मागील लेखातून आपण १८५७ च्या उठावामागील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व लष्करी कारणांची माहिती घेतली. या लेखातून आपण १८५७ पूर्वी झालेले उठाव आणि १८५७ च्या उठावाची सुरुवात (तत्कालीन कारण) आणि वाटचाल याबाबत जाणून घेऊ या….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८५७ च्या पूर्वीचे उठाव

इ.स. १७५७ ते १८५७ या काळात ब्रिटिशांनी राबवलेल्या विविध धोरणांविरोधात शेतकरी, कामगार व आदिवासी अशा विविध गटांतील लोकांनी उठाव केले. इ.स. १७७० नंतर बंगालमध्ये या उठावांना सुरुवात झाली. येथे संन्याशांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी उठाव केले. पुढे असेच उठाव मध्य भारतातील काही ठिकाणी, तसेच गुजरात, राजस्थान आणि दक्षिण भारतातील काही ठिकाणी झाले. त्यापैकी १८०५ साली वेल्लोर आणि १८२४ साली बराकपूर येथे झालेले उठाव उग्र स्वरूपाचे होते. शिवाय आदिवासी व वन्य जमातींनी उठाव करीत ब्रिटिशांना आव्हान दिले. छोटा नागपूर परिसरातील कोलाम, बिहारमध्ये संथाळी, ओडिशातील गोंड, महाराष्ट्र्रातील कोळी, भिल्ल, रामोशी यांनीही या उठावांमध्ये सहभाग घेतला.

महाराष्ट्र्रात उमाजी नाईक यांनी केलेला उठावही तीव्र स्वरूपाचा होता. ब्रिटिशांनी उमाजी नाईक यांना अटक करून १८३२ साली त्यांना फाशीची शिक्षा दिली. इ.स. १८०० ते १८२० या काळात नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात हटकरांनी उठाव केला. या उठावाचे नेतृत्व नौसाजी नाईक यांनी केले. मात्र, ब्रिटिशांनी हा उठाव मोडून काढला. खानदेशातील भिल्लांनीही ब्रिटिशांविरोधात उठाव केले. इ.स. १८४४ मध्ये सावंतवाडीतील शेतकऱ्यांनी ब्रिटिशांविरोधात उठाव केला. या उठावाचे नेतृत्व फोंडा सावंत यांनी केले.

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : १८५७ चा उठाव भाग-२

१८५७ च्या उठावाची सुरुवात :

१८५७ च्या उठावाची अधिकृत सुरुवात १० मे १८५७ रोजी मेरठमधून झाली. मात्र, त्याच्या काही दिवसांपूर्वी बराकपूरच्या छावणीतील एक घटना अतिशय महत्त्वाची होती. त्यावेळी ब्रिटिशांनी सैनिकांना नवीन एनफिल्ड रायफल दिली होती. या रायफलीच्या काडतुसांना बंदुकीत लोड करण्यापूर्वी त्यांचे आवरण दाताने तोडावे लागत असे. मात्र, हे आवरण गाय आणि डुकरांच्या चरबीने बनवण्यात आले असल्याची बातमी सैनिकांमध्ये पसरली. सर्वप्रथम बराकपूरमधील ३४ इन्फ्रंट्री तुकडीतील सैनिकांनी ही काडतुसे वापरण्यास नकार दिला. तसेच मंगल पांडे या सैनिकाने ही काडतुसे वापरण्याची सक्ती करणाऱ्या मेजर हडसन व कमांडर जनरल व्हीलर या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या केली. ब्रिटिशांनी मंगल पांडेचे कोर्ट मार्शल करीत त्याला २९ मार्च १८५७ रोजी फाशीची शिक्षा ठोठावली.

मंगल पांडेच्या फाशीची बातमी भारतीय सैनिकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. या आणि अशा इतर घटनांमुळे भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरोधात असंतोष निर्माण झाला. पुढे २४ एप्रिल १८५७ रोजी तिसऱ्या नेटिव्ह कॅव्हलरी या सैनिकी तुकडीच्या शिपायांनी नवीन काडतुसे वापरण्यास नकार दिला. त्यामुळे ब्रिटिशांनी ८५ शिपायांना १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. मात्र, मेरठ येथील भारतीय शिपायांनी १० मे रोजी त्यांची सुटका केली आणि त्यांनी थेट दिल्ली गाठली. त्यांनी मुघल बादशाह बहादूरशहा जफर याला भारताचा सम्राट म्हणून घोषित केले. त्यानंतर बहादूरशहाने भारतीय संस्थानिकांना पत्र लिहीत ब्रिटिशांविरोधातील उठावात सहभागी होण्याचे आवाहन केले आणि १८५७ च्या उठावाला अधिकृत सुरुवात झाली.

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : १८५७ चा उठाव भाग – १

१८५७ च्या उठावाची वाटचाल

भारतीय संस्थानिकांपैकी अवध, रोहिलखंड, दुआब, बुंदेलखंड, तसेच महाराष्ट्रात आणि राजस्थानमधील काही संस्थानिकांनी या उठावात सहभाग घेतला; तर काही संस्थानिक हे ब्रिटिशांच्या बाजूने होते. मात्र, त्यांच्या सैनिकांनी या उठावात सहभाग नोंदवला हे विशेष! ग्वाल्हेरमधील सैनिकांनी या उठावात तात्या टोपे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची साथ दिली. तसेच इंदोरमधील सैनिक आणि बंगालमधल्या ब्रिटिश सैन्यातील शिपायांनीही या उठावात सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या सैनिकांबरोबरच शेतकरी, आदिवासी आणि सामान्य नागरिकही या उठावात सहभागी झाले. अनेक ठिकाणी ब्रिटिशांच्या कार्यालये आणि पोलिस ठाण्यांवर हल्ले करण्यात आले.

कानपूरमध्ये या उठावाचे नेतृत्व दुसऱ्या बाजीरावांचे दत्तक पुत्र नानासाहेब यांनी केले. त्यांनी स्वत:ला पेशवा म्हणून घोषित केले. तसेच मुघल बादशाह बहादूरशाह जफर याचे नेतृत्व मान्य केले. तर लखनऊ येथील उठावाचे नेतृत्व बेगम हजरत महल हिने केले. तिने आपला पुत्र बिरजीस कादर याला अवधचा नवाब म्हणून घोषित केले. तसेच तिने जमीनदारांच्या मदतीने ब्रिटिशांवर हल्ला केला. याशिवाय झाशीची राणी लक्ष्मीबाई हिनेही या ब्रिटिशांविरोधातील उठावात सहभाग घेतला. ब्रिटिशांनी तिला झाशीतून हुसकावून लावले. त्यानंतर तिने ग्वाल्हेरमध्ये तात्या टोपे यांच्या नेतृत्वाखालील उठावात सहभाग नोंदवला. ब्रिटिशांशी लढता लढता १७ जून १८५७ रोजी तिचा मृत्यू झाला.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc modern indian history revolt before 1857 and how to start revolt of 1857 part 3 spb