सागर भस्मे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील लेखातून आपण तापी नदी प्रणालीविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण पूर्व विदर्भातील नद्यांबाबत जाणून घेऊ या. पूर्व विदर्भात वर्धा, वैनगंगा व पैनगंगा या तीन महत्त्वाच्या नद्या आहेत.

पैनगंगा नदीखोरे

पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठ्याच्या डोंगरांमध्ये वसलेल्या मढ या गावाजवळ होतो. या नदीची एकूण लांबी ४९५ किमी असून, सर्व उपनद्यांसह एकूण जलवाहन क्षेत्र २३,८९८ चौ. किमी आहे. या नदीचा प्रवाह बुलढाणा, वाशीम, अकोला व यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जाऊन, यवतमाळ जिल्ह्यातील बल्लारपूर येथे पैनगंगा नदी वर्धा नदीला मिळते. त्यानंतर त्यांचा संयुक्त प्रवास वैनगंगा नदी म्हणून होतो. ही नदी वाशीम आणि अकोला जिल्ह्याची दक्षिण सीमा निर्धारित करते. पैनगंगा नदीवर यवतमाळ जिल्ह्यात १९६८ मध्ये ईसापूरजवळ ‘ईसापूर’ धरण बांधण्यात आले. या धरणाची क्षमता ९६४ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या धरणातील पाण्याचा वापर नांदेड, यवतमाळ, हिंगोली या जिल्ह्यांतील शेतीच्या उपयोगासाठी केला जातो. पैनगंगा नदीखोऱ्यामध्ये देऊळगाव घाट, पुसद, वनी, चिखली, पांढरकवडा, मेहकर इत्यादी महत्त्वाची शहरे आहेत.

  • पैनगंगा व पूस या नद्यांचा संगम यवतमाळ जिल्ह्यातील हिवरा येथे; तर पैनगंगा व वर्धा या नद्यांचा संगम यवतमाळ जिल्ह्यातील जुगल येथे झाला आहे.
  • पैनगंगा नदीच्या उजव्या किनाऱ्यावर कयाधू नदी; तर डाव्या किनाऱ्यावर पूस, अडाण, वाघाडी, खुनी व अरुणावती या उपनद्या येऊन मिळतात.

वर्धा नदीखोरे

वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत झाला आहे. वर्धा नदीची एकूण लांबी ४५५ किमी असून, ही नदी वर्धा व अमरावती जिल्ह्याची, तसेच यवतमाळ जिल्ह्याची पूर्व सीमा निर्माण करते. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील घुगूस शहराजवळ वर्धा नदीला उजवीकडून पैनगंगा नदी मिळते. पुढे ती चंद्रपूर जिल्ह्यातून पूर्वेस वाहू लागते. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांच्या सरहद्दीवर शिवनीजवळ ती वैनगंगा नदीला येऊन मिळते. त्यांच्या संगमानंतर तिला प्राणहिता म्हणून ओळखले जाते. शेवटी ती गडचिरोली जिल्ह्यात आंध्र प्रदेशच्या सीमेजवळ गोदावरी नदीला जाऊन मिळते.

वर्धा नदीचा प्रवाह खचदरीतून जात असून, तिच्या उगमापासून ते पैनगंगा नदीच्या संगमापर्यंत तिचे पात्र खोल व खडकाळ आहे. वर्धा नदीचे खोरे सुपीक असून, वर्धेच्या खोऱ्यात काळी सुपीक रेगूर मृदा आढळते. तसेच या भागातील स्तरीत खडकामुळे या भागामध्ये दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात आढळतो. वर्धा खोऱ्यामध्ये प्रामुख्याने भात, ज्वारी, गहू, कापूस इत्यादी पिके घेतली जातात.

वैनगंगा नदी

वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेशमध्ये मैकल पर्वतरांगेत शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांजवळ भाकल येथे झाला आहे. वैनगंगा नदीची एकूण लांबी ५८० किमी असून, विदर्भात ती गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमधून वाहते. नागपूरच्या मैदानावरून वाहत येणाऱ्या कन्हान, पेंच, तसेच गोंदिया जिल्ह्यातून येणारी बाघ या सर्व नद्या वैनगंगेस येऊन मिळतात. चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर वर्धा व वैनगंगा यांच्या संगमानंतर पुढे त्यांना प्राणहिता म्हणून ओळखले जाते.

बालाघाट, तुमसर, भंडारा व पौनी ही वैनगंगेच्या काठावरील प्रमुख शहरे आहेत. वैनगंगेचे मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील एकूण पाणलोट क्षेत्र ६१,०९३ चौ. किमी. आहे. प्राणहिता ही नदी महाराष्ट्र व तेलंगणामध्ये सुमारे ११७ किमी सरहद्द तयार करते. वैनगंगा नदीच्या उपनद्यांमध्ये गाढवी, चोरखमारा, गायमुख, वाघ, खोब्रागडी, बावनथडी, अंधारी, कथणी, थानवर, कन्हान, चुलबंद, पोटफोडी, फुअर, बोदलकसा व सूर या नद्यांचा समावेश होतो.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc maharashtra geography rivers in east vidarbha region mpup spb