Decline of Mughal Empire : मागील काही लेखांमधून आपण मुघल साम्राज्यातील शेवटच्या बादशहांबाबात आणि मुघल दरबारातील गटबाजीबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण मुघलांवरील आक्रमणाबाबत जाणून घेऊया.
नादिरशहाची स्वारी
महम्मदशहाच्या काळात नादिरशहाने मुघलांवर आक्रमण केले. नादिरशहा हा पर्शियाचा राजा होता. सततच्या मोहिमांमुळे पर्शियाची आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईला आली होती. त्यामुळे भारतातील संपत्तीकडे नादिरशहा आकर्षित झाला. भारतातील संपत्ती लुटण्याच्या हेतून त्याने इ.स. १७३८ मध्ये भारतीय प्रदेशात प्रवेश केला. पुढे १३ फ्रेब्रुवारी १७३९ रोजी कर्नाल येथे महम्मदशहा आणि नादिरशहा यांच्यात युद्ध झाले. या युद्धात महम्मदशहाचा दारुण पराभव झाला. पुढे नादिरशहाने दिल्लीकडे कूच करत शाही खजिन्याची मोठ्या प्रमाणात लूट केली. या वेळी त्याने कोहिनूर हिरा आणि शहाजहाँचे मयूर सिंहासनही आपल्याबरोबर नेले. एकूणच नादिरशहाने ७० कोटी रुपयांची मालमत्ता भारतातून लुटून नेली. नादिरशहाच्या या स्वारीने मुघल साम्राज्याची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली. तसेच मुघलांची प्रतिष्ठाही धुळीस मिळाली.
हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघल साम्राज्याचा उत्तरार्ध – भाग २
अब्दालीची स्वारी
अहमदशहा अब्दाली हा नादिरशहाचा सर्वात विश्वासू आणि कर्तबगार सेनापती होती. नादिरशहाच्या निधनानंतर अब्दालीने संपू्र्ण अफगाणिस्थानवर आपले आधिपत्य स्थापन केले. इ.स. १७४८ ते इ.स. १७६७ या काळात अब्दालीने भारतावर वारंवार हल्ले केले. यादरम्यान, त्याने दिल्ली आणि आजूबाजूचा प्रदेश लुटला. त्या वेळी अहमदशहा हा मुघल बादशहा होता. इ.स. १७६१ मध्ये अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांमध्ये पानिपत येथे युद्ध झाले. या युद्धात अब्दालीने मराठ्यांच्या पराभव केला. या पराभवाने संपूर्ण भारतावर आपले नियंत्रण स्थापित करण्याचे मराठ्यांचे स्वप्न धुळीस मिळवले.
इ.स. १७५४ मध्ये आलमगीर द्वितीय हा मुघल बादशहा झाला. त्याने मुघल दरबारातील इमदाद-उल-मुल्क या कर्तबगार उमरावाला आपला वजीर म्हणून नियुक्त केले. मात्र, इ.स. १७५८ मध्ये इमदाद-उल-मुल्कने आलमगीर द्वितीयची हत्या केली. पुढे त्याने शाहआलम द्वितीय याला गादीवर बसवले. मात्र इमदाद-उल-मुल्कच्या भीतीने तो सुरुवातीची काही वर्षे दिल्लीत आलाच नाही. त्याने बराच काळ पटना आणि लखनऊ येथे घालवला. इ.स. १७६४ मध्ये बंगालचा नवाब मीर कासीम आणि अवधचा नवाब शुजा-ऊद-दौला यांनी ब्रिटिशांविरोधात युद्ध पुकारले. या दोघांमध्ये बक्सार येथे युद्ध झाले. मात्र, या यु्द्धात मीर कासीम आणि शुजा-ऊद-दौला यांचा पराभव झाला. त्यानंतर शाहआलम द्वितीय याला ब्रिटिशांचा निवृत्तिवेतनधारक म्हणून राहावे लागले.
हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघल साम्राज्याचा उत्तरार्ध – भाग १
शाहआलम द्वितीयनंतर इ.स. १८०६ मध्ये अकबर द्वितीय गादीवर आला. ईस्ट इंडिया कंपनीद्वारे नियुक्त करण्यात आलेला हा पहिला मुघल बादशाहा होता. त्याला ब्रिटिशांकडून पेन्शन दिली जात असे. त्यानेच राजा राममोहन राय यांना ‘राजा’ ही पदवी दिली होती. पुढे इ.स. १८३७ मध्ये बहादूरशहा द्वितीय मुघल बादशाह झाला. बहादूरशहा द्वितीय हा जफर या नावाने शायरी करायाचा. त्यामुळे त्याला बहादूरशहा जफर या नावानेही ओळखले जात असे. बहादूरशहा जफर हा मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशहा होता. त्याने इ.स. १८५७ च्या उठावात सहभाग घेतल्याचा आरोप ब्रिटिशांनी केला. तसेच त्याला कैद करून रंगून (बर्मा) येथे ठेवण्यात आले. इ.स. १८६२ मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि मुघल साम्राज्याचा निर्णायक अंत झाला.