मागील लेखातून आपण भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना, उद्देश आणि वाटचालीबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण काँग्रेसच्या स्थापनेसंदर्भातील मांडण्यात आलेल्या विविध सिद्धांतांबाबत जाणून घेऊ या. काँग्रेसच्या स्थापनेनंतर अनेकांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस ही संघटना ए. ओ. ह्युम यांनी लॉर्ड डफरिनच्या सांगण्यावरून स्थापन केली, असा आरोप अनेकांकडून करण्यात आला. तसेच अनेकांनी या संदर्भात सिद्धांत मांडले. त्यापैकीच एक सिद्धांत म्हणजे ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’चा सिद्धांत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना

‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ सिद्धांत

‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ सिद्धांतालाच ‘सुरक्षा झडपे’चा सिद्धांत असंही म्हणतात. हा सिद्धांत लाला लाजपत राय यांनी १९१६ मध्ये ‘यंग इंडिया’तील एका लेखात मांडला होता. त्यांच्यानुसार ब्रिटिशांनी १८५७ साली झालेल्या उठावादरम्यान भारतीयांच्या असंतोषाचा उद्रेक बघितला होता. त्यामुळे भारतावर सत्ता कायम ठेवायची असेल, तर अशा प्रकारचा सशस्त्र उठाव पुन्हा होऊ न देणं ब्रिटिशांसाठी महत्त्वाचं होतं. त्याचाच एक भाग म्हणून ब्रिटिश अधिकारी ए. ओ. ह्युम यांनी लॉर्ड डफरिनच्या सांगण्यावरून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली; जेणेकरून भविष्यात पुन्हा भारतीयांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्यास, त्यापूर्वी हा उद्रेक शांत करता येईल.

‘लायटनिंग कंडक्टर’ सिद्धांत

जहाल काँग्रेसी नेते लाला लाजपत राय यांनी ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ सिद्धांत मांडल्यानंतर काँग्रेसमधील मवाळ नेत्यांनी यात तथ्य नसल्याचं सांगितलं. तसंच त्यांनी ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ सिद्धांताला प्रत्युत्तर म्हणून ‘लायटनिंग कंडक्टर’चा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार, काँग्रेसनं ए. ओ. ह्युम यांचा ‘लायटनिंग कंडक्टर’सारखा वापर केला आणि काँग्रेसची स्थापना करण्यासाठी त्यांची मदत घेतली; जेणेकरून ज्यावेळी काँग्रेस ब्रिटिश सरकारच्या धोरणांचा विरोध करील, त्यावेळी ब्रिटिशांच्या कारवाईपासून काँग्रेसचा बचाव करता येईल.

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : १८५७ चा उठाव भाग- ६

या संदर्भात इतिहासकार काय म्हणतात?

आधुनिक भारतीय इतिहासकारांनी वरील दोन्ही सिद्धांत नाकारले आहेत. त्यांच्या मते- या सिद्धांतामध्ये कोणतंही तथ्य नाही. मुळात ज्या काळात काँग्रेसची स्थापना झाली, त्या वेळी त्या काळात भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना वाढत होती. तसंच त्या काळात ब्रिटिश इंडियन असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन यांसारख्या प्रादेशिक संघटना कार्यरत होत्या. १८५७ च्या उठावातील अपयशानंतर ब्रिटिश सरकारविरोधात सशस्त्र नव्हे, तर संघटनात्मक आंदोलनाची आवश्यकता असल्याची जाणीव त्यावेळी भारतीयांना झाली. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक संघटना असण्याची गरज निर्माण झाली आणि त्यातूनच काँग्रेसची स्थापना झाली.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc modern indian history formation of congress safety valve theory spb