मागील लेखातून आपण बंगालचे विभाजन, त्याची कारणे, त्यामागचा ब्रिटिशांचा उद्देश, या निर्णयाविरोधात भारतीयांनी केलेले आंदोलन (स्वदेशी चळवळ) तसेच बंगालच्या विभाजनावर काँग्रेसची भूमिका यांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण मुस्लीम लीगची स्थापना आणि त्याचा उद्देश यांबाबत जाणून घेऊ या…
हेही वाचा – UPSC-MPSC : ‘मोर्ले-मिंटो सुधारणा’ कायदा नेमका काय होता?
मुस्लीम लीगच्या स्थापनेची पार्श्वभूमी
१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १९ व्या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळात भारतात राष्ट्रवाद खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता. बंगाल हे त्यावेळी राष्ट्रवादाचे केंद्र होते. त्यामुळे या वाढत्या राष्ट्रवादाला आळा घालण्यासाठी ब्रिटिशांनी बंगालच्या विभाजनाचा निर्णय घेतला. २० जुलै १९०५ रोजी तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन याने बंगालच्या विभाजनाचा हुकूम काढला. त्यानुसार बंगालचे दोन भागांत विभाजन करण्यात आले. एक पूर्व बंगाल आणि दुसरा म्हणजे पश्चिम बंगाल. मात्र, बंगालच्या विभाजनाचा निर्णय लोकमताकडे दुर्लक्ष करून घेण्यात आला होता. त्यामुळे येथील नागरिकांच्या भावना खूपच दुखावल्या गेल्या.
ब्रिटिशांच्या या निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली. खरे तर ब्रिटिशांनी बंगालच्या फाळणीचा निर्णय वाढत्या राष्ट्रवादाला आळा घालण्यासाठी घेतला होता. मात्र, या निर्णयानंतर नेमके उलट घडले. राष्ट्रवादी भावना कमी होण्याऐवजी खूप मोठ्या प्रमाणात वाढली. त्याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्य. अखेर बंगालच्या विभाजनानंतर वाढता राष्ट्रवाद आणि हिंदू-मुस्लीम ऐक्यात फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी मुस्लिमांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आणि याच प्रयत्नातून एका महत्त्वाच्या पक्षाचा जन्म झाला तो पक्ष म्हणजे मुस्लीम लीग.
मुस्लीम लीगची स्थापना
३० डिसेंबर १९०६ रोजी मुस्लीम नेते आगाखान खान, ढाक्याचा नवाब सलीम-उल्ला-खॉं व नवाब मोहसीन उल मुल्क यांच्या नेतृत्वाखाली ढाका येथे अखिल भारतीय मुस्लीम लीगची स्थापना करण्यात आली. यावेळी मुस्लीम लीगचे पहिले अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाचे अध्यक्ष वकार उल मुल्क हुसैन होते. मुस्लीम लीगच्या स्थापनेपासून म्हणजे १९०६ ते १९१० पर्यंत मुस्लीम लीगचे मुख्यालय अलीगड येथे होते. मात्र, पुढे १९१० नंतर हे मुख्यालय लखनौ येथे हलवण्यात आले.
हेही वाचा – UPSC-MPSC : काँग्रेसचे लखनौ अधिवेशन का ऐतिहासिक ठरले? लखनौ करार नेमका काय होता?
मुस्लीम लीगच्या स्थापनेमागचा उद्देश
भारतीय मुस्लिमांना ब्रिटिश शासनाप्रति एकनिष्ठ बनवणे हा मुस्लीम लीगच्या स्थापनेमागचा महत्त्वाचा हेतू होता. तसेच मुस्लिमांच्या राजकीय हिताचे संरक्षण करणे, अर्थात, मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करणे व काँग्रेस पक्षाला पर्याय निर्माण करणे हासुद्धा मुस्लीम लीगच्या स्थापनेमागचा महत्त्वाचा उद्देश होता. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे मुस्लीम लीगने स्थापनेच्या वेळी वेगळे राष्ट्र हवे, अशी कोणतीही मागणी केली नव्हती.
दरम्यान, बंगालमधील वाढता राष्ट्रवाद, हिंदू-मुस्लीम यांच्यातील ऐक्य, काँग्रेसच्या मागण्या आणि मुस्लिमांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने भारत सरकार कायदा, १९०९ पारित केला. हा कायदा नेमका काय होता? या संदर्भात पुढील लेखात सविस्तर जाणून घेऊ.