New State Rise After Decline of Mughal : मागील काही लेखांमधून आपण युरोपियनांचा भारतातील प्रवेश आणि मुघल साम्राज्याच्या उत्तरार्धाबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण १८ व्या शतकातील भारत आणि मुघलांच्या पतनानंतर नव्या राज्यांच्या झालेल्या उदयाबाबत जाणून घेऊ या.
१८ व्या शतकात मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. याच दरम्यान दोन प्रकारची राज्यं अस्तित्वात आली. एक म्हणजे वारसा राज्यं आणि दुसरी स्वतंत्र राज्य. केंद्रीय सत्ता निष्प्रभ झाल्यानंतर मुघल प्रांतांच्या सुभेदारांनी स्वत:ला मुघल साम्राज्यापासून अलग केले आणि नव्या राज्यांचा उदय झाला. यामध्ये हैदराबाद, अवध आणि बंगाल या राज्यांचा समावेश होता. या राज्यांना वारसा राज्ये असे म्हणतात. याशिवाय स्थानिक राजे, शेतकरी आणि जमीनदारांनी मुघलांविरोधात केलेल्या उठावातून काही स्वतंत्र राज्यदेखील अस्तित्वात आली. उदा. मराठा, शीख इत्यादी.
हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघल साम्राज्याचा उत्तरार्ध – भाग ३
हैदराबाद
हैदराबाद संस्थानाची स्थापना निझाल-उल-मुल्क याने केली. निझाल-उल-मुल्क हा मुघल दरबारातील एक उमराव होता. मुघल बादशाह महम्मदशहाने त्याला दख्खनचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. तसेच काही काळ तो मुघल साम्राज्याच्या वजीरपदीही होता. मात्र, महम्मदशहाची चंचल वृत्ती बघून निझाम-उल-मुल्कने आपल्या वजीरपदाचा त्याग केला आणि पुन्हा दख्खनमध्ये जात मुघलांपासून अलग होत हैदराबाद संस्थानाची निर्मिती केली. साहजिकच याला मुघल बादशहा महम्मदशहाने विरोध केला. त्याने इ.स. १७२४ मध्ये मुबारिक खान याला दख्खनचा गर्व्हनर म्हणून पाठवले. पुढे निझाल-उल-मुल्क आणि मुबारिक खान यांच्यात शकुर खेडा येथे युद्ध झाले. या युद्धात निझाल-उल-हकने मुबारिक खानचा दारुण पराभव केला. मात्र, या युद्धानंतर महम्मदशहाने निझाल-उल-मुल्कशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
महत्त्वाचे म्हणजे निझाल-उल-मुल्कने कधीही आपण मुघलांपासून स्वतंत्र असल्याचे जाहीरपणे सांगितले नाही. मात्र, त्याचा व्यवहार संपूर्णपणे स्वतंत्र असल्यासारखाच होता. त्याने मुघल बादशहाच्या परवानगीशिवाय अनेक युद्धे आणि तह केले. इ.स. १७४८ मध्ये निझाल-उल-मुल्कचा मृत्यू झाला.
हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघल साम्राज्याचा उत्तरार्ध – भाग २
कर्नाटक
कर्नाटक हा मुघलांचा दक्षिणेतील एक सुभा होता. त्या वेळी दख्खनच्या सुभेदाराकडेच कर्नाटकची जबाबदारी होती. ज्या वेळी निझाल-उल-मुल्कने स्वत:ला मुघलांपासून दूर करत हैदराबादची स्थापना केली. तेव्हा कर्नाटकच्या नवाब सदाअतउल्ला खान यानेही स्वत:ला मुघलांपासून अलग करीत स्वतंत्र राज्य स्थापन केले. कर्नाटकची राजधानी अर्काट ही होती. पुढे सदाअतउल्ला खान याने त्याचा पुतण्या दोस्त अली याला आपला वारस म्हणून घोषित केले. मात्र, इ.स. १७४० नंतर नवाबपदासाठी झालेल्या संघर्षातून कर्नाटकमधील राजकीय परिस्थिती चिघळत गेली.
दरम्यानच्या काळात ब्रिटिश आणि फ्रेंचांनी कर्नाटकमध्ये बऱ्यापैकी जम बसवला होता. त्यांनी कर्नाटकमधील राजकारणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. याच काळात कर्नाटकच्या नवाबपदावरून ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली. त्याला इतिहासात कर्नाटक युद्ध ( Carnatic War ) या नावाने ओळखले जाते.