सागर भस्मे
महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून अरबी समुद्राला समांतर दक्षिण-उत्तर पसरलेल्या लांब व चिंचोळ्या किनारपट्टीला ‘कोकण किनारपट्टी’, असे म्हणतात. कोकण किनारपट्टीची दक्षिण-उत्तर एकूण लांबी ७२० किलोमीटर असून, उत्तरेस डहाणूपासून दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत कोकण किनारपट्टीचा विस्तार झाला आहे. किनारपट्टीच्या पूर्वेकडील बाजूस दक्षिण-उत्तर सह्याद्री पर्वत समांतर दिशेने एखाद्या भिंतीसारखा उभा आहे. कोकण किनारपट्टीचे महाराष्ट्रातील क्षेत्रफळ ३० हजार ४०० चौ.किमी आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : तापी नदी प्रणाली
कोकण किनारपट्टीची निर्मिती
कोकण किनारपट्टी ही सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन निर्माण झालेली आहे. त्यामुळे ज्वालामुखीचे अवशेष गरम पाण्याच्या झऱ्याच्या रूपाने कोकणात आढळतात. कोकणच्या किनारपट्टीची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत असून, सरासरी रुंदी ३० ते ६० किलोमीटर आहे. कोकण किनारपट्टीच्या उत्तरेकडील भागात रुंदी सुमारे ९० ते ९५ किमी असून, उल्हास नदीच्या खोऱ्यात ती सुमारे १०० किमी आहे; तर दक्षिण कोकणात काही भागांतील रुंदी ही ४० ते ४५ किमी इतकी आहे.
खलाटी व वलाटी
वलाटी : कोकण किनारपट्टीचा सह्याद्री पर्वताकडील पायथ्यालगतचा भाग म्हणजे वलाटी होय. या भागाचा उतार अतिशय तीव्र असून, या भागात डोंगराळ प्रदेश, वेगवान नद्या व दऱ्याखोऱ्या आहेत. या प्रदेशाची साधारण सरासरी उंची २७५ ते ३०० मीटरपर्यंत आहे आणि जसजसे सह्याद्री पर्वताकडे जावे तसतशी ही उंची वाढत जाते.
खलाटी : कोकणाचा पश्चिमेकडील अरबी समुद्राकडील भाग म्हणजे खलाटी होय. या भागाचा उतार अतिशय सौम्य असून, या भागात वाळूचे दांडी, खाजण, लहान मैदानी खाड्या, चौपाटी आणि समुद्राच्या लाटांनी तयार केलेली भूरूपे आढळतात.
नदीप्रणाली
कोकणातील नद्यांना पश्चिम वाहिनी नद्या म्हणून ओळखले जाते. त्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या नद्या पूर्व वाहिनी नद्यांच्या तुलनेत अतिशय वेगवान व हंगामी स्वरूपाच्या आहेत. या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झाली नसून, खाड्यांची निर्मिती झालेली आहे.
कोकणातील उल्हास नदी ही सर्वाधिक लांबीची नदी असून या नदीची एकूण लांबी १३० किमी आहे; तर दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी म्हणजे वैतरणा या नदीची लांबी १२४ किलोमीटर आहे. उत्तर कोकणामध्ये प्रामुख्याने दमणगंगा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, उल्हास, दहिसर व मिठी या नद्यांचा समावेश होतो. मध्य कोकणामध्ये पाताळगंगा, उल्हास, भोगावती, अंबा, कुंडलिका, काळ व सावित्री या नद्यांचा समावेश होतो. दक्षिण कोकणामध्ये जोग, जगबुडी, वशिष्ठी, मुचकुंडी, काजवी, करली व तेरेखोल या नद्यांचा समावेश होतो.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : पूर्व विदर्भातील नद्या
गरम पाण्याचे झरे
कोकणामध्ये गरम पाण्याचे झरे प्रामुख्याने पालघर, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांमध्ये आढळतात. पालघर जिल्ह्यामध्ये गणेशपुरी, वज्रेश्वरी व अकलोली येथे गरम पाण्याचे झरे आहेत. तर, रायगड जिल्ह्यामध्ये कडे व सव येथे गरम पाण्याचे झरे आहेत. सर्वाधिक झरे रत्नागिरी जिल्ह्यात असून, ते फणसवणे, उन्हवेर, राजापूर, आरवली व रावाडी येथे आहेत.
खाड्या
कोकणातील नद्या या अतिशय वेगवान असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुखाशी खाड्यांची निर्मिती केली आहे. कोकणातील प्रमुख खाड्यांमध्ये तेरेखोल, करली, देवगड, विजयदुर्ग, जैतापूर, भाटे, जयगड, दाभोळ, बाणकोट, राजापुरी, धरमतर, वसई व डहाणू इत्यादी खाड्यांचा समावेश होतो.
बंदरे
महाराष्ट्राला ७२० किमीचा समुद्रकिनारा लाभला असून, राज्य सरकारने २०१० मध्ये नवीन बंदर धोरण घोषित केले. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीमध्ये एकूण ४९ बंदरे असून, त्यापैकी दोन मोठी बंदरे आहेत. त्यातील एक म्हणजे रेडी हे बंदर लोह खनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध आहेत. हे बंदर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थित आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड कोकणामध्ये सहा बंदरे विकसित करणार आहे. त्या बंदरांमध्ये रेडी बंदराचा समावेश करण्यात आला आहे.