सागर भस्मे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या नदीप्रणाली आहे. पश्चिम वाहिनी नदी प्रणाली आणि पूर्व वाहिनी नदी प्रणाली आणि या दोन प्रणालींमध्ये विभाजन हे सह्याद्री पर्वतामुळे झालेले आहे. पूर्व वाहिनी नदी प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे या नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली असून त्यांचा वेग हा संथ आहे आणि त्यांच्या पत्रात गाळांचे संचयन झाले आहे; तर पश्चिम वाहिनी नदी प्रणालीमध्ये नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झाली नसून खाड्यांची निर्मिती झालेली आहे. या नद्यांचा वेग पूर्ववाहिनी नद्यांच्या तुलनेत अतिशय वेगवान आहे. या नद्या बारमाही स्वरूपाच्या नसून हंगामी स्वरूपाच्या आहेत. या नद्यांच्या पात्रामध्ये खडकाचे शरण कार्य मोठ्या प्रमाणात झालेले आहे. कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी उल्हास असून या नदीची एकूण लांबी १३० किमी आहे, तर दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी म्हणजे वैतरणा नदीची लांबी १२४ किलोमीटर आहे.

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीमध्ये पश्चिम वाहिनी नद्यांचे वर्गीकरण तीन प्रकारांमध्ये केले जाते. १) उत्तर कोकणातील नदी प्रणाली, २) मध्य कोकणातील नदी प्रणाली आणि ३) दक्षिण कोकणामधील नदी प्रणाली

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राचा भूगोल : कोकण किनारपट्टी

उत्तर कोकणातील नद्या :

उत्तर कोकणामध्ये दमणगंगा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा, तानसा,‌ भातसा, काळू, मुरबाडी, उल्हास, दहिसर, मिठी, बोईसर आणि ओशिवरा नद्यांचा समावेश होतो. या नद्यांचे क्षेत्र प्रामुख्याने पालघर, ठाणे आणि मुंबई भागामध्ये आढळते.

दमणगंगा नदी : दमणगंगा नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आंबेगाव गावाजवळ सह्याद्री रांगेमध्ये झालेला आहे. या नदीला दमन नदी म्हणून ओळखले जाते. दमणगंगा नदीची एकूण लांबी १३१ किलोमीटर असून तिचे क्षेत्र महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा नगर व हवेली या राज्यांमध्ये येते. डोंगर, श्रीमंत, रयते, वाल, लेंडी, साकारतोंड, दुधनी, रोशनी आणि वाघ या दमनगंगा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.

वैतरणा नदी : वैतरणा नदीचा उगम महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरजवळ सह्याद्री पर्वत रांगेत झालेला आहे. या नदीचा प्रवाह महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आहे. वैतरणेची लांबी १५४ किमी असून ती दातिवरे खाडीतून अरबी समुद्राला मिळते.

भातसा : भातसा नदीचा उगम महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कसारा घाटात घाटणदेवी येथे होतो. चोरणा, मुरबी, घोरपडी, घुमरी, कुंभेरी या भातसा नदीच्या उपनद्या आहेत‌. चोरणा आणि भातसा नदीच्या संगमावर बांधलेल्या बादशहा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा आणि वीज निर्मिती केली जाते.

मिठी नदी : मिठी म्हणजे मराठीत आलिंगन देणे होय, म्हणजे समुद्राला आलिंगन देऊन बसलेली नदी होय. मिठी नदीचा उगम मुंबईतील सहाशे बेटावरील पवई तलावातून होतो. या नदीची एकूण लांबी १८ किलोमीटर असून तिचे पाणलोट क्षेत्र ७२९५ हेक्टर आहे. बोरिवली नॅशनल पार्कमधून मिठी नदी अरबी समुद्राला मिळते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : तापी नदी प्रणाली

मध्य कोकणातील नद्या

मध्य कोकणामध्ये पातळगंगा, उल्हास, भोगावती, आंबा, कुंडलिका, काळ, गंधार, सावित्री आणि घोड या नद्यांचा समावेश होतो. या नदीचे क्षेत्र प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये आहे.

उल्हास नदी : उल्हास नदीचा उगम महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ राजमाची येथे होतो. या नदीची एकूण लांबी १२२ किलोमीटर असून ती वसईच्या खाडीतून अरबी समुद्राला मिळते. या नदीचे पाणलोट क्षेत्र पुणे, रायगड आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये आहे.

सावित्री नदी : सावित्री नदीचा उगम महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे झालेला असून या नदीची एकूण लांबी ११० किलोमीटर आहे. सावित्री नदी बाणकोट खाडीतून अरबी समुद्राला जाऊन मिळते. काळ नदी सावित्री नदीची प्रमुख उपनदी आहे.

पाताळगंगा नदी : पाताळगंगा नदीचा उगम सह्याद्री पर्वतामध्ये लोणावळा येथे होतो. ही नदी रायगड जिल्ह्यातून धरमतरच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : पूर्व विदर्भातील नद्या

दक्षिण कोकणातील नद्या

दक्षिण कोकणामध्ये प्रामुख्याने जोग, जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री, बाव, काजळी, मुचकुंडी, गाजवी, देवगड, आचरा, करली, ओरोस, वाघोटन आणि तेरेखोल या नद्यांचा समावेश होतो.

जगबुडी नदी : जगबुडी नदीचा उगम महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात वडगाव येथे सह्याद्री पर्वतामध्ये झालेला असून या नदीची एकूण लांबी ४५ किमी इतकी आहे. ही नदी वशिष्ठ नदीची उपनदी असून उत्तर दक्षिण दिशेला वाहते.

वशिष्ठी नदी : वशिष्ठ नदीचा उगम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिवरे गावाजवळ झालेला आहे. या नदीची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर असून ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुख्यतः वाहते आणि गुहागर आणि दापोली या भागातून वाहत जाऊन दाभोळच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते. जगबुडी नदी ही वशिष्ठीची प्रमुख उपनदी आहे.

शास्त्री नदी : शास्त्री नदीचा उगम रत्नागिरी जिल्ह्यात झालेला आहे. अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्यांचा कसबा येथे संगम होऊन पुढे त्यांना शास्त्री नदी म्हणून ओळखले जाते. ही नदी जयगडच्या खाडीत अरबी समुद्राला जाऊन मिळते.

तेरेखोल नदी : तेरेखोल नदीचा उगम सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्री पर्वतात मनोहरगड येथे झालेला असून या नदीची एकूण लांबी ३२ किलोमीटर असून त्यापैकी २६ किलोमीटर लांबी ही गोवा राज्यात, तर ६ किलोमीटर लांबी महाराष्ट्रात आहे. तेरेखोल नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहत जाऊन गोवा राज्यात प्रवेश करते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc maharashtra geography rivers in konkan region mpup spb