्पादन घेतले जाते.

२) जांभी मृदा

जांभ्या मृदेची निर्मिती सतत ओला व कोरडा असलेल्या उष्ण व जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये होते. या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण कमी असून ॲल्युमिनियमचे प्रमाण अधिक असते. तसेच नायट्रोजन फॉस्फरस व सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. ही मृदा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कोकण, तेथील डोंगराळ भागात, कोल्हापूर आणि पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळते. या मृदेमध्ये पाणी किंवा ओलावा धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. या मृदेमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने फळबागाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच रत्नागिरी मध्ये हापूस आंबा याशिवाय काजू चिकू इत्यादी पिकांचे उत्पादन याच मृदेत घेतले जाते.

३) गाळाची मृदा

गाळाच्या मृदेला ‘भाबर मृदा’ असे देखील म्हणतात. ही मृदा महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या सकल प्रदेशामध्ये आढळते. ही वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा आहे. या मृदेमध्ये प्रामुख्याने तांदळाचे पीक घेतले जाते. त्याचबरोबर नारळ व पोफळीच्या बागा देखील आढळतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राचा भूगोल : कोकणातील नद्या

४) तांबडी किंवा पिवळसर मृदा

या मृदेची निर्मिती अति प्राचीन रूपांतरित खडकापासून झालेली आहे. यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्याने तिला तांबडा रंग प्राप्त झालेला आहे. या मृदेमध्ये चिकनमाती आणि वाळूचे मिश्रण असून सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी आहे. या मृदेचा आढळ सह्याद्रीच्या पर्वतमय भागात तसेच विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा व वैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहे. पाण्याचा निचरा या मृदेमधून अधिक चांगल्या प्रमाणे होत असल्याने सेंद्रीय द्रव्याचे प्रमाण कमी असते. महाराष्ट्रामध्ये ही मृदा नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये आढळते. यामध्ये पालाश, स्फुरद, कॅल्शियम आणि सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. या मृदेमध्ये उंचावरील प्रदेशात भरडधान्य, विदर्भामध्ये गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये तांदळाची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये या मृदेमध्ये सागाची वने मोठ्या प्रमाणात आढळतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc maharashtra geography maharashtrian soil and its types mpup spb
Show comments