सागर भस्मे
मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्तींबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण सह्याद्री पर्वतातील प्रमुख डोंगररांगेबाबत जाणून घेऊ या. सह्याद्री पर्वत ही कोकण किनारपट्टीला समांतर पसरलेली पर्वतरांग आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगररांगा सह्याद्रीपासून सर्वसाधारणपणे पूर्वेकडे जातात. सह्याद्री पर्वत रांगेत प्रामुख्याने तीन डोंगर रांगांचा समावेश होतो.
- सातमाळा-अजिंठा
- हरिश्चंद्र- बालाघाट
- शंभू- महादेव
सातमाळा- अजिंठा डोंगररांग
या डोंगरांमुळे गोदावरी आणि तापी या नद्यांचे खोरे वेगळे झालेले आहे. ही डोंगररांग तुटक तुटक असून तिची साधारण दिशा पश्चिम-पूर्व आहे. या डोंगररांगांची उंची पूर्वेकडे कमी होत जाते. या डोंगररांगांचा उतार उत्तरेकडे तीव्र असून दक्षिणेकडे गोदावरी नदीच्या खोऱ्याकडे उतार मंद आहे. सामान्यपणे या डोंगररांगांच्या पश्चिमेकडील भागास सातमाळा, तर पूर्वेकडील भागास अजिंठ्याचे डोंगर असे म्हटले जाते. सातमाळा डोंगररांगांना चांदवड, चांदोर किंवा इंध्याद्री म्हटले जाते.
या डोंगररांगांची सुरुवात नाशिक जिल्ह्याच्या वायव्य भागामध्ये सह्याद्रीच्या मुख्य समूहात होते. अजिंठा डोंगररांगेत पाटणादेवी, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर ही शक्तिपीठे आणि अजिंठा, वेरूळ, कातळलेणी, पितळखोरे या लेणी आहेत. तसेच देवगिरी, अंकाई, वेताळवाडी सुतोंडा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे वसलेली आहेत.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : महाराष्ट्रातील खनिज संपत्ती
हरिश्चचंद्र-बालाघाट डोंगररांग
गोदावरीच्या दक्षिणेस ही डोंगररांग वसलेली आहे. गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी या डोंगररांगेमुळे वेगळी झालेली आहे. हरिश्चचंद्र बालाघाट रांग सह्याद्री पर्वतातील पूर्वेकडे उस्मानाबाद लातूर जिल्ह्यापर्यंत पसरलेली आहे. बीड जिल्ह्यात म्हणजे पूर्व भागात ही डोंगररांग बालाघाट, तर अहमदनगर जिल्ह्यात म्हणजे पश्चिम भागात हरिश्चंद्रगड या नावाने ओळखली जाते.
या डोंगररांगेतील बहुतेक भाग सपाट माथ्याचा प्रदेश असून पूर्वेस डोगरांची उंची ६०० मीटरपर्यंत आहे. प्रामुख्याने बालाघाट डोंगररांग अहमदनगर, परभणी, बीड व नांदेड या जिल्ह्यांत विस्तारलेली आहे. बालाघाट डोंगररांगेमुळे बीड जिल्ह्याचे उत्तर व दक्षिण असे दोन भागात विभाजन झाले आहे. हा भाग पर्जन्याच्या कमतरतेमुळे अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. बालाघाट डोंगररांगेतील पूर्व भाग अत्यंत खडकाळ आहे.
शंभूमहादेव डोंगररांग
रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभूमहादेव डोंगररांग असे म्हणतात. या डोंगररांगेमुळे भीमा आणि कृष्णा नद्यांचे खोरे वेगळे झालेले आहेत. शंभूमहादेव डोंगररांगाचे स्थान हरिश्चंद्रगड, बालाघाट डोंगररांगाच्या दक्षिणेला येत असून या डोंगररांगा महाराष्ट्रात सर्वात दक्षिणेकडील डोंगररांग आहेत. या रांगेचा विस्तार प्रामुख्याने सातारा व सांगली जिल्ह्यात झालेला असून ती सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जाते. शंभूमहादेव डोंगरांना पश्चिमेला मांढरदेव, मध्यभागी म्हस्कोबाचे डोंगर आणि पूर्वेला सीताबाईचे डोंगर अशी स्थानिक नावे आहेत.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : महाराष्ट्रातील ऊर्जा साधनसंपत्ती
महादेव डोंगररांगा बऱ्याच ठिकाणी, उघड्या व खडकाळ असून त्यांमध्ये अनेक ठिकाणी उभे कडे आढळतात. महादेव श्रेणीची प्रारंभीची सुमारे ४८ किमी म्हणजेच खंबाटकी घाटाच्या पुढे काही अंतरापर्यंतची दिशा पश्चिम-पूर्व अशी आहे. ही महादेव श्रेणीमधील मुख्य डोंगररांग आहे. शंभूमहादेव डोंगररांगेत काही ठिकाणी सपाट माथ्याचा प्रदेश आहे. या डोंगररांगेतील सपाट माथ्याच्या प्रदेशात पाचगणी व महाबळेश्वर यासारखी ठिकाणे वसलेली आहेत.